माया / भाग – 4
आपण अज्ञान आणि सत्यज्ञान यातील भेद समजून घेतला. आता आपण ज्याच्याभोवती हे सर्व तत्वज्ञान गुंफलेले आहे, त्या आत्मा या परमोच्च विषयाचे चिंतन करणार आहोत.
सत्स्वरूपो ज्ञानरूपः
आत्मा ज्ञेयो हि यत्नतः।
तस्माद् दीर्घं प्रकुर्वीत
ध्यानं ब्रह्मणि सर्वतः॥
– गीताव्रत
आत्मा हा सत्स्वरूप आणि ज्ञानस्वरूप आहे. सत् म्हणजे जे नेहमी अस्तित्वात असते, ज्याचा कधीही नाश होत नाही, जे अमर आहे आणि जे सत्य आहे… आणि ज्ञान म्हणजे जे स्वयंप्रकाशित आहे. समजा, आपल्याला शास्त्रीय गायन शिकायचे आहे. तर, आपण संगीताची शेकडो पुस्तके वाचली तरी, आपल्या गळ्यातून आपोआप सुरेल गाणे बाहेर पडणार नाही. त्यासाठी आपल्याला रोज पहाटे उठून रियाज करावा लागेल. आपल्याला आपल्या आवाजाला वळण लावावे लागते. कित्येक वर्षांच्या अखंड साधनेनंतर तो सूर आपल्या गळ्यात स्थिर होतो आणि मग आपण गाऊ लागतो. आत्मज्ञानाचेही अगदी तसेच आहे. प्रत्यक्ष साधनेशिवाय आपण ज्ञान ग्रहण करू शकणार नाही. म्हणूनच, ज्या साधकाला परमज्ञान प्राप्त करून घेण्याची अत्यंत तीव्र इच्छा आहे, त्याने आपल्या ध्येयपूर्तीसाठी आणि आत्मसाक्षात्कारासाठी परब्रह्माचे दीर्घ चिंतन केले पाहिजे. हे चिंतन उठता, बसता, चालता, बोलता आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव सतत जिवंत ठेवून केले पाहिजे. हा साधनेचा रियाज जेवढा सखोल, तेवढा साक्षात्कार अधिक स्पष्ट होत जातो.
यथा दीपेन भासन्ते
कुम्भाद्या वस्तुराशयः।
तथा मनः प्रकाशेत
आत्मनैवाखिलाशयः॥
– गीताव्रत
आपल्या आजूबाजूला असलेल्या जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी खूप वरवरची असते. रात्रीच्या अंधारात जर एखाद्या खोलीत अनेक सुंदर सुरया, चित्रे किंवा काही भांडी ठेवली असतील, तर ती आपल्याला दिसत नाहीत. पण तिथे एखादा दिवा लावला आणि त्या वस्तू जवळ घेतल्या की, त्या वस्तूंवरची नक्षी, कलाकुसर बारकाईने पाहता येते. ती नक्षी आणि कलाकुसर पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळायला पाहिजे. कलाकुसरीमध्ये अवर्णनीय सौंदर्य आणि कला असते. जेव्हा आपल्याला समजणारी कला बारकाईने पाहता येईल, त्या क्षणी आपल्याला त्या कलेचे समाधान मिळेल. ही कलाकुसर समजणे म्हणजे ज्ञान! या ज्ञानानेच आनंद उजळून निघतो. इथे आपण अत्यंत बारकाईने विचार केला तर, आपल्या लक्षात येईल की, त्या सुरईमध्ये किंवा भांड्यामध्ये स्वतःला प्रकाशित करण्याची कोणतीही शक्ती नाही. ते केवळ जड आणि निर्जीव पदार्थ आहेत. दिव्याचा प्रकाश त्यांच्यावर पडेल आणि आपली दिव्यदृष्टी त्याच्यावर पडेल, मगच आपल्याला त्याचे सौंदर्य समजेल!
अगदी याच न्यायाने आपण आपल्या शरीराचा आणि मनाचा विचार करूया. आपले मन, आपली बुद्धी आणि आपले डोळे-कान यासारखी सर्व इंद्रिये ही अतिशय चंचल आणि कार्यरत वाटत असली तरी, ती मुळात त्या सुरईसारखी जडच आहेत. ती स्वतःहून काहीही करू शकत नाहीत. त्यांच्यावर जेव्हा आतून ज्ञानाचा प्रकाश पडतो, तेव्हाच ती सर्व इंद्रिये आणि मन प्रकाशित होतात आणि आपले काम करू लागतात.
