झालं! पुढच्या आठवड्यात नवरात्र येणार म्हणून मी आत्ताच नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या साड्या काढून ठेवल्या. एकेक साडी बाहेर काढताना अचानक मनात विचार आला, कधीपासून आपण नवरात्रीला नऊ रंगांच्या साड्या नेसायला लागलो?
सुरुवातीला हे नऊ रंगांचं फॅड आलं, तेव्हा मी मनातल्या मनात वैतागले होते. काहीही नवीन आलं की, आपण लगेच त्याच्या मागे धावतो. कुणीतरी काहीतरी सुरू केलं आणि आपणही ते फॉलो करतो. पण आज नवरात्र जवळ आलं की, माझं डोकं आपोआप नऊ साड्यांचा विचार करू लागतं. ज्या गोष्टीला कधी ‘फॅड’ म्हटलं होतं, तीच आज अंगवळणी पडली आहे.
एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केली जाते, इतरही ती करू लागतात आणि हळूहळू ती आपल्या जगण्याचा भाग बनते. जी गोष्ट रूढ होते, तीच पुढे रूढी बनते. इतकी, की मग ‘हे आपण का करतो?’ हा प्रश्नही पडत नाही.
अशातच विद्यानंद बापटांसारखी व्यक्ती सणांच्या बदललेल्या स्वरूपावर, वाढत्या गोंगाटावर बोलता बोलता वैतागून म्हणतात, “सण साजरेच करू नका!”
क्षणभर प्रश्न पडतो मग सणच नकोत का?
आणि याच प्रश्नाचं उत्तर मनात कुठेतरी शोधत असतानाच माणकेश्वरच्या सटवाई मंदिरातील एक घटना कानावर आली. मंदिरातील मूर्तीवर वर्षानुवर्षे शेंदूर चढवला जात होता. थरावर थर चढत गेले आणि एक दिवस मूर्तीचं मूळ रूपच त्या शेंदुराखाली लपून गेलं. नंतर हे थर काढण्यात आले आणि समोर आलं एक प्राचीन, देखणं रूप. पुरातत्त्वीय अभ्यासातून ती बाराव्या शतकातील सरस्वतीची मूर्ती असल्याचं स्पष्ट झालं!
हेही वाचा – …म्हणून आजच मनासारखं जगावं!
शेंदूर चुकीचा नव्हता; पण त्याचे थर वाढत गेले आणि मूर्तीचं खरं रूप झाकलं गेलं. हीच गोष्ट कदाचित आपल्या सणांनाही लागू पडते. सणाच्या मुळाशी असलेला आनंद, कृतज्ञता, निसर्गाशी असलेलं नातं आणि माणसामाणसांतील आपुलकी यावर काळाच्या ओघात दिखावा, चढाओढ, स्पर्धा, बाजारपेठ, अनुकरण आणि गोंगाटाचे थर चढत गेले…
तसंही आपले सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे, निसर्गाच्या विविध रूपांची जाणीव करून देणारे! माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं जपण्याचा एक उदात्त विचारच त्यांच्या मुळाशी आहे.
मग सण चुकीचे कुठे आहेत?
आणि हेही आठवतं इतिहासाच्या एका धड्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं – “सणवार उत्साहपूर्वक करीत जा…”
म्हणजे सण म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे; त्यात आनंद आहे, उत्साह आहे, माणसांना एकत्र आणणारी ऊब आहे. मग प्रश्न सणांचा नाहीच. प्रश्न आहे सणांच्या मूळ रूपावर आपण किती थर चढवले आहेत?
हेही वाचा – स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…
नऊ रंगांच्या साड्या असोत, दिव्यांची आरास असो, रांगोळी असो किंवा गोडधोड… आनंदाला कुणाची हरकत असण्याचं कारण नाही. पण त्या आनंदामागचा अर्थ हरवला, तर उरतो तो केवळ उत्सवाचा देखावा. परंपरा कदाचित यालाच म्हणत नसावी, की पूर्वजांनी जे केलं ते आपणही करत राहायचं. परंपरा म्हणजे त्यांनी जपलेला अर्थ आपण पुढे जपायचा.
माणकेश्वरच्या मूर्तीवरचा शेंदूर बाजूला झाला आणि सरस्वती पुन्हा दिसली. कदाचित आपल्या सणांवरचे थरही कधीतरी बाजूला व्हावेत… सण नाही! त्यांच्यावर चढलेला गोंगाट कमी व्हावा, आणि त्या शांततेत त्यांच्या मुळाशी असलेला अर्थ पुन्हा एकदा ऐकू यावा.


