स्थितप्रज्ञ आणि स्थिरप्रज्ञ या दोन शब्दांमधे अतिशय सूक्ष्म फरक आहे. भगवद्गीतेने ज्याला स्थितप्रज्ञ म्हटले आहे, तो असा महापुरुष आहे, ज्याची बुद्धी त्या परमात्म्याच्या ठायी स्थिर झाली आहे. त्याच्या सर्व वासना आणि इच्छांचा लोप झाला असून तो स्वतःच्या आत्म्यातच रममाण असतो. स्थितप्रज्ञ ही एक अवस्था आहे, जिथे पोहोचल्यावर साधक जगाच्या कोलाहलापासून अलिप्त होतो.
परंतु, स्थिरप्रज्ञता ही त्यापुढची पायरी आहे असे आपल्याला म्हणता येईल. स्थिरप्रज्ञ म्हणजे केवळ बुद्धीनेच स्थिर नव्हे, तर ज्याचे संपूर्ण अस्तित्व, ज्याची प्रत्येक कृती आणि ज्याची प्रत्येक भावना त्या अथांग शांतीमध्ये स्थिरावली आहे. असा हा स्थिरप्रज्ञ पुरुष जेव्हा समाजात वावरतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक कर्मातून तसा तसा लोकसंग्रह घडतो.
लोकसंग्रह म्हणजे या आपल्या लाडक्या संतांच्या उदाहरणासारखा… ज्ञानेश्वर माऊलींचा वारकरी संप्रदाय, समर्थ रामदास स्वामींचा रामदासी परिवार ही काही उदाहरणे…
स्थिरप्रज्ञ साधकाचे कर्म विखुरलेल्या समाजाला प्रेमाच्या आणि धर्माच्या धाग्याने एकत्र गुंफणे होय. परमार्थ मार्गावर चालताना आपण अनेकदा असा विचार करतो की, श्रेष्ठ अध्यात्मातली खरी साधना कोणती? तर ती “लोकांत राहून लोकांसाठी जगण्यात आहे.”
स्थिरप्रज्ञ व्यक्ती स्वतःसाठी काहीही करत नसते. तिचे जगणे हेच एक प्रकारचे जणू समाजासाठी, धर्मासाठी, देशासाठी,अध्यात्मासाठी दान असते. ज्याप्रमाणे दिवा स्वतः जळतो पण इतरांना प्रकाश देतो, तसेच स्थिरप्रज्ञ पुरुषाचे जीवन असते. लोकसंग्रहाचा विचार आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून निर्माण होतो. त्यातून ईशऋणातून उतराई होण्यासाठीही येतो.
एक भाव असा आहे की, संत भिक्षा मागून साधना आणि उदरनिर्वाह करतात. संत, साधू समाजात राहतात,ज्या समाजाकडून अन्न, वस्त्र आणि निवारा मिळवतो, त्या समाजाच्या कल्याणासाठी आपण आपल्या बुद्धीचा आणि शक्तीचा वापर करणे, ही ईश्वरभक्ती आहे. याच सुंदर स्थितीचे वर्णन करणारा हा श्लोक…
स्थिता बुद्धिरिह यस्य
शान्तं चित्तं च निर्मलम् ।
तस्य लोके विचरणं
भाति देवस्य दर्शनम् ॥
– गीताव्रत
ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे आणि ज्याचे चित्त अतिशय शांत आणि निर्मळ, पवित्र आहे, अशा महापुरुषाचे या जगात वावरणे हे साक्षात ईश्वराच्या दर्शनासारखे असते. स्थिरप्रज्ञता ही वैयक्तिक मुक्तीसाठी नाही, तर ती जगाला सावरण्यासाठी आहे.
जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या दुःखातून बाहेर पडतो आणि दुसऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी हात पुढे करतो, तेव्हा तिथे खऱ्या अर्थाने स्थिरप्रज्ञतेचा उदय होतो. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या अहंकाराचा त्याग करावा लागतो. जोपर्यंत आपल्याला वाटते की, मी कोणीतरी, काहीतरी वेगळा आणि विशेष आहे, तोपर्यंत आपण लोकांशी एकरूप होऊ शकत नाही. पण ज्या क्षणी आपल्याला सर्वांमध्ये तोच परमात्मा दिसू लागतो, तेव्हा लोकसंग्रह सहज साध्य होतो.
एकदा एकनाथ महाराज कावडीने गंगेचे पाणी घेऊन रामेश्वरला जात होते. कडक उन्हाचे दिवस होते आणि वाळवंटातून चालताना पाय होरपळून निघत होते. अशा वेळी त्यांना वाटेत एक तहानलेले गाढव दिसले. ते तहानेने इतके व्याकुळ झाले होते की, त्याचे प्राण आता जातील की काय, अशी अवस्था होती. महाराजांकडे गंगेचे पवित्र पाणी होते, जे त्यांनी अत्यंत कष्टाने आणले होते. त्यांच्यासोबत असलेल्या इतर वारकऱ्यांना वाटले की, महाराज हे पाणी जपून ठेवतील आणि रामेश्वरला अर्पण करतील. परंतु, महाराजांनी विचार केला की, ज्या ईश्वराला मी रामेश्वरला शोधायला निघालो आहे, तोच ईश्वर या तहानलेल्या जिवाच्या रूपात माझ्यासमोर उभा आहे. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते गंगेचे पवित्र पाणी त्या गाढवाच्या मुखात घातले.
हेही वाचा – रामरक्षेचे चिलखत
वारकरी चकित झाले आणि विचारू लागले की, महाराज, आपण हे काय केले? गंगेचे पवित्र पाणी एका गाढवाला पाजले? तेव्हा एकनाथ महाराज अतिशय शांतपणे आणि स्मितहास्य करत म्हणाले की, या तहानलेल्या जिवाच्या डोळ्यांत मला माझा विठ्ठल दिसला! त्या गाढवाची तहान भागवणे हीच माझी खरी रामेश्वरची पूजा आहे.
महाराजांची ही कृती म्हणजे स्थिरप्रज्ञतेतून घडलेला लोकसंग्रह होता. म्हणजे यात प्रामुख्याने भूतदया येते हेही आपल्या लक्षात घ्यावं लागेल!
“लोकसंग्रह म्हणजे केवळ मनुष्यांची सेवा नव्हे, तर चराचरातील प्रत्येक जिवाबद्दल वाटणारे प्रेम आणि आत्मीयता…”
ही कथा आपल्याला सांगते की, खरी प्रज्ञा तीच, जी आपल्याला परदु:ख जाणायला शिकवेल! प्रेमळ, मृदू, सात्विक, करुणासंपन्न, परोपकारी आणि दयाळू बनवेल! हे करूणेचे दर्शन घडणे आहे…
सर्वभूतहिते युक्तः
करुणापूर्णमानसः ।
स एव प्रज्ञया युक्तः
स्थिर इत्यभिधीयते ॥
– गीताव्रत
जो सर्व प्राणिमात्रांच्या हितामध्ये मग्न आहे आणि ज्याचे मन करूणेने काठोकाठ भरलेले आहे, त्यालाच खऱ्या अर्थाने प्रज्ञावान आणि स्थिर असे म्हटले जाते.
लोकसंग्रहाचा मार्ग हा उपदेशाचा मार्ग नसून तो प्रत्यक्ष कृतीचा मार्ग आहे. आपण जेव्हा एखाद्या गरजूला मदत करतो, तेव्हा आपण आपल्याच नकळत अद्वैताचा सराव करत असतो. पण आपण इतरांना मदत करत नाही, तर आपण आपल्यातल्याच एका ईश्वरी, परमात्म्याच्या अंशाला सावरत असतो. ही भावना ज्या दिवशी आपल्या मनात दृढ होईल, त्या दिवशी जगातील सर्व वाद आणि सर्व युद्धे संपून जातील.
