डॉ. किशोर महाबळ
सुदृढ शरीर असलेल्या प्रत्येक मुलामुलीला बालपणापासूनच योग्य पोषक आहार मिळाला, तर युवावस्थेपर्यंत त्यांच्यातील शारीरिक क्षमता वेगाने वाढत जाते. या क्षमतेतूनच अमर्याद ऊर्जा निर्माण होत जाते. उत्साह आणि उत्सुकतेची जोड मिळाल्यास ही ऊर्जा अधिकच प्रभावी आणि सामर्थ्यवान होते. तिला प्रकट होण्यापासून रोखणे जवळजवळ अशक्यप्राय असते; ती विविध पद्धतीने प्रकट होतेच. वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून, विचारातून तर कधी कल्पनाशक्तीतून अत्यंत तीव्रतेने आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे ही ऊर्जा सतत समोर येते. ती अत्यंत वेगवान पाण्याच्या प्रवाहासारखी, खूप उंचावरून प्रचंड गतीने भूमीवर पडणाऱ्या धबधब्याप्रमाणे असते. ती नियंत्रित करणे, हे अत्यंत कठीण असते. ती काही प्रमाणात आणि अत्यंत अल्पकाळासाठी मोठ्या कष्टाने नियंत्रित करणे क्वचितच शक्य होते. आपण बालकांच्या वर्तनाचे निरीक्षण केल्यास, हे सहज लक्षात येते.
या उर्जेमुळेच बालकांच्या तसेच कुमार आणि युवकांच्या वागण्यात मुख्यत्वे अतिशय चंचलता, अधीरता दिसते. कोणतीही भावना अत्यंत तीव्रतेने व्यक्त केली जाते. एकाग्रतेचा, सातत्याचा, चिकाटीचा अभाव असतो. मनात आलेली प्रत्येक गोष्ट लवकरात लवकर झालीच पाहिजे, इतरांनी आपल्या मनासारखे वागलेच पाहिजे, अशी अपेक्षा असते आणि तसे झाले नाही, तर परिणामांची फिकीर न करता कसेही वागणे त्यांना योग्य वाटते.
याचाच पुढचा टप्पा असतो… तो म्हणजे उच्छृंखलपणे, बेफिकीरपणे, उद्धटपणे वागणे… याशिवाय, मुद्दाम कोणतेच नियम न पाळणे, आईवडील आणि पालकांचे न ऐकणे, अभ्यासात लक्ष न देणे अशा स्वरूपाचे वर्तनही दिसू लागते. हे सगळे वर्तन या वयातील शारीरिक क्षमता आणि उदंड उर्जेमुळे, त्या मुलासाठी, त्याच्या कुटुंबासाठी तसेच समाजासाठी किती धोकादायक होऊ शकते, याची असंख्य उदाहरणे आता जागोजागी अनुभवास येऊ लागली आहेत. काही सन्मान्य अपवाद वगळता घराघरामध्ये बालकांच्या, कुमारांच्या आणि युवकांच्या वर्तनविषयक असंख्य समस्या दिसू लागल्या आहेत.
अगदी सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातही यापूर्वी क्वचितच आढळणारी व्यसनाधीनता, पैशाची उधळपट्टी करण्याची हौस, चैनीसाठी चोरी करणे, उद्धटपणा, उर्मटपणा, अगदी आई वडिलांना धमकी देणे… इथपर्यंतच्या विविध समस्या दिसू लागल्या आहेत. अनेकदा कोणतेही मार्गदर्शन नसल्याने, प्रोत्साहनाच्या अभावाने, चांगले काय आणि वाईट काय हे माहीत नसल्याने आणि माहीत असूनही वाईट गोष्टींच्या आकर्षणामुळे, आपली शक्ती कुठे उपयोगात आणावी हे न कळल्याने विद्यार्थ्यांचे जीवन दिशाहीन होऊ लागले आहे. आपल्यातील उर्जेचा उपयोग कुठे आणि कसा करावा, हेच त्यांना कळेनासे झाले आहे. त्यामुळेच ते आपल्या या अदम्य उर्जेचा उपयोग आता त्यांना जे जे आवडेल, ते ते साध्य करण्यासाठी करू लागले आहेत. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या असंख्य समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या समस्या विद्यार्थ्यांच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा आहेत. त्याच्या जीवनाला उद्ध्वस्त करणाऱ्या, त्याच्यातील दुष्प्रवृत्ती वाढविणाऱ्या ठरणार आहेत. त्याच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने तर त्या अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या आहेत.
