सकाळचा आयपीडी राऊंड होतो तेव्हा जवळपास प्रत्येक पेशंटच्या साइडटेबलवर बिस्किट पुडा पडलेला दिसतो. आजकाल सहजसोपा नाश्ता किंवा पेशंटला भेटण्यासाठी काय न्यायचं म्हटलं की, डोळ्यांसमोर ‘बिस्किट’चा पर्याय उभा रहातो. बिस्किटं जगभरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडतं स्नॅक मानलं जातं; पण फार कमी लोकांना माहिती आहे की, ‘काही’ बिस्किटांचा जन्म चव वाढवण्यासाठी नव्हे, तर माणसाचं आरोग्य सुधारण्यासाठी झाला होता.
अशा बिस्किटामागचा माणूस होता सिल्व्हेस्टर ग्रॅहम; व्यवसायानं धर्मोपदेशक, पण विचारानं वैद्यकीय संशोधक, पोषणतज्ज्ञ आणि समाजसुधारक!
ग्रॅहम लहानपणापासून अंमळ अशक्त होता. सततचे आजार, थकवा आणि शारीरिक त्रास… यामुळं त्याला स्वतःच्या आरोग्याबद्दल गंभीरपणं विचार करावा लागला. त्या काळी अमेरिकेत लोकांचे आहार अत्यंत अनियमित होते. भरपूर मांसाहार, मद्यपान, तंबाखूसेवन, अतिप्रमाणात मसाले, साखर आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन यामुळं अनेक रोग वाढत होते.
हेही वाचा – मार्था मेसन… अजिंक्य मी, अभेद्य मी!
ग्रॅहमनं स्वत:लाच प्रश्न विचारला, ”आपण जे खातो त्यावरच तर आपलं शरीर उभं राहतं. मग चुकीचं अन्न खाऊन आरोग्य कसं चांगलं राहील?” याच प्रश्नातून त्याच्या आयुष्याला नवं वळण मिळालं.
त्यानं शरीरशास्त्र, पोषणशास्त्र आणि मानवी जीवनशैलीचा सखोल अभ्यास सुरू केला. पूर्व अमेरिकेत फिरून त्याने हजारो लोकांसमोर व्याख्याने दिली आणि ‘दी ग्रॅहम सिस्टिम’ नावाची जीवनशैली मांडली. त्याचे काही नियम त्या काळासाठी अक्षरशः क्रांतिकारक होते – जसं संपूर्ण गव्हाच्या पिठाची भाकरी किंवा ब्रेड खा… शक्य तितका शाकाहार स्वीकारा… ताजी फळे आणि भाज्या खा… शुद्ध पाणी प्या… भरपूर ताजी हवा घ्या… झोपताना खिडक्या उघड्या ठेवा… मऊ गाद्यांऐवजी कडक गादीवर झोपा… जेवताना आनंदी वातावरण ठेवा… मद्य आणि तंबाखूसेवन तसेच अतिखाणं टाळा…
आज यापैकी अनेक गोष्टी आपल्याला अगदी स्वाभाविक वाटतात, पण जवळपास दोनशे वर्षांपूर्वी या कल्पना लोकांना वेडगळ वाटत होत्या.
ग्रॅहमचा सर्वात मोठा आग्रह होता रिफाइंड मैद्याऐवजी संपूर्ण गहू वापरा. त्यानं भरड दळलेल्या गव्हाच्या पिठाचा प्रचार केला. पुढं हे पीठ ‘ग्रॅहम फ्लोर’ म्हणून प्रसिद्ध झालं. याच पिठापासून तयार झालं ‘ग्रॅहम क्रॅकर’! आज ते गोड बिस्किट म्हणून ओळखलं जातं; पण मूळ ग्रॅहम क्रॅकर फारच साधं, कमी गोड आणि आरोग्यदायी अन्न म्हणून तयार करण्यात आलं होतं. त्याचा उद्देश चव नव्हता, आरोग्य होता.
ग्रॅहमची व्याख्यानं इतकी लोकप्रिय होती की, मोठमोठी सभागृहे भरून जात. लोक नोट्स काढत, त्याचे आहारनियम घरी पाळत आणि त्याच्यामुळं अनेकांनी मद्य आणि तंबाखू सोडल्याची नोंद इतिहासात आढळते. काहींनी त्याला आरोग्यगुरू मानलं, तर काहींनी त्याची खिल्ली उडवली. मांस उद्योग, बेकरी व्यवसाय आणि मद्यनिर्माते त्याच्यावर संतापले… काही शहरांत तर चक्क त्याच्या व्याख्यानांना विरोधही झाला!
1839 मध्ये त्यानं आपल्या विचारांचं संकलन करून ‘लेक्चर्स ॲान द सायन्स ॲाफ ह्यूमन लाइफ’ हा ग्रंथ प्रकाशित केला. तो त्या काळातील आरोग्यसुधारणा चळवळीचा प्रमुख ग्रंथ ठरला. या पुस्तकात त्यानं पोषण, व्यायाम, झोप, मानसिक आरोग्य, स्वच्छता आणि जीवनशैली यांचा एकत्रित विचार मांडला. आज आपण ज्याला ‘लाइफस्टाईल मेडिसिन’ म्हणतो त्याची बीजं त्या पुस्तकात स्पष्ट दिसतात.
1840नंतर हळूहळू त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली. लोकांना कडक आहारनियम पाळणं अवघड वाटू लागलं. त्याच्या काही मतांवर वैज्ञानिक टीकाही झाली; तरीसुद्धा त्यानं मांडलेले अनेक मूलभूत सिद्धांत पुढं आधुनिक पोषणशास्त्रानं स्वीकारले.
हेही वाचा – लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर
1851 साली सिल्व्हेस्टर ग्रॅहमचं निधन झालं. तेव्हा कदाचित त्याला कल्पनाही नसावी की, त्यांच्या नावाचं एक साधं बिस्किट पुढच्या शतकांमध्ये जगभर प्रसिद्ध होईल. आज ‘ग्रॅहम क्रॅकर’ खाणाऱ्या लाखो लोकांना त्यामागं आरोग्यक्रांती घडवणारा एक विचारवंत उभा आहे, हेही माहिती नसतं.
ग्रॅहमच्या सर्व कल्पना आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर पूर्णपणे उतरतात, असं नाही. त्यानं काही बाबतीत अतिशय कठोर आणि आजच्या दृष्टीनं वैज्ञानिक पुराव्यांविना मतंही मांडली होती, मात्र त्याची काही मूलभूत तत्वे – जसं संपूर्ण धान्यांचा वापर, भरपूर फळे-भाज्या, स्वच्छ पाणी, नियमित दिनचर्या, ताजी हवा आणि जेवताना मानसिक प्रसन्नता यांना आजही आधुनिक वैद्यकशास्त्र पाठिंबा देते.
कधीकधी इतिहासातील एखादा माणूस औषध शोधत नाही, तो लोकांना जगण्याची पद्धत शिकवतो… सिल्वेस्टर ग्रॅहम हा त्यापैकीच एक!
…आणि म्हणूनच प्रत्येक वेळी बिस्किट हातात घेताना लक्षात ठेवा, ते केवळ एक बिस्किट नाही; ते एका आरोग्यक्रांतीची चव आहे. शक्यतो क्रिम – चॅाकलेट – फ्लेवर्ड – कूकिज् बिस्किटं टाळत मैद्याऐवजी गहू, ओट्स किंवा नाचणीपासून बनवलेली शुगरफ्री, मल्टिग्रेन किंवा माल्ट बिस्किटांना प्राधान्य द्या!