“स्थिरप्रज्ञ माणूस हा समाजातील दुभंगलेली मने जोडण्याचे काम करतो.”
दैनंदिन जीवनात स्थिरप्रज्ञता कशी टिकवावी, हा प्रश्न अनेकांना पडतो. आपण कार्यालयात काम करतो, घरातली आपली नित्य कर्तव्ये पार पाडतो, तेव्हा अनेकदा ताणतणाव निर्माण होतो. अशा वेळी स्थिरप्रज्ञता आपल्याला आधार देते, धीर देते. जर आपली प्रज्ञा स्थिर असेल, तर बाह्य परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत नाही.
लोकसंग्रह करताना आपल्याला अनेक प्रकारच्या माणसांशी संवाद साधावा लागतो. काही माणसे चांगली असतात, तर काही वाईट! “काही आपली स्तुती करतात, तर काही निंदा. पण स्थिरप्रज्ञ पुरुष स्तुती आणि निंदा या दोन्ही गोष्टींकडे सारख्याच नजरेने पाहतो.” त्याला ठाऊक असते की या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत. या समत्व भावाचे वर्णन करणारा हा गीताव्रत श्लोक पहा…
मानापमानयोस्तुल्यः
सुहृन्मित्रारिपक्षयोः ।
लोकानां संग्रहे सक्तः
स मुक्तो नात्र संशयः ॥
– गीताव्रत
जो मानापमानामध्ये सारखाच राहतो आणि ज्याची दृष्टी मित्र तसेच शत्रू या दोघांवरही समान असते, असा लोकसंग्रहामध्ये मग्न असलेला मनुष्य खरोखर मुक्त असतो, यात शंका नाही.
“खरी मुक्ती ही जगात राहूनही जगाच्या दोषांपासून अलिप्त राहण्यात आहे.”
स्थिरप्रज्ञता आपल्याला हे सामर्थ्य देते. जेव्हा आपण लोकसंग्रहाचा विचार करतो, तेव्हा आपल्याला हे उमजते की, “हा समाज हा परमात्मा परमेश्वराचा एक भाग आहे आणि समाजाची उन्नती हीच आपली आध्यात्मिक उन्नती आहे.”
स्थिरप्रज्ञ पुरुष हा समाजाला दिशा देणारा नेता असतो. तो केवळ सांगत नाही, तर तो स्वतः तसे जगतो. लोक त्याच्याकडे पाहून शिकतात. शब्दांपेक्षा आचरणातून दिलेला संदेश अधिक प्रभावी असतो. जेव्हा एखादा माणूस कठीण प्रसंगातही शांत राहतो आणि इतरांना धीर देतो, तेव्हा तो आपोआप लोकसंग्रह करत असतो. मग गाडगे महाराज गाव झाडून काढतात. लोक आपलेसे करतात. समर्थ तरुणांना मनाचे श्लोक शिकवतात आणि बलोपासना करून घेतात.
आपली मुले, आपले आई-वडील आणि आपले शेजारी यांच्याशी वागताना जर आपण ही स्थिरता पाळली, तर आपल्या घराचे रूपांतर एका आश्रमात होईल. अध्यात्म ही सर्वश्रेष्ठ जगण्याची एक पद्धत आहे. या जगण्याच्या पद्धतीवर भाष्य पाहू…
यद्यदाचरति प्रज्ञः
लोकस्तदनुवर्तते ।
तस्मात् लोकहितं कार्यं
धैर्येण स्थिरचेतसा ॥
– गीताव्रत
प्रज्ञावान माणूस जे जे आचरण करतो, त्याचेच अनुकरण इतर लोक करतात. म्हणूनच स्थिर चित्ताने आणि धैर्याने नेहमी लोक हिताचीच कामे करावीत. आपण स्वतःला कितीही छोटे मानत असलो, तरी आपल्या वागण्याचा परिणाम कोणावर तरी होत असतो. जेव्हा आपण रागावतो किंवा कोणाचा तरी अपमान करतो, तेव्हा आपण समाजातील नकारात्मकता वाढवत असतो. पण जेव्हा आपण स्थिर राहून प्रेमाने वागतो, तेव्हा आपण एक सकारात्मक लहर निर्माण करतो. हाच तो लोकसंग्रह आहे जो जगाला सुंदर बनवतो.
