दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 17 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 25 आश्विन शके 1948; तिथि : सप्तमी अहोरात्र; नक्षत्र : मूळ 09:46;
- योग : अतिगंड 23:01; करण : गरज 19:10;
- सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:13;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
सरस्वती पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
अभिनेत्री स्मिता पाटील
टीम अवांतर
आपल्या अभिनय आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणात तर आई विद्याताई पाटील या समाजकारणात कार्यरत होते. त्यामुळे घरातील वातावरण अत्यंत पुरोगामी विचारांचे होते. त्याचा स्मिता यांच्या आयुष्यावर खोलवर प्रभाव पडला.
पुण्यात शाळेत असल्यापासूनच त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतला होता. शिवाय त्या उत्तम ॲथलिटही होत्या. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. चित्रपटसृष्टीशी मात्र त्यांच्या कुटुंबातील कोणाचाच संबंध नव्हता. पुढे संपूर्ण पाटील परिवार मुंबईला आला. त्याचवेळी मराठी दूरदर्शनच्या प्रक्षेपणाला सुरुवात झाली होती. स्मिता त्यांच्या एका मैत्रिणीबरोबर दूरदर्शनमध्ये सहजच गेल्या. त्या ठिकाणी त्यांचीच परीक्षा घेण्यात आली आणि त्यांना दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदकाची संधीही मिळाली. त्यावेळी स्मिता यांचे वय होते अवघं 18 वर्षांचं.
हेही वाचा – पत्रिकेतील ग्रह आणि वास्तू
निवेदनाचे काम करत असतानाच प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल काही कामानिमित्ताने दूरदर्शनमध्ये आले होते त्यांनी स्मिता यांना पाहिलं आणि त्यांना चित्रपटाची ऑफर दिली. स्मिता यांचा चेहरा अत्यंत बोलका असल्याने ‘चरणदास चोर’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या चित्रपटानंतर बेनेगल यांच्याच ‘निशांत’ या चित्रपटामध्ये स्मिता यांनी पुन्हा एकदा काम केले.
सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणाऱ्या स्मिता यांनी जेमतेम एक दशकभराच्या आपल्या कारकिर्दीत 80 हून अधिक हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी भारतात नवीन प्रवाहाची चळवळ असलेल्या समांतर चित्रपटांची एक लाट आली होती. या चित्रपटांमध्ये भूमिका करत स्मिता पाटील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या होत्या. तर दुसरीकडे त्या अनेक मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये देखील दिसल्या.
त्यांच्या अभिनयाची समीक्षकांनी बऱ्याच वेळा प्रशंसा केली होती. त्यांच्या सर्वात उल्लेखनीय भूमिकांमध्ये मंथन, भूमिका, जैत रे जैत, गमन, आक्रोश, चक्र, नमक हलाल, बाजार, उंबरठा, शक्ती, अर्थ, अर्ध सत्य, मंडी, आज की आवाज, चिदंबरम, मिर्च मसाला, अमृत, डान्स डान्स, वारिस अशा चित्रपटांचा समावेश होतो.
अभिनयाव्यतिरिक्त स्मिता सक्रिय स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राच्या सदस्या होत्या. महिलांच्या समस्यांच्या प्रगतीसाठी त्या मनापासून पुढाकार घेत होत्या. याचाच परिणाम म्हणजे पारंपरिक भारतीय समाजातील महिलांची भूमिका, त्यांची लैंगिकता आणि शहरी वातावरणात मध्यमवर्गीय महिलांना तोंड देत असलेल्या बदलांचा शोध घेणाऱ्या चित्रपटांमधून त्यांनी काम केलं.
आपल्या कारकिर्दीत त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1985 मध्ये स्मिता यांना वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी पद्मश्री या भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. दुर्दैवाने 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे त्यांचे अकाली निधन झाले. स्मिता यांच्या स्मरणार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे “स्मिता पाटील पब्लिक स्कूल” ही शाळा चालवली जाते.
आजचे राशिभविष्य
मेष – आज तुमच्या मनातील भावना अधिक तीव्रतेने वर येतील. एखाद्या प्रिय व्यक्तीची अचानक आठवण आल्याने तुम्ही प्रचंड भावनिक होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक गोष्टी सर्वांना सांगणे टाळा. आर्थिकदृष्ट्या आज नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना एखादी चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना नवीन संधींची माहिती मिळेल.
