अध्याय चौदावा
कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् । रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥16॥
येणेंचि पैं कारणें । जें निपजे सत्त्वगुणें । तें सुकृत ऐसें म्हणे । श्रौतसमो ॥260॥ म्हणौनि तया निर्मळा । सुखज्ञानी सरळा । अपूर्व ये फळा । सात्त्विक तें ॥261॥ मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी पिकलिया । जें सुखें चितारूनियां । फळती दुःखें ॥262॥ कां निंबोळियेचें पिक । वरि गोड आंत विख । तैसें तें राजस देख । क्रियाफळ ॥263॥ तामस कर्म जितुकें । अज्ञानफळेंचि पिके । विषांकुर विखें । जियापरी ॥264॥
सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च । प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥17॥
म्हणौनि बा अर्जुना । येथ सत्त्वचि हेतु ज्ञाना । जैसा कां दिनमाना । सूर्य हा पैं ॥265॥ आणि तैसेंचि हें जाण । लोभासि रज कारण । आपुलें विस्मरण । अद्वैता जेवीं ॥266॥ मोह अज्ञान प्रमादा । ययां मैळेया दोषवृंदा । पुढती पुढती प्रबुद्धा । तमचि मूळ ॥267॥ ऐसें विचाराच्या डोळां । तिन्ही गुण हे वेगळवेगळां । दाविले जैसा आंवळा । तळहातींचा ॥268॥ तंव रजतमें दोन्हीं । देखिलीं प्रौढ पतनीं । सत्त्वावांचूनि नाणीं । ज्ञानाकडे ॥269॥ म्हणौनि सात्त्विक वृत्ती । एक जाले गा जन्मव्रती । सर्वत्यागें चतुर्थी । भक्ति जैसी ॥270॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नगरेंचि रचावीं, जळाशयें निर्मावीं
अर्थ
सुकृताचे (म्हणजे सात्त्विक कर्माचे) सत्त्वप्रधान निर्मल फल मिळते. राजस कर्माचे फल दु:ख आणि तामस कर्माचे फल अज्ञान असते, असे (ज्ञाते) सांगतात ॥16॥
याच कारणाकरिता जे सत्त्वगुणापासून उत्पन्न होते, ते पुण्यकर्म, असे श्रुतीचा संकेत सुचवितो. ॥260॥ म्हणून त्या निर्मळ सुकृताला सरळ असे सुख व ज्ञान हे लोकोत्तर फळ येते व तेच सात्त्विक फळ होय. ॥261॥ मग राजस क्रिया ज्या आहेत, त्या पिकलेल्या इंद्रावणीच्या फळांप्रमाणे आहेत, कारण की, त्या क्रिया बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगविलेल्या असतात, तरी त्या बियांचे फळ दु:ख हे असते. ॥262॥ अथवा कडुनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आत विष (विषासारख्या कडू) असतात. त्याप्रमाणे ते राजस क्रियांचे फळ आहे, असे समज. ॥263॥ ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषच फळ येते, त्याप्रमाणे जितके तामस कर्म आहे, तितके अज्ञानरूप फळाने पिकते. ॥264॥
सत्त्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते व रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो, तमोगुणापासून प्रमाद व मोह एवढेच नव्हे, तर अज्ञानसुद्धा उत्पन्न होते. ॥17॥
म्हणून बा अर्जुना, जसा सूर्य हा दिनमानाला हेतु आहे, तसा येथे सत्त्वगुणच ज्ञानाला हेतू आहे, ॥265॥ ज्याप्रमाणे अद्वैत परमात्म्याला, आपले स्वरूपविस्मरण हे (जीवदशेला येण्य़ास) कारण आहे, त्याप्रमाणेच लोभाला रज कारण आहे. ॥266॥ हे शहाण्या अर्जुना. मोह, अज्ञान व प्रमाद या मलिन दोषसमूहाला वारंवार तमोगुण कारण आहे. ॥267॥ तळहातावरील आवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा, त्याप्रमाणे हे वेगवेगळे तिन्ही गुण विचाराच्या डोळ्यांना (दिसतील) असे दाखविले, ॥268॥ तेव्हा रजोगुण व तमोगुण हे दोन पतन घडवून आणण्यास समर्थ आहेत आणि सत्त्वगुणांवाचून ज्ञानाकडे कोणी नेत नाही, असे दिसून आले. ॥269॥ म्हणून ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा (आर्त, जिज्ञासू व अर्थार्थी या तीन भक्तींचा) त्याग करून (ज्ञानी भक्त) ज्ञानरूप भक्तीचे जन्मभर आचरण करतात, त्याप्रमाणे कित्येक पुरुष आमरणान्त सात्त्विक वृत्तीने राहण्याचा निश्चय करतात. ॥270॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बुद्धि मेचवेना धोंडीं, हा ठायवरी मवाळें सांडी


