डॉ. किशोर महाबळ
आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये शाळा या सहसा तेच तेच विद्यार्थी स्पर्धक म्हणून पाठवितात. असे का होते? कारण अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘क्रीडाविषयक बुद्धिमत्ता’ असलेल्या नव्या खेळाडूंचा शोध घेतला जात नसावा. खरेतर, असा शोध घेण्याची उत्तम संधी शारीरिक शिक्षकांना दर आठवड्यात मिळते. सर्व शाळांमध्ये दर आठवड्यात साधारणतः प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणासाठी कमीत कमी दोन तासिका असतात. या तासिकांत सहसा कवायत, व्यायामाचे विविध प्रकार तसेच खेळ शिकविले जातात आणि तसे अपेक्षितही असते. असे असूनही बहुतांश विद्यार्थ्यांना हे वर्ग नकोसे वाटतात. याचे एक कारण म्हणजे काही शिक्षकांचा अपवाद वगळता शारीरिक शिक्षणाची तासिका घेणारे शिक्षक हे सहसा चिडचिड करणारे, विद्यार्थ्यांचे काही चुकल्यास ओरडणारे, छडी घेऊन उभे असलेले आणि कवायत करताना विद्यार्थी हे नियम तोडणारच आहेत, असे गृहीत धरून सर्वांकडे संशयाने बघणारे असतात. शारीरिक शिक्षण हे बहुधा अत्यंत हुकूमशाही पद्धतीने शिकविले जाते आणि त्यामुळे जीवनभर अत्यंत उपयोगी पडणारे हे शिक्षण विद्यार्थ्याना नकोसे वाटते. परिणामी सर्वात जास्त दुर्लक्षिले जाते.
सहसा शाळेत शिस्त ठेवण्याची, विद्यार्थ्यांना मारहाण करून शिक्षा करण्याची जबाबदारी शारीरिक शिक्षक स्वीकारतात आणि विद्यार्थ्यांना मारहाण करून शिस्त ठेवण्यात आनंद मानू लागतात. ही अत्यंत नकारात्मक भूमिका मग त्यांच्या व्यक्तिमत्वात त्यांच्याही नकळत अत्यंत कडवटपणा आणते. कालांतराने तोच कडवटपणा त्यांनाही आवडू लागतो. मग येताजाता विद्यार्थ्यावर ओरडण्यात किंवा कोणाला तरी शिक्षा करण्यात त्यांचा वेळ जाऊ लागतो. साध्या शारीरिक शिक्षणाच्या वर्गातही मग तो कडवटपणा व्यक्त होतो आणि अत्यंत आनंदाने शिकविण्याचा विषय हा शिस्त शिकविण्यात व्यतित होतो. शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी आपली ही प्रतिमा बदलविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा.
काही सन्मान्य अपवाद वगळता विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीकडे लक्ष देणाऱ्या शाळा शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. शाळेमध्ये मैदान नसले तरीही या शाळांच्या संचालकांना आपले काही चुकते आहे, असे वाटत नाही. कारण, त्यांना शाळेचे जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटमध्ये आणायचे एवढेच मनात असते. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षणाची काय स्थिती असेल ते आपण समजू शकतो. दुर्दैवाने, उच्चविद्याविभूषित पालकांनाही यात काहीही वावगे वाटत नाही, कारण त्यांना केवळ बौद्धीक विकासच महत्त्वाचा वाटतो. खरेतर, उत्तम बौद्धीक विकासासाठी उत्तम शारीरिक विकास होणे, ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
गेली काही वर्षे नामवंत मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनातून खेळांचे असंख्य लाभ लक्षात आले आहेत. ते थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येतील… खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे नव्हे तर, ते उत्तम विकासासाठी अत्यावश्यक होय. खेळण्यामुळे मेंदू आणि शरीराला एकाचवेळी विश्रांती आणि चेतना मिळते. कल्पनाशक्ती, सृजनशीलता, समस्या सोडविण्याच्या क्षमता विकसित होतात. उत्तम शारीरिक विकास आणि आरोग्यासाठी खेळ अत्यंत उपयुक्त असतात. पुरेशी झोप, योग्य आहार, नकारात्मक भावना आणि अनुभवांचे तसेच ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी खेळणे उपयुक्त ठरते. शारीरिक क्षमता, आत्मविश्वास वाढतो. मेंदूतील ग्रंथीचा उत्तम विकास होतो.