वृषभ – मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आज छोटी बचत उपयुक्त ठरू शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण भविष्यात अचानक एखादा मोठा पण महत्त्वाचा खर्च उभा राहू शकते. घरी आनंदी वातावरण असेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आई-वडिलांच्या आशीर्वादाने थांबलेल्या कामाला गती मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यावसायिक करारामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन – आज, तुमची समज आणि सतर्कता यामुळे कामाच्या ठिकाणी इतरांपेक्षा तुम्ही वेगळे ठराल. वरिष्ठांचा सल्ला गांभीर्याने घ्या, कारण त्यामुळे तुमच्या करिअरमधील प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी वेळ काढाल. संततीच्या शिक्षणाबद्दल चिंता निर्माण होईल, परंतु संयमाने परिस्थिती हाताळा. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात.
कर्क – आज एखादी चांगली बातमी विशेषतः संततीशी संबंधित बातमी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. नोकरीच्या ठिकाणी आतापर्यंत केलेल्या मेहनतीला आता फळ मिळायला लागेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या सरकारी कामांमध्ये प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल, लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. रस्त्याने चालताना आणि गाडी चालवताना विशेष काळजी घ्या.
सिंह – नात्यांमधील प्रेम आणि जवळीकता वाढवण्यासाठी आज दिवस ही एक चांगली संधी आहे. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारतील, कुटुंबात सुरू असलेला एखादा जुना ताण हळूहळू कमी होईल. संततीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमची दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. आज उत्साहाच्या भरात घाईघाईने निर्णय घेणे टाळा. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे काही दिवसांमध्येच चांगले परिणाम मिळू शकतात.
कन्या – संयम आणि समजूतदारपणाने आज अनेक गुंतागुंतीच्या समस्या सोडवता येतील. एखाद्या सरकारी कामाबाबत तुम्हाला काळजी वाटत असेल. मात्र परिस्थिती लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगावी, कारण काही कामे शेवटच्या क्षणी अडकू शकतात. गरज पडल्यास अनुभवी कायदेतज्ज्ञाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.
तुळ – आजचा दिवस जरी सामान्य वाटत असला तरी, आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. एखाद्या दूरच्या नातेवाईकाबद्दलची बातमी तुम्हाला थोडे दुःखी करू शकते. नोकरी बदलण्याचा विचार अधिक दृढ होऊ शकतो आणि तुम्ही नवीन संधी शोधायला सुरुवात करू शकता. एखाद्या खास व्यक्तीला भेटल्याने आयुष्यात काही चांगल्या घटना घडायला सुरुवात होईल. प्रवासादरम्यान मिळालेली महत्त्वाची माहिती भविष्यात उपयोगी पडू शकते.
वृश्चिक – आज स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. किरकोळ शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्यांच्याकडे त्वरित लक्ष द्या. आईने तुम्हाला एखादी जबाबदारी दिली, तर ती मनापासून पार पाडा. प्रार्थना, सभा किंवा धार्मिक समारंभामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. व्यवसायात काही आव्हाने येऊ शकतात, मात्र कुटुंबाच्या पाठिंब्याने ती सोडवण्यास मदत होऊ शकते. आज एखाद्या कामासाठी प्रवासही करावा लागू शकतो.
हेही वाचा – कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा
धनु – आज नवीन जबाबदारी स्वीकारण्याची आणि स्वतःची नेतृत्व क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना नवीन भूमिका किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. संततीसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. कामे पुढे ढकलण्याच्या तुमच्याच सवयीमुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक तयारीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आज मनापासून केलेले प्रयत्न भविष्यातील यशाचा मार्ग मोकळा करू शकतात.
मकर – एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा गंभीर विचार तुम्ही आज करू शकता. व्यवसायातील नफा आणि बऱ्याच काळापासून अडकलेला निधी परत मिळण्याचे संकेत आहेत. मजबूत आर्थिक स्थिती तुमचा आत्मविश्वास वाढवेल. भविष्यातील गरजांसाठी नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते. ऑनलाइन व्यवसायात गुंतलेल्यांनी आपल्या व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी, सर्व आवश्यक माहितीची कसून पडताळणी करा.
कुंभ – मेहनत आणि समर्पण हीच आज तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, आणि त्यावरून तुमचे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाबद्दल चर्चा होऊ शकते. जोडीदारासोबत भविष्यातील महत्त्वाच्या योजनांवर चर्चा कराल. कोणाला तरी दिलेले कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंमध्ये वाढ होण्याचे संकेतही आहेत.
मीन – आजचा दिवस नातलगांची भेट, त्यामुळे होणारा आनंद आणि चांगल्या बातम्यांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. कुटुबासोबत वेळ घालवण्याची आणि आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली सरकारी कामे पुढे सरकण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन सदस्याच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. महत्त्वाच्या व्यावसायिक कराराला अंतिम स्वरूप देण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे कोणतीही घाई करू नका. आरोग्याच्या कोणत्याही समस्यांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या.