“स्थिरप्रज्ञतेतून मिळणारी शांती ही इतरांना वाटण्यासाठी असते.”
आपण जे काही मिळवले आहे, मग ते ज्ञान असो वा धन, ते इतरांना देण्यातच आपल्या आयुष्याचे सार्थक आहे. अद्वैत आपल्याला हेच सांगते की, दुसरे कोणी वेगळे नाहीच. मग आपण स्वतःसाठीच साठवून का ठेवावे? जेव्हा आपण देण्याचा आनंद घेतो, तेव्हा आपली प्रज्ञा अधिक विस्तृत आणि अधिक स्थिर होते. देण्याने काहीही कमी होत नाही, तर आपण अधिक समृद्ध होतो. हा समृद्धीचा अनुभव हाच ब्रह्मानंदाचा एक भाग आहे.
लोकसंग्रहाचा हा प्रवास आपल्याला हिंसेकडून अहिंसेकडे आणि असत्याकडून सत्याकडे घेऊन जातो. जेव्हा आपण सर्वांना स्वतःचाच अंश मानतो, तेव्हा आपण त्याच्यावर कधीच हात उगारू शकत नाही. तिथे केवळ करूणा उरते. स्थिरप्रज्ञता ही आपल्या मनातील हिंसेचा पूर्णपणे निरास करते. आपण जेव्हा शांत असू, तेव्हा आपण इतरांचे दुःख ऐकून घेऊ शकू! त्यावर उपाय शोधू शकू!
अशा प्रकारे स्थिरप्रज्ञ पुरुष हा जगाचा तारणहार ठरतो. या पूर्णत्वाच्या स्थितीचा गौरव करणारा हा गीताव्रत श्लोक चिंतनाचा कळस ठरेल.
अद्वैतभावनोत्पन्ना
प्रज्ञा यस्य सदा स्थिरा ।
स लोकसंग्रहे लीनः
परं ब्रह्म प्रपद्यते ॥
– गीताव्रत
ज्याची अद्वैत भावनेतून निर्माण झालेली प्रज्ञा सदैव स्थिर असते आणि जो लोकसंग्रहामध्ये पूर्णपणे तल्लीन असतो, तोच त्या परब्रह्माची प्राप्ती करून घेतो.
हेही वाचा – कानडा राजा
खरोखरच, जगाची सेवा हीच ईश्वराची सर्वात मोठी सेवा आहे. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात ही स्थिरता जपण्याचा प्रयत्न करू या! प्रत्येक व्यक्तीला भेटताना आपण त्यातील ईश्वराचे रूप शोधूया. असे केल्याने आपले जगणे हाच एक उत्सव होईल आणि आपल्या हातून आपोआप लोकसंग्रह घडत राहील.
स्थिरप्रज्ञ आणि स्थितप्रज्ञ या दोन्ही अवस्था आपल्याला अथांग शांततेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. स्थितप्रज्ञता आपल्याला अंतर्मुख करते, तर स्थिरप्रज्ञा आपल्याला बहिर्मुख होऊन समाजाला, जगाला कवेत घ्यायला शिकवते. हे दोन्ही प्रवाह मिळूनच मानवी जीवनाचा हा अफाट सागर पूर्ण होतो. आपण सर्वजण या प्रकाशाचे प्रवासी आहोत. आपण आपली प्रज्ञा स्थिर ठेवूया आणि आपल्या कर्मातून या जगाला अधिक मंगलमय बनवू या!


