अध्याय चौदावा
प्रतिबिंबौनि बिंबवरी । प्रभेची जैसी उजरी । ते सोऽहंवृत्ती अवधारीं । तैसी होय ॥391॥ ऐसेनि मग परस्परें । ते सोऽहंवृत्ति जैं अवतरे । तैं तियेहिसकट सरे । आपैसया ॥392॥ जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजीं पांडवा । विरालेया विरवावा । हेंही ठाके ॥393॥ नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण । तैसें भेदु नाशूनि जाण । ज्ञान नुरे ॥394॥ माझें पैलपण जाये । भक्त हें ऐलपण ठाये । अनादि ऐक्य जें आहे । तेंचि निवडे ॥395॥ आतां गुणातें तो किरीटी । जिणे या नव्हती गोष्टी । जे एकपणाही मिठी । पडों सरली ॥396॥ किंबहुना ऐसी दशा । तें ब्रह्मत्व गा सुदंशा । हें तो पावें जो ऐसा । मातें भजे ॥397॥ पुढतीं इहीं लिंगीं । भक्तु जो माझा जगीं । हे ब्रह्मता तयालागीं । पतिव्रता ॥398॥ जैसें गंगेचेनि वोघें । डळमळित जळ जें निघे । सिंधुपद तयाजोगें । आन नाहीं ॥399॥ तैसा ज्ञानाचिया दिठी । जो मातें सेवी किरीटी । तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं । चूडारत्न ॥400॥ यया ब्रह्मत्वासीचि पार्था । सायुज्य ऐसी व्यवस्था । याचि नांवें चौथा । पुरुषार्थ गा ॥401॥ परी माझें आराधन । ब्रह्मत्वीं होय सोपान । एथ मी हन साधन । गमेन हो ॥402॥ तरी झणे झणे ऐसें । तुझ्या चित्तीं पैसें । पैं ब्रह्म आन नसे । मीवांचूनि ॥403॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : घृताचें थिजलेंपण, न मोडितां घृतचि जाण
अर्थ
प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रभेचा एकसारखा सरळपणा असतो. तशी ती सोऽहंवृत्ती आहे असे समज. ॥391॥ याप्रमाणे जीव ब्रह्म या दोहोत (जीवाच्या ठिकाणी) जेव्हा सोsहंवृत्ति (ते ब्रह्म मी आहे अशी वृत्ती) प्रकट होते, तेव्हा ती सोsहंवृत्तीसुद्धा आपोआप नाहीशी होते. ॥392॥ अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात विरघळल्यावर तो (मिठाचा खडा) विरघळला हेही नाहीसे होते. ॥393॥ अथवा गवत जाळून जसा अग्नीही आपण विझतो त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान (शिल्लक) राहात नाही. ॥394॥ मी मायेच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे, असा माझ्यांत व भक्तांत असलेला पलीकडेपणा व अलीकडेपणा नाहीसा होतो. (आणि माझ्यामध्ये व भक्तांमध्ये) अनादि जे ऐक्य आहे तेच प्रकट होते. ॥395॥ अर्जुना, आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच राहात नाही, कारण की, आता एकपणाही सरला. ॥396॥ फार काय सांगावे! अशा प्रकारची जी अवस्था ते, हे मर्मज्ञ अर्जुना, ब्रह्मत्व होय. वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारित्वाने मला भजतो, त्यास ते प्राप्त होते. ॥397॥ शिवाय, आणखी या लक्षणांनी युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे, त्याच्याकरिता ही ब्रह्मता पतिव्रता आहे. ॥398॥ ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते, त्याला समुद्राचे स्नान अवश्य मिळतेच यात अन्यथा नाही. ॥399॥ त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो, तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटावर अग्रभागी असणारे रत्न (मुकुटामणी) होतो. ॥400॥ अर्जुना, या ब्रह्मत्वालाच सायुज्य असे म्हणतात व चौथा पुरुषार्थ हे यालाच नाव आहे. ॥401॥ परंतु माझी भक्ति ही ब्रह्मस्थितीच्या (ठिकाणी पोचण्याचे) साधन आहे. म्हणून ब्रह्मत्वी पोचण्याचे मी (कृष्ण) साधन आहे, असे तुला कदाचित वाटेल ॥402॥ तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल तर ती येऊ देऊ नकोस. अरे, माझ्यावाचून ब्रह्म निराळे नाही. ॥403॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तेजाचा तेजौनि निघाला, परी तेजींचि असे लागला