हेही वाचा – प्रत्येक विद्यार्थ्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलेच पाहिजे…
या प्रश्नांवर पालक आणि शिक्षकांना तातडीने उत्तर शोधावे लागणार आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी सध्या आपण जे मार्ग अवलंबितो आहोत, त्यापेक्षा वेगळे मार्ग तसेच पद्धती आपल्याला अवलंबाव्या लागणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यामधील निसर्गदत्त उर्जेला योग्य दिशा देणे, हे या विविध समस्यांचे खरे उत्तर आहे. यासाठी अगदी लहान वयातच प्रत्येक विद्यार्थ्याच्या निसर्गदत्त क्षमता, अभिरूची, गुणवत्ता, कल, आवडनिवड, बुद्धिमत्तेचा प्रकार ओळखणे सर्वात महत्त्वाचे आहे.
मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने काही प्रमाणात का होईना, व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू निश्चितपणे लक्षात येऊ शकतात. तसेच, सकारात्मक वर्तनाचे निरीक्षण करूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू ओळखता येऊ शकतात. तसा प्रयत्नही पालकांनी आवर्जून केला पाहिजे. हे पैलू ओळखण्याचा प्रयत्न सतत वर्षानुवर्षे करावा लागतो. जे जे पैलू जसजसे लक्षात येत जातील, तसतसे ते विकसित करण्यासाठी काय काय करता येऊ शकते, याची माहिती करून घेणे, हा त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या पैलूंना पोषक असे कोणते छंद आहेत, कोणत्या कला आहेत याची माहिती मिळविणे उपयुक्त ठरेल. याशिवाय, कोणते शैक्षणिक उपक्रम व्यक्तिमत्वातील या पैलूंना विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतील हे शोधणे गरजेचे आहे.
थोर महापुरुष, वैज्ञानिक, कलाकार, संशोधक, खेळाडू यांची चरित्रे विद्यार्थ्यांना अत्यंत मार्गदर्शक ठरू शकतात. कोणती पुस्तके प्रेरणादायी ठरू शकतील, याचा अंदाज घेता येऊ शकतो. माहितीच्या महाजालाचा म्हणजेच इंटरनेटचाही यासाठी उपयोग करता येऊ शकतो. यातून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वातील पैलूंना पोषक आणि साहजिकच त्यांच्या आवडीच्या कला, छंद आणि शैक्षणिक उपक्रमांकडे त्याचे लक्ष वेधायचे आणि त्यात सहभागी होण्याची त्यांना प्रेरणा द्यायची, हे कार्य पालक आणि शिक्षकांनी करायला हवे. असे उपक्रम घेणाऱ्या संस्थांची मदत यासाठी घेता येईल. अशा संस्था नसतील, तर आपल्याला शक्य असेल तेवढे प्रयत्न आपल्याच पातळीवर सुरू करता येतात.
विद्यार्थ्यांच्या आवडीच्या कला, छंद, शैक्षणिक ॲक्टिव्हिटी अशा सकारात्मक उपक्रमांमध्ये भाग घेण्यास त्याला प्रोत्साहन देणे एवढेच गरजेचे असते. हे एवढे जरी पालकांनी आणि शिक्षकांनी केले, करण्याचा थोडासा प्रयत्न जरी केला, तरी ते विद्यार्थ्यांमधील उदंड उर्जेला दिशा देण्यासाठी खूप काही करू शकतील. या अनुभवातूनच त्यांना अजून काय केले पाहिजे, हे कळू शकेल. बाल आणि कुमार वयातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सहसा काय आवडते, याचाही शोध घेणे उपयुक्त ठरते. सहसा सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळायला हवे असते. त्यांना प्रयोग करायला आवडते. त्यांना सतत काहीनाकाही नवीन करावेसे वाटते. त्यांना धाडस, पराक्रम, शौर्य आणि चातुर्याने परिपूर्ण अशा कथा ऐकायला आणि वाचायलाही आवडतात आणि असेच धाडस, पराक्रम आणि शौर्य आपणही दाखवावे असे वाटते. त्यांना कोणत्याना कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायला, बहुतेकांना गाणी म्हणायलाही आवडते. आपल्या समवयस्कांबरोबर भरपूर गप्पा मारायला, फिरायला तसेच नवनवीन गोष्टी बघायला आवडतात. जादू आवडते. विविध चटकदार पदार्थ खायला, वेगवेगळ्या प्रकारचे वेष घालायला आवडते. त्यांना उत्साही व्यक्ती आवडतात. कोणतीही एकच गोष्ट वारंवार करणे मुळीच आवडत नाही. कोणतीना कोणती कला, जोश आणि उत्साहपूर्ण असे उपक्रम, तालावर नृत्य करायला आवडते. या सर्व गोष्टी नैसर्गिक आणि सहसा चांगल्याच असतात.
