भाग – 2
मानस हा सुभाष-सुनीताचा एकुलता एक मुलगा. दोघांच्या आशा, स्वप्नं सगळी मानसभोवती केंद्रित झालेली. दहावीच्या परीक्षेत त्याला 98 टक्के मार्क मिळाले होते. सुभाष ऑफिसमधून घरी आला. येताना त्याने पेढे आणले होते. मानसला जवळ घेऊन त्याने त्याला पेढा खाऊ घातला. नंतर ते मानसच्या क्लासमध्ये पेढे द्यायला गेले. क्लासमध्ये खूप गर्दी होती. रिझल्ट लागलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सरांना भेटायला आले होते.
मानसला आठवलं या क्लासमध्ये नववीत 80% असलेल्यांनाच प्रवेश मिळाला होता. याचा अर्थ सगळी स्कॉलर मुलंच इथे घेतली जात होती. ही मुळातच स्कॉलर असलेली मुलं अर्थातच चांगले मार्क्स मिळवणारच होती. त्याला प्रश्न पडला, ‘मग या मुलांच्या यशात क्लासचा रोल काय होता? आणि कमी टक्के असलेल्या मुलांनी चांगल्या क्लासमध्ये शिकायचंच नाही का? हुशार नसलेल्या मुलांनी मग जायचं कुठे?’
11वी-12वी करून मेडिकलला जायची मानसची इच्छा होती. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, असं सुनीता-सुभाषचंही स्वप्न होतं. शहरातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये वार्षिक 15 हजार रुपये भरून मानसने प्रवेश घेतला. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मानस दोन तासांतच परत आला. कारण वर्गात दोन-चार मुलंच असल्याने लेक्चर्सच होत नव्हती. सगळी मुले क्लासला जात होती आणि फक्त प्रॅक्टिकललाच येत होती. किमान 10 मुले असली तर, लेक्चर्स घेता येतील, असे खुद्द प्राचार्यच म्हणाले.
एकदा प्रॅक्टिकलला गरीब घरची चार-पाच मुलांसह इतर काही मुले लेक्चर्ससाठी तयार झाली. मानसने सगळी मुलं-मुली मोजली… 15-16 भरली. दुसऱ्या दिवसापासून कॉलेजमध्ये लेक्चर्स सुरू झाले. मानस सकाळी कॉलेजला, तर संध्याकाळी क्लासला जाऊ लागला. एक गोष्ट मानसच्या लक्षात येत होती, ती म्हणजे क्लासमध्ये 125 विद्यार्थी असल्याने कुणाही विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जात नव्हतं. त्यातच परीक्षेच्या गुणांना केंद्रीत करून शिकवलं जात होतं. विषयांचं सखोल ज्ञान मिळावं, असं ना तर क्लासवाल्यांना वाटत होतं, ना विद्यार्थ्यांना!
हेही वाचा – मानसची क्लास ॲडमिशन
वार्षिक परीक्षा सुरू झाली तसं मानसवर आई-वडिलांच्या अपेक्षांचं प्रचंड दडपण आलं. खरंतर, अकरावीच्या मार्क्सचा काहीही फरक पडणार नव्हता, पण बारावीत आपण काय दिवे लावणार आहोत, हे त्या मार्क्समुळेच कळणार होतं. मानसने रात्रीचा दिवस केला आणि परीक्षा दिली. रिझल्ट लागला. मानसला 88 टक्के मिळाले. ते मार्क्स पाहून सुभाष-सुनीताचे होश उडाले.
“बघ मानस, तुला आम्ही म्हणत होतो, चांगला क्लास लाव. पण तू ऐकलं नाहीस. बघितलं ना काय झालंय ते!” सुनीता रडवेली होत म्हणाली.
“अगं आई, क्लासवर काहीही नसतं. जो क्लास बाबा लावायचं म्हणत होते, त्या क्लासचा रिझल्ट आमच्या क्लासपेक्षाही कमी आहे. आमच्या क्लासमध्ये मी दुसरा आलोय. पहिल्या नंबरच्या मुलालाही 90 टक्के आहेत. एवढं काही वाईट घडलेलं नाहीये. अजून एक वर्ष बाकी आहे. होईल प्रगती…” मानस वैतागून म्हणाला.
“अरे पण बेटा, मेडिकलच्या दृष्टीने इतके मार्क्स पुरेसे नाहीयेत. शिवाय, आता ‘नीट’ही द्यावी लागेल. त्यादृष्टीने चांगला क्लास लावणं आवश्यक नाहीये का?” सुभाषने विचारलं.
“बाबा, तुमचीच काय सगळ्यांचीच ही मानसिकता झालीय की, क्लास लावल्याशिवाय चांगले मार्क्स मिळत नाहीत म्हणून… आपला आत्मविश्वास कमी पडतो म्हणून आपल्याला तसं वाटतं. तुमच्या काळातही डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ झालेत. कधी त्यांनी क्लासेस लावलेत?”
