आज घरून निघायलाच उशीर झाला. मोटरसायकल लवकर स्टार्ट होईना. त्यात धुवांधार पाऊस. जेमतेम रेनकोट घालून स्टॅण्डवर गेलो. पेपरचे पार्सल घेतले. सॉर्टिंग करून प्लास्टिक टाकून पॅक केले आणि पेपर वाटायला सुरुवात केली. मोटरसायकल घेतल्याने पेट्रोलचा खर्च वाढला. पूर्वी सायकल वर जायचो. पण आता गावाबाहेर कॉलन्या झाल्यात. एवढ्या दूर सायकलने जाणे शक्यच नाही. सकाळचा पेपर 11 वाजता कोण वाचणार? त्यात पेपर वाचणारे कमी झाले. तरुण पिढी तर वाचतच नाही! मग जे आहे ते गिऱ्हाईक टिकवणे तर भाग आहे.
अर्धा-पाऊण तास संपला पेपर वाटता वाटता… पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. खांडेकर काकांचे घर आले. काकांचे बरे आहे… थांबून दोनदा ‘पेपर पेपर’ म्हटले की, काकांना समजते की राजू पेपरचे बिल घ्यायला आला आहे… 2 तारखेनंतर कधीही.
“पेपर… पेपर…”
“आलो.. आलो. किती झाले पैसे?” काकांनी आतून विचारले
“एकशे सत्तर रुपये झालेत काका.”
“आणतो. पण तू बाहेर का उभा? कंपाऊंडच्या आत ये छपराखाली. पाऊस बघ किती पडतोय!”
“राहू द्या काका, अजून पेपर वाटायचे बाकी आहेत.”
हेही वाचा – आपल्यांचा आपलेपणा…
काका आतमध्ये गेले. काका काकू दोघेच राहतात. मुले, सुना शहरात. बराच वेळ झाला तरी काका येईना… रेनकोट असला तरी कुठून कुठून पाणी आतमध्ये जाऊन ओलं होतं होते. थंडीही वाजू लागली. पायही दुखू लागले. अखेर नाईलाजाने कंपाऊंडच्या आत गेलो. एक जुनी खुर्ची होती त्यावर बसलो. थंडी वाजतच होती, पण निदान पाऊस तरी लागत नव्हता. पाच मिनिटे अजून झाली. मी पुन्हा हाक मारली.
“काका राहूद्या पैसे, मला उशीर होईल… उद्या परवा द्या.”
“बस्स, दोनच मिनिटे थांब… आलोच मी.”
ते दोन मिनिटेही मला काढणे जड जात होते. एकतर पाऊस वेड्यासारखा कोसळत होता… आणि एवढ्या पावसात अजून अर्धे पेपर वाटायचे काम बाकी होते. हातपाय गळल्यासारखे वाटत होते.
काका पैसे घेऊन आले. मी सुटकेचा नि:श्वास टाकला… मी पैसे मोजून व्यवस्थित आतल्या खिशात ठेवले आणि निघणार तेवढ्यात काका म्हणाले, “थांब एक मिनिट.”
हेही वाचा – बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…
आता माझा संतापच झाला. आधीच माझे वीस मिनिटे वाया गेली होती. तरीही शांत राहत मी विचारले,
“काय राहिले?”
काकांनी टॉवेल माझ्या हातात दिला… “चेहरा, डोके पुसून घे.”
“पण त्याचा काय उपयोग काका. पुन्हा भिजणारच ना?”
काकांनी घराकडे पाहत हाक दिली…
“आण गं.”
घरातून हळूहळू काकू बाहेर आल्या. त्यांच्या एका हातात गरम भज्यांची प्लेट आणि एका हातात चहाचा कप होता…
“खाऊन घे… चहा घे. बरे वाटेल तुला. भिजलायस बघ किती?” त्या मायेने म्हणाल्या.
मी टॉवेलने चेहऱ्यावरचे पाणी पुसले… पण माझे डोळ्यातले पाणी मात्र थांबायलाच तयार नव्हते…


