ऑफिसमध्ये एक मीटिंग होती व्हेंडरबरोबर. औपचारिक काम संपलं आणि त्यांनी अचानक विचारलं, “गोडबोले तुमचं गाव कोणतं हो?”
मी बावरलो. काय सांगावं या विचारात पडलो, कारण आम्हाला आता गावच नाही. ‘गाव नाही’ असं सांगितलं की, विचारणारा माणूस पार गोंधळात पडतो आणि विचित्र नजरेनं पाहायला लागतो… ‘काय माणूस आहे, गाव नाही म्हणतोय. मुंबईत राहतोय आणि याला गाव कसं नाही?’ असे काहीसे भाव विचारणाऱ्याच्या चेहेऱ्यावर दाटलेले असतात.
हा अनुभव वारंवार येतो म्हणून मी दामटून देतो, आम्ही पुण्याचे म्हणून. आजोळ पुण्याचं, शुक्रवारातलं म्हणजे हे काही अंशी खरं असतं आणि या उत्तराने बऱ्याच वेळा प्रश्न विचारणाऱ्याचं समाधान पण होऊन जातं.
हेही वाचा – आमचे आबा आणि त्यांची कुंभकर्णी झोप…
तसा हा प्रश्न मला लहानपणापासूनच छळत आलाय. शाळेत असताना, वार्षिक परीक्षा संपली की, बहुतांश मुलांना गावचे वेध लागायचे. बरीच मुलं कोकणातली आणि काही जणं देशावरची असायची. ‘गावाला जायचंय’ या कल्पनेनंच अगदी मोहोरून जायची ती. रातांबे, फणस, आंबे यांची वर्णनं आणि गावातल्या भुताच्या आणि त्या वयातल्या तत्सम बालसुलभ गोष्टी रंगवून रंगवून सांगायची आणि मग आम्ही, गाव नसलेली काही मुलं अगदी हिरमुसून जायचो…
घरी आल्यावर आई बाबांना, ‘आपल्याला गाव का नाही?’ या प्रश्नाने भंडावून सोडायचो. ते तरी काय सांगतील बिचारे? काहीतरी सांगून वेळ मारून न्यायचे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांचं आज असंच झालंय. कोकणस्थ म्हणवतो आपण आपल्याला, पण आपली नाळच तुटलीये कोकणाबरोबर असं कायम वाटत राहतं. गोनिदा, श्रीना, जयवंत दळवी प्रभुतींच्या कादंबऱ्या वाचताना आणि त्यातील त्यांनी समरसून केलेल्या निसर्गाची आणि माणसांची वर्णनं ऐकताना जीव तुटतो. आपण काय गमावलंय, हे ठायी ठायी जाणवत राहतं, शब्दाशब्दांतून. ती संपत्ती, गमावून बसलोय आपण याची खंतही जाणवत राहते.
हेही वाचा – उपम्याला उपमा नाही…
परवा तो प्रश्न पुन्हा एकदा ऐकून खपली निघाली जखमेवरची आणि ठसठस जाणवायला लागली परत…
किती भाग्यवंत ती माणसं, ज्यांची मुळं अजूनही घट्ट आहेत गावच्या मातीत रुजलेली. गुंतलेली आहेत ती माणसं, गावच्या सुखदुःखात. कोणीतरी आहे तिथे त्यांचं! नाहीतर आम्ही, अश्वत्थाम्याच्या आत्म्याप्रमाणे हिंडतोय, या शहरातून त्या शहरात… प्रत्येक पिढीत. प्राक्तन म्हणायचं आणि चालू ठेवायचं, आयुष्य.