अशा या बऱ्याचशा गोष्टी सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना आवडत असल्या तरीही प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा आवडीच्या गोष्टी, छंद असतातच. त्याही लक्षात घेतल्याच पाहिजेत. या सर्व गोष्टी उपयुक्त असतात, महत्त्वाच्या असतात. परीक्षेत फक्त भरपूर गुण मिळविण्यापेक्षा अनेक दृष्टींनी जास्त मौलिक महत्त्वाच्या असतात. कारण, त्यामुळे आनंदी सर्जनशील आणि खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन जगणे विद्यार्थ्याला शिकता येते. आवडीच्या गोष्टी करताना, छंद जोपासताना या विद्यार्थ्यांमधील अमर्याद ऊर्जा सकारात्मक पद्धतीने व्यक्त होऊ लागते. या गोष्टीतून त्याला नवनिर्मितीचा विलक्षण आनंद मिळतो. यातून तो जे जे शिकतो ते सकारात्मक, मौलिक, व्यक्तिमत्त्वाला दिशा देणारे ठरते. त्याला यातून मिळणारा अनुभव त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. या प्रयत्नातून तो त्याच्या आवडीच्या क्षेत्रात प्रयोग करू लागतो, आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त अभ्यास करू लागतो. हवे तेवढे परिश्रम करू लागतो. प्रचंड उत्साहाने, आनंदाने आणि एकाग्रतेने हे सुरू असते. यामुळे त्याच्यात एरवी दिसणारी चंचलता मागे पडते.
हेही वाचा – शिक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली कशी असावी आणि कशी नसावी!
अंगातील ऊर्जा आता चिकाटी, जिद्द, सातत्य यातून प्रकट होऊ लागते. असामान्य ध्येयवाद, निष्ठा, परिश्रम, कल्पनाशक्ती, सर्जनशीलतेच्या रूपात व्यक्त होऊ लागते. शारीरिक क्षमता आणि ऊर्जा ही सकारात्मक कार्यासाठी उपयोगात येऊ लागते. असे विद्यार्थी अन्य बाह्य आकर्षणाने विचलित होत नाहीत. चैनबाजी किंवा अन्य नकारात्मक गोष्टी करणे त्यांना अनावश्यक वाटू लागते. त्यांच्या जीवनाला आपोआपच शिस्त लागते, ती प्रामुख्याने स्वयंशिस्त असते. असंख्य चांगले बदल त्यांच्या व्यक्तिमत्वात घडून येतात. कारण लहान वयातच त्यांना आपल्यातील अमर्याद उर्जेचा उपयोग कशासाठी करायचा, हे त्यांच्या लक्षात आलेले असते. त्यांनी आपल्यातील उर्जेला अनियंत्रित होऊ न देता तिला विशिष्ट सकारात्मक दिशा दिलेली असते. असे विद्यार्थी जीवनात आश्चर्यकारक प्रगती करतात आणि यश मिळवतात.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वातील पैलूंना विकसित करण्यासाठी योग्य अशी संधी, मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे हे नितांत गरजेचे आहे. त्याच्यातील क्षमता, गुणवत्ता, विकसित करण्यासाठी पोषक ठरतील, असे उपक्रम गरजेचे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांतील ही अमर्यादित क्षमता आणि ऊर्जा ही त्याचे जीवन समृद्ध तसेच विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. मात्र यासाठी पालकांनी, शिक्षकांनी ही जबाबदारी एकमेकांकडे न ढकलता ती आपलीच जबाबदारी आहे, असे मानून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या मुलामुलींच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक पैलूंचा शोध घ्यायला सुरुवात करायला हवी. प्रत्येक सकारात्मक पैलू, सद्गुण, क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. त्याला त्याच्या क्षमतांची जाणीव करून दिली आणि योग्य ते प्रोत्साहन दिले तर आज वाया जाणारी अमर्याद ऊर्जा त्याच्या व्यक्तिमत्वाला सकारात्मक दिशा देणारी ठरेल.