हेही वाचा – शिक्षक आणि प्रतिभेची ओळख
बालपणी विशिष्ट प्रकारचे खेळ खेळल्यास शालेयस्तरावरील गणिताचे अध्ययन अधिक उत्तमरित्या होते. स्मरणशक्ती वाढते. आव्हानांचा सामना कसा करायचा, हे शिकण्यासाठी, वेळ उत्तमरीत्या व्यतीत करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी, जिंकण्याचा आनंद मिळविण्यासाठी खेळ उपयुक्त ठरतात. उत्सुकता, सर्जनशीलता आणि शोधवृत्तीचा खेळण्यामुळे विकास होतो. वेदना, भीती, एकटेपणाची भावना यासारख्या गोष्टींतून मुक्त होण्यासाठी, चिकाटी वाढविण्यासाठी तसेच हार किंवा जीत या दोन्ही गोष्टी सहज स्वीकारण्याची सवय लागण्यासाठी खेळ अत्यंत उपयुक्त ठरतात. इतरांबरोबरचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी, अपमान सहन करण्यासाठी, मतभेद विसरण्यासाठी, इतरांवर विश्वास ठेवण्यास शिकण्यासाठी खेळले पाहिजे.
नेतृत्व गुण, संवाद कौशल्ये, खेळण्यातले स्वातंत्र्य आणि मर्यादा, सहकार्य तसेच संघभावना या सर्व गोष्टी खेळातून शिकता येतात. खेळताना आनंद होतो आणि तो अनेकदा हास्यातून व्यक्त होतो. हसण्यामुळे शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. विद्यार्थ्यांना शाळेत खेळण्याची संधी मिळाल्यास त्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होण्यास खूप उपयुक्त ठरते. शरीराची योग्य पद्धतीने काळजी घेण्याची सवय लागते.
ज्या शाळेत दर 50 मिनिटांनी खेळण्याची संधी मिळते, अशा शाळेतच चीन तसेच जपानमधील सर्वात यशस्वी बुद्धिमान मुले प्रवेश घेतात. विदेशात म्हणूनच खेळांना अतिशय महत्त्व दिले जाते. आपल्या शाळांमध्ये मात्र कवायत शिकण्यापुरतेच शारीरिक शिक्षण मर्यादित झाले आहे. त्यातही काही निवडक विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळते. अनेक विद्यार्थ्यांमधील क्रीडाविषयक बुद्धिमत्ता शोधलीच जात नाही. बहुतांश मुलींच्या बाबतीत तर या संधी दुर्मीळच असतात. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे.
शारीरिक शिक्षणाच्या तासात कमी खर्चाचे विविध खेळ खेळायला सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना मुक्तपणे खेळू दिले पाहिजे. सर्व विद्यार्थी खेळतील, हे बघितले पाहिजे. वर्षभरात सर्व विद्यार्थ्यांना कमीत कमी 25 खेळ सहज शिकविता येऊ शकतात. उंच उडी, लांब उडी, धावणे यासारख्या छोट्या छोट्या खेळांतून विद्यार्थ्यांमधील क्रीडाविषयक बुद्धिमत्तेचा परिचय होऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांना मग अधिक प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी निवडता येऊ शकते. ज्यांच्यात ही विशेष क्रीडाविषयक बुद्धिमत्ता नसेल त्यांनाही खेळण्यास प्रोत्साहन दिलेच पाहिजे, कारण मुळातच खेळणे हे वर उल्लेखल्याप्रमाणे अनेक दृष्टींनी अत्यंत उपयुक्त असते.
हेही वाचा – भाषिक बुद्धिमत्तेचा शोध
स्नेहसंमेलनाच्या वेळीच घाईघाईने क्रीडा स्पर्धा का व्हाव्यात? त्यावेळी विद्यार्थी विविध उपक्रमात व्यस्त असतात. ते या स्पर्धांपासून वंचित राहतात. तेव्हा खरेतर शैक्षणिक वर्षात ठरवून एका विशिष्ट आठवड्यात या सर्व स्पर्धा घेतल्या पाहिजेत, ज्यामुळे सर्वांना त्यात सहभाग घेता येईल. विशेषकरून धावणे, उंच उडी आणि लांब उडी, बुद्धिबळ अशा खेळात भाग घेणे सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यकच केले पाहिजे. अपंग विद्यार्थ्यांसाठीही त्यांना खेळता येईल, असे खेळ आयोजित केलेच पाहिजेत. याचे असंख्य फायदे होतील. विद्यार्थ्यांना आपल्या शारीरिक क्षमतांची जाणीव होईल. त्या क्षमता विकसित झाल्या नसतील तर, त्या विकसित करण्याचे महत्त्व कळेल आणि नकळत त्या दृष्टीने ते प्रयत्न करू लागतील. हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्याचा क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग असलाच पाहिजे, असा आग्रह आपण धरायला हवा. योग्य नियोजन केले, गावातील काही क्रीडा मंडळांची मदत घेतली तर, शाळांमध्ये भव्य क्रीडामहोत्सव घेणे सहज शक्य होऊ शकेल.