एखादा अत्यंत प्रगत असा संगणक असतो, ज्यामध्ये अनेक गोष्टी करण्याची क्षमता असते; पण जोवर त्याला विजेचा प्रवाह जोडला जात नाही, संगणक चालवण्याचे ज्ञान आपण घेत नाही, तोवर तो संगणक म्हणजे आपल्यासाठी केवळ प्लास्टिक आणि धातूचा निर्जीव, निरुपयोगी खोके ठरेल. पण ज्याच्याकडे संगणक चालवण्याचे ज्ञान आहे, तो ते फार प्रेमाने, आनंदाने वापरेल. त्यालाच त्याचा उपयोग होईल. वीज, त्यातले सॉफ्टवेअर हा त्याचा आत्मा आहे. त्यानुसार आपले मन आणि बुद्धी ही केवळ उपकरणे आहेत, त्यांना चेतना देणारा खरा प्रकाश म्हणजे ज्ञान आणि आत्माच आहे. तो प्रकाश काढून घेतला की, शरीर आणि मन एका क्षणात मातीमोल होते.
यथा प्रदीप्तदीपाय
नान्यदीपः प्रयुज्यते।
तथा स्वयंप्रकाशाय
नात्मनेऽन्योपयुज्यते॥
– गीताव्रत
आता एक अत्यंत सुंदर आणि गमतीदार प्रश्न निर्माण होतो. आपण पाहिले की, इतर सर्व वस्तूंना पाहण्यासाठी दिव्याची गरज असते, पण त्या दिव्याला पाहण्यासाठी आपल्याला आणखी एका दुसऱ्या दिव्याची गरज असते का? जर खोलीत अंधार असेल आणि आपण तिथे एक दिवा लावला, तर तो दिवा शोधण्यासाठी आपल्याला बॅटरी शोधावी लागेल का? तर नक्कीच नाही.
एका प्रदीप्त दिव्याला आपला स्वतःचा प्रकाश दाखविण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही दिव्याची किंवा बाह्य प्रकाशाची अजिबात आवश्यकता नसते. दिवा जसा इतरांना प्रकाशित करतो, तसा तो स्वतःलाही प्रकाशित करतो. आत्म्याचेही अगदी तंतोतंत असेच आहे. आत्मा हा स्वतःच ज्ञानस्वरूप आणि स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याला प्रकाशित करण्यासाठी किंवा त्याला जाणून घेण्यासाठी अन्य कोणत्याही बाह्य साधनांची आवश्यकता नसते. आपण डोळ्यांनी रूप पाहतो, कानांनी शब्द ऐकतो, पण “आत्म्याला पाहण्यासाठी कोणतेही इंद्रिय काम करू शकत नाही, कारण सर्व इंद्रियांना प्रकाश देणारा तोच आहे!”
सूर्याला पाहण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याही सूर्याची किंवा प्रकाशाची गरज नसते. केवळ आपले डोळे उघडणे आणि त्याकडे पाहणे पुरेसे असते. आता सूर्योदय पाहण्याच्या आणि सूर्यास्त पाहण्याच्या पद्धती आपण जाणतो. ह्रदय तृप्त होते ते सौंदर्य पाहताना… ती कलाकुसर पाहताना… या सृष्टीचा तो चमत्कार पाहताना! हो ना?
हेही वाचा – स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती
आत्म्याला जाणण्यासाठी केवळ स्वतःच्या अंतरंगात डोकावणे पुरेसे असते. तो कायम प्रकाशितच आहे, फक्त आपले लक्ष बाहेरच्या जगात अडकलेले असते, त्यामुळे आपण त्या आंतरिक प्रकाशाला पारखे होतो. त्या आत्म्याशी संवाद साधायचा आहे… त्या आत्म्यावरची कलाकुसर पाहायची आहे, तो सृष्टीचा, परमेश्वराचा, अद्वैताचा, प्रकाशाचा चमत्कार आहे, तो आपल्याला पाहायचा आहे आणि त्या आत्म्याच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत जायचे आहे. पण आधी आपल्याला आत्म्याशी संवाद साधता आला पाहिजे आणि तो केवळ ध्यानातूनच साधता येईल.
यथा स्थाणुं नरो रात्रौ
चोरोऽयमिति मन्यते।
तथात्मानं भ्रमाज्जीवं
मत्वा भीतो हि जायते॥
– गीताव्रत
आपल्या मनात जी अनेक प्रकारची भीती घर करून असते तिचे मूळ कशात आहे, हे या श्लोकातून अत्यंत मार्मिकपणे उलगडले आहे. कल्पना करूया की, एक मनुष्य रात्रीच्या वेळेस एका निर्जन रस्त्यावरून चालला आहे. रस्त्याच्या कडेला एक लाकडाचा जुना आणि वाळलेला ओंडका उभा आहे. अंधारामुळे त्या माणसाला तो ओंडका नीट दिसत नाहीये आणि त्याच्या मनात असा भ्रम निर्माण होतो की, तिथे कोणी चोर, लुटारू आपल्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसला आहे. या एका चुकीच्या कल्पनेमुळे त्या माणसाच्या अंगाला दरदरून घाम फुटतो, त्याच्या हृदयाची धडधड वाढते आणि तो जिवाच्या आकांताने पळत सुटतो. त्याची ती भीती अगदी खरी असते, त्याला होणारा त्रासही खरा असतो, पण त्या भीतीचे कारण मात्र पूर्णपणे खोटे असते. तिथे माणूस किंवा चोर नव्हताच, तिथे केवळ एक लाकडाचा ओंडका होता. आता प्रश्न असा आहे की, माणूस वाटला तरी तो चोर वाटला म्हणून आपण घाबरलो. खरंतर, अंधाऱ्या रस्त्यावरती एखादा माणूस भेटला तर, त्याचा आधार वाटायला हवा. पण तसे नाही वाटत. तो दरोडेखोर लुटारू आहे तो आपल्याला लुटेल, ठार करेल असे वाटते.
