अध्याय पंधरावा
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेंचि हा होये । शाड्वळु गा ॥56॥ आणि ऊर्ध्वमूळ ऐसें । निगदिलें कीर असे । परी अधींही असोसें । मूळें यया ॥57॥ पैं बल्वचेहि महामारी। पिंपळा कां वडाचिया परी । जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती ॥58॥ तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया । अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं ॥59॥ तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडें । सासिन्नलें ॥60॥ जालें गगनचि पां वेलीये । कां वारा मांडला रुखाचेनि आयें । नाना अवस्थात्रयें । उदयला असे ॥61॥ ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु ॥62॥ आतां ऊर्ध्व या कवण । येथें मूळ तें किं लक्षण । कां अधोमुखपण । शाखा कैसिया ॥63॥ अथवा द्रुमा यया । अधीं जिया मूळिया । तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ॥64॥ आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी । आत्मविदविलासीं । निर्णयो केला ॥65॥ हें आघवेंचि बरवें । तुझिये प्रतीतीसि फावे । तैसेनि सांगों सोलिंवें । विन्यासें गा ॥66॥ परी ऐकें गा सुभगा । हा प्रसंगु असे तुजचि जोगा । कानचि करीं हो सर्वांगा । हियें आथिलिया ॥67॥ ऐसें प्रेमरसें सुरफुरें । बोलिलें जंव यादववीरें । तंव अवधान अर्जुनाकारें । मूर्त जालें ॥68॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जे विषें रांधिली रससोये, जैं जेवणारा ठाउवी होये
अर्थ
हा (संसारवृक्ष) वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. याच कारणाने अर्जुना, हा (नेहेमी) हिरवागार आहे. ॥56॥ आणि हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे, असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत. ॥57॥ झपाट्याने वाढणार्या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे (जो आहे), तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसारवृक्ष आहे. कारण की, पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत. ॥58॥ त्याप्रमाणे अर्जुना, या संसारवृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही ॥59॥ तर वरच्याही बाजूस फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात. ॥60॥ हा संसारवृक्ष म्हणजे आकाशच जणू काय वेलाच्या रूपाने नटले आहे अथवा (संसार) वृक्षाच्या आकाराने वारा विस्तारला आहे किंवा या (संसार) वृक्षाच्या रूपाने अवस्थात्रयाने उदय केला आहे. ॥61॥ असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे, असे समज. ॥62॥ आता या संसारवृक्षाचा वरचा भाग काय आहे? संसारवृक्षाचे जे मूळ आहे, त्याचे लक्षण काय आहे? याचा खाली वाढण्याचा का स्वभाव आहे? व याच्या फांद्या कशा आहेत? ॥63॥ अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत, त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा आहेत? ॥64॥ आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी (कशाकरिता) आहे? आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे ॥65॥ अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला येतील, तशा निर्मळ खुलाशाने. ॥66॥ परंतु हे भाग्यवान अर्जुना, ऐक. हा विषय श्रवण करण्यास तूच योग्य आहेस. म्हणून हे अंत:करणसंपन्न अर्जुना, तू आपल्या सर्व अंगास कानच कर. ॥67॥ जेव्हा श्रीकृष्णपरमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले, तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रकट झाले, ॥68॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना हें कवतिक, सांगतां असे अलौकिक


