भाषांतर करता करता हॅनिमन एका ठिकाणी थबकला… विल्यम कलेन यांनी ‘सिंकोना’ किंवा ‘पेरुव्हियन बार्क’ हे Intermittent fever — त्या काळी ज्याला ‘मलेरियासदृश ताप’ म्हटले जाई — यावर प्रभावी ठरते, असे लिहिले होते. ‘सिंकोना’च्या या परिणामाचे स्पष्टीकरण देताना कलेन यांनी तिच्या कडू आणि तुरट गुणांमुळे निर्माण होणाऱ्या tonic परिणामाला, विशेषतः पोटावर होणाऱ्या शक्तिवर्धक परिणामाला, महत्त्व दिले होते.
आजच्या pathology किंवा pharmacologyच्या ज्ञानातून पाहिले, तर अर्थातच या स्पष्टीकरणाला फारसा अर्थ उरत नाही. पण आपण अठराव्या शतकाच्या अखेरीबद्दल बोलत आहोत. त्या काळातील उपलब्ध वैद्यकीय ज्ञानाच्या चौकटीतून कलेन यांनी हे स्पष्टीकरण दिले होते.
पण हॅनिमनला ते पटले नाही. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला — सिंकोनाचा परिणाम केवळ तिच्या कडू, तुरट किंवा tonic गुणांमुळे होत असेल, तर असे गुण असणारे इतरही अनेक पदार्थ आहेत. मग ते सगळेच intermittent fever का बरे करत नाहीत? सिंकोनामध्ये असे नेमके काय आहे?
…आणि इथे हॅनिमनने एक विलक्षण गोष्ट केली. उत्तर पुस्तकात शोधण्याऐवजी त्याने ते स्वतःच्या शरीरात शोधायचे ठरवले.
1790 मध्ये त्याने निरोगी असताना सिंकोनाची साल स्वतः घेऊन तिचा शरीरावर काय परिणाम होतो, हे पाहण्याचा प्रयोग केला. आपल्या नोंदीत तो लिहितो की, त्याने चांगल्या प्रतीच्या Chinaचे चार drachms दिवसातून दोन वेळा घेतले.
त्यानंतर त्याच्या पायांना आणि बोटांच्या टोकांना थंडी जाणवू लागली. आळस आणि झोप येऊ लागली. हृदयाची धडधड वाढली, नाडीमध्ये बदल झाला, अस्वस्थता, कंप, अंगातील अशक्तपणा, डोक्यात ठणका, गाल लाल होणे आणि तहान अशी एकामागोमाग एक लक्षणे निर्माण झाली.
हॅनिमनच्या स्वतःच्या शब्दांत ही लक्षणे त्याला intermittent feverमध्ये दिसणाऱ्या लक्षणांसारखी वाटली. विशेष म्हणजे, त्याने प्रामाणिकपणे असेही नोंदवले की, त्या तापामध्ये दिसणारी विशिष्ट हुडहुडी — chilly, shivering rigor — त्याला आली नव्हती.
ही लक्षणे साधारण दोन ते तीन तास टिकत. त्याने सिंकोना पुन्हा घेतली की, ती पुन्हा निर्माण होत आणि औषध घेणे बंद केल्यावर तो पुन्हा पूर्ववत होत असे!
हेही वाचा – Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन
आता एखादा माणूस इथे थांबला असता… पण हॅनिमन थांबला नाही. त्याच्यासमोर आता एक विलक्षण प्रश्न उभा राहिला होता —
मी निरोगी आहे. मला intermittent fever नाही. मग intermittent fever बरा करण्यासाठी वापरले जाणारे हे औषध माझ्यासारख्या निरोगी माणसामध्ये त्याच रोगासारखी लक्षणे का निर्माण करत आहे?
हा प्रश्न पूर्णपणे आकाशातून पडलेला नव्हता.
हॅनिमनच्या आधीही औषधांचा स्वतःवर प्रयोग करण्याची एक वैद्यकीय परंपरा निर्माण होत होती. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे अँटन स्टॉर्क. हॅनिमनच्या वैचारिक वंशावळीत त्यांना एखाद्या ‘आजोबा-पणजोबां’सारखे म्हणावे, इतका त्यांच्या प्रयोगपद्धतीचा पुढच्या विचारांशी संबंध दिसतो.
स्टॉर्क यांनी हेमलॉक, हेनबेन, स्ट्रॅमोनियम, अकोनाइट यासारख्या विषारी समजल्या जाणाऱ्या वनस्पतींचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो का, याचा अभ्यास केला. रुग्णाला औषध देण्याआधी त्याचा परिणाम आणि सहन होणारी मात्रा समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतःवरही प्रयोग केले. म्हणजे, औषधाचा परिणाम निरोगी शरीरावर आधी पाहणे, ही कल्पना हॅनिमनपासून सुरू झालेली नव्हती. हॅनिमनने मात्र या विचाराला पुढे एका वेगळ्याच दिशेने नेले.
हेही वाचा – Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!
कलेन म्हणत होते — सिंकोना intermittent feverमध्ये उपयोगी पडते आणि तिच्या tonic गुणांमध्ये त्याचे स्पष्टीकरण शोधता येईल.
हॅनिमनच्या स्वतःच्या शरीराने मात्र त्याच्यासमोर एक वेगळाच प्रश्न उभा केला होता —
जे औषध आजारी माणसातील intermittent fever बरे करू शकते, तेच औषध निरोगी माणसामध्ये intermittent feverसारखी लक्षणे निर्माण करू शकते का?
कदाचित हॅनिमनच्या आयुष्याला कलाटणी देणारा खरा क्षण हा होता.
उत्तर अजून सापडले नव्हते… पण प्रश्न सापडला होता.