“अरे बेटा, तो काळ वेगळा होता. त्यावेळी इतकी जीवघेणी स्पर्धा नव्हती. आजकाल पॉइंट फाइव्ह मार्कांनी ॲडमिशन हुकतात…” सुभाष त्याला समजावत म्हणाला.
“मान्य आहे बाबा मला, पण मेडिकलला ॲडमिशन नाही मिळाली तर आभाळ थोडीच कोसळणार आहे? दुसऱ्याही शाखा आहेत. आर्ट्स ग्रॅज्युएट आयएएस होऊन कलेक्टर बनतात. कॉमर्सवाले चार्टर्ड अकाऊंटंट बनून डॉक्टर इतकाच पैसा कमवतात. इंजिनीअरिंगच्या अनेक अशा शाखा आहेत, जिथे खोऱ्याने पैसा मिळू शकतो. अहो, अंगठाछाप लोक आमदार, खासदार बनतात…” बोलता बोलता मानस हसला, पण सुभाष-सुनीता गंभीर होते.
“मानस, हा गंमतीचा मुद्दा नाहीये. डॉक्टरांचं स्टेटस काही वेगळंच असतं. तू डॉक्टर व्हावंस, असं आमचं स्वप्न आहे. त्याकरिता आम्ही काहीही करायला तयार आहोत. बरं, तू आता कुठे क्लास लावणार आहेस?” सुनीताने विचारलं.
हेही वाचा – आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…
“मी कुठेच क्लास लावणार नाहीये आई. मी घरीच अभ्यास करणार आहे!”
“कायsss?” दोघंही जवळजवळ ओरडलेच, “वेडबिड लागलंय का तुला?”
“नाही आईबाबा, कॉलेजमधली लेक्चर्स रेग्युलर अटेंड केली आणि घरी नियमित अभ्यास केला तर क्लासची गरजच नाहीये. क्लास अटेंड करण्यात दिवसातले बहुमूल्य चार-पाच तास वाया जातात, असं माझ्या लक्षात आलंय. आपल्याला मेडिकलसाठी प्रचंड पैसा लागणार आहे. क्लासच्या अवाढव्य फीमध्ये तो घालवणं योग्य नाही. मी सगळा सारासार विचार केलाय. तुम्ही काही काळजी करू नका. मला मेडिकलला नक्की ॲडमिशन मिळेल….” आणि तो उठून त्याच्या रूममध्ये निघून गेला. सुभाष-सुनीता त्याच्याकडे बघतच राहिले.
0000
कॉलेज सुरू झालं आणि एक नवाच प्रॉब्लेम उभा राहिला. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीत क्लासेस लावले नव्हते, त्यांनी बारावीत क्लासेस लावून घेतले आणि हे विद्यार्थी कॉलेजमधल्या लेक्चर्सला गैरहजर राहू लागले. ज्या मुलांना काही महत्वाकांक्षा नव्हती, फक्त ग्रॅज्युएशन करायचं होतं, तीच मुलं फक्त कॉलेजमध्ये हजर रहायची. पण त्यात नियमितपणा नव्हता. अर्थातच, लेक्चर्स अनियमित होऊ लागली. मानस मग कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन अभ्यास करू लागला. पण अनेक मुद्दे त्याला समजायचे नाहीत… बरीच गणितं सुटता सुटत नसायची… अडचणी वाढत चालल्या होत्या. त्याच्या मनाची घालमेल वाढायला लागली. आपण क्लास सोडून चूक केली, असं त्याला वाटू लागलं.
एक दिवस तिरीमरीत त्याने प्राचार्यांचं ऑफिस गाठलं. आपल्या आर्थिक परीस्थितीची, आई-वडिलांच्या अपेक्षांची आणि क्लास सोडल्याची माहिती प्राचार्यांना दिली. त्यांनी मानसला खुर्चीत बसायला सांगितलं…
“तुझ्या धाडसाचं मला कौतुक वाटतं मानस! मागील वर्षी तुझ्याच पुढाकारामुळे आपण लेक्चर्स सुरू केल्याचं मला आठवतंय. विषय समजण्यात अडचणी येतातच… पण तू काळजी करू नकोस…” त्यांनी बेल वाजवून शिपायाला बोलावलं. सगळ्या विषयाच्या प्राध्यापकांना बोलावून घेतलं. मानसकडे बोट दाखवत ते म्हणाले,
“या मुलाने कॉलेजमध्ये चांगलं शिकवतात म्हणून क्लास सोडला आणि आता विद्यार्थीच येत नाहीत म्हणून आपलीही लेक्चर्स होत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की, त्याला केव्हाही अडचण आली, तर त्याला मार्गदर्शन करावं…”
“सर, आम्ही केव्हाही तयार आहोत. लेक्चरला विद्यार्थी नसले की, आम्ही रिकामेच असतो,” बायोलॉजीचे प्राध्यापक म्हणाले, “आणि मानस तू अगदी माझ्या घरीही आलास तरी चालेल!” सगळे प्राध्यापक मदत करायला तयार आहेत, हे पाहून मानसचा जीव भांड्यात पडला. एक प्रश्न मार्गी लागला होता!
फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला मानसची परीस्थिती सगळ्या विद्यार्थ्यांना कळली. बऱ्याच जणांनी त्याला मूर्खात काढलं. पण ज्या मुलीकरिता त्याने तो नावाजलेला क्लास सोडला होता, ती मानसकडे आली आणि म्हणाली,
“मानस आमच्या क्लासच्या नोट्स खूप चांगल्या असतात. मी त्या तुला आणून देईन. पण तू म्हणतो, ते खरंय. या क्लासेसचा नुसता बाजार झालाय… आणि इतकं दमायला होतं बघ. हा क्लास झाला की, तो क्लास… तो झाला की, हा क्लास… अभ्यास करायचीही इच्छा उरत नाही घरी गेल्यावर. पण काय करणार? आई-वडिलांच्या आग्रहाखातर यावं लागतं. आपल्या स्कोअरची चिंता आपल्यापेक्षा त्यांनाच जास्त असते.”
मानसला आपल्या आई-वडिलांची आठवण झाली. म्हणजे सगळीकडे पालकांचा प्रश्न समान होता तर!
0000
मानसची सहामाही आठवड्यावर राहिली आणि सुनीता काविळीने आजारी पडली. उपचार सुरू होते, पण सुनीताला काम करवेना. स्वयंपाकघरात तर उभं सुद्धा रहावत नव्हतं, इतकी मळमळ सुटायची. सुभाष तर सकाळी नऊला गेला की, रात्री नऊलाच परतायचा. घरात कामाला कधीच बाई नव्हती. शेवटी सगळ्या कामांची जबाबदारी मानसवरच पडली. कपडे धुणं, भांडी स्वच्छ करणं, आईसाठी बिनातेलाच्या भाज्या करणं, स्वतःसाठी आणि वडिलांसाठी वेगळ्या भाज्या करणं, घराची साफसफाई… हे सगळं त्यालाच करावं लागत होतं.
हेही वाचा – जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक…
या सगळ्या गडबडीत त्याचा अभ्यास मात्र जेमतेमच होत होता. सुनीताला ते कळत होतं. तिने या कामासाठी बाई मिळवण्याचाही प्रयत्न करून पाहिला. पण सणवाराचे दिवस असल्याने बाईही मिळेना. परीक्षा सुरू झाली. रात्रीची जागरणं, सकाळी पहाटे उठून सर्व कामं करून मानस परीक्षेला जायचा. तो पेपर देऊन आला की, सुनीता त्याला ‘कसा गेला पेपर’ असं विचारायची. तो ‘चांगला गेला’ म्हणायचा, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिला सगळं काही सांगून जायचे.
“माझ्यामुळे तुझा अभ्यास होत नाही ना मानस?” एक दिवस तिने त्याला विचारलंच.
तो हसून तिच्या शेजारी बसला.तिचा हात हातात घेऊन म्हणाला,
“असं काही नाहीये आई… आणि ही परीक्षा काही महत्त्वाची नाहीये. चालतंच थोडंफार… आम्ही आजारी पडलो की, तू घेतेच ना आमची काळजी! मग एखादेवेळी आम्ही तुझी घेतली तर बिघडलं कुठं?”
त्याचा समजुतदारपणा पाहून तिला भडभडून आलं…
“दुसरी वेळ असती तर, काही वाटलं नसतं रे. ऐन परीक्षेच्या वेळी असं व्हावं… वाईट वाटतं रे…” आणि ती रडू लागली.
“नको रडू आई…” तो तिला जवळ घेऊन म्हणाला, “वार्षिक परीक्षेला मी चांगली तयारी करेन. त्यावेळेस मात्र तू एकदम फिट रहायचं हं… आणि सुटीही घ्यायची दहा-बारा दिवस!”
“हो रे… घेईन मी, पण आम्हाला निराश तर करणार नाहीस ना मानस?”
“नाही गं आई… तू बरी झालीस की, मी जोमाने अभ्यासाला लागणार आहे… बरं, तू आता कर आराम. मी थोडा वेळ अभ्यास करून स्वयंपाकाला लागतो.”
दैवयोग पहा मानसची परीक्षा संपली आणि सुनीताला बरं वाटायला लागलं. कमीतकमी दिवाळी तरी आनंदात जाईल, एवढंच समाधान सुनीताला वाटत होतं.