आपला आत्मा हा मुळात निर्भय आणि अविनाशी आहे, पण अज्ञानाच्या अंधारामुळे तो स्वतःला जीव समजतो. जीव समजणे म्हणजे मी हा देह आहे, मी मर्यादित आहे आणि मला कधीतरी मृत्यू येणार आहे, असे मानणे. या एका चुकीच्या समजुतीमुळे तो जन्म-मृत्यू, रोगराई आणि मान-अपमान यांच्या भीतीने पूर्णपणे ग्रस्त होतो. पण ज्ञानाच्या प्रकाशात मी जीव नसून साक्षात परमात्माच आहे, हा प्रत्यक्ष बोध होताच, तो चोर जसा ओंडका बनतो, तशी ती भीती कायमची नष्ट होते आणि आत्मा पुन्हा एकदा पूर्ववत अत्यंत निर्भय आणि शांत बनतो.
बुद्ध्या सम्यक् जगत्सर्वं
विलाप्यात्मनि सर्वदा।
ध्यायते निर्मलं तत्त्वं
व्योमवत् ज्ञानिको मुदा॥
– गीताव्रत
जो खऱ्या अर्थाने ज्ञानी झाला आहे, त्याने या जगात कसे वागावे आणि आपली साधना कशी टिकवून ठेवावी, याचा एक अत्यंत सुंदर मार्ग यातून दाखवला आहे. ज्ञानी माणसाने आपल्या कुशाग्र बुद्धीचा अतिशय योग्य आणि नीट उपयोग करावा. बुद्धीचा उपयोग केवळ संसारात पैसे कमवण्यासाठी किंवा तर्कट लढवण्यासाठी करू नये तर, त्या बुद्धीने संपूर्ण जगत आपल्या आत्म्यात विलीन करावे. जगत आत्म्यात विलीन करणे म्हणजे नक्की काय, हे समजावे म्हणून आपण समुद्राचे आणि लाटांचे उदाहरण घेऊया. समुद्रावर रोज लाखो लाटा निर्माण होतात आणि काही क्षणांत विरून जातात. लाटेला असे वाटते की, माझा जन्म झाला. माझा आकार मोठा आहे आणि आता मी किनाऱ्यावर आपटून मरणार आहे. पण जेव्हा लाटेला हे सत्य उमजते की, मी लाट नसून केवळ अथांग पाणीच आहे, समुद्र आहे. तेव्हा तिचे लाट असणे पाण्यामध्ये विलीन होते. पाणी कधीच मरत नाही. तसेच, या जगात दिसणारी सर्व रूपे आणि आकार हे एकाच आत्मतत्त्वाचे अविष्कार आहेत, हे ज्ञानी मनुष्य सतत जाणतो. तो या संपूर्ण सृष्टीला स्वतःमध्येच पाहतो आणि मग तो निरभ्र आकाशाप्रमाणे असलेल्या आत्म्याचे सतत अत्यंत आनंदाने चिंतन करत राहतो.
हेही वाचा – अहंकाराचे समूळ उच्चाटन करणारे सत्यज्ञान
आकाशात अनेक ढग गर्दी करून येतात आणि जातात, पण आकाशाला त्याचा काहीच लेप लागत नाही. आकाशाला कायमचा डाग लागत नाही. आकाशाला लागलेला काळ्या ढगांचा डाग आपल्याला धुवावा लागत नाही. कारण ते नेहमी निरभ्र आणि अलिप्तच असते. तसेच, ज्ञानी माणसाचे मन सुखदुःखाच्या ढगांना पाहते, पण स्वतः त्या निरभ्र आकाशासारखे शांत आणि स्थिर राहते.
उषसा तमसो नाशे
यथा सूर्यः प्रकाशते।
ज्ञानेनाज्ञाननाशे तु
तथात्मा सम्प्रकाशते॥
– गीताव्रत
सकाळची वेळ निसर्गातील एक अत्यंत सुंदर आणि अद्भुत घटना असते. रात्रभर सर्वत्र दाट काळोख पसरलेला असतो. पण जेव्हा पहाट होते आणि उषःकाल होतो तेव्हा तो गडद अंधार हळूहळू नाहीसा होऊ लागतो. उषःकाल स्वतः सूर्य नसतो, पण तो सूर्याच्या आगमनाची चाहूल असते. उषःकालाने तमाचे म्हणजेच अंधाराचे पूर्णपणे हरण केल्यानंतर ज्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी असा सूर्योदय होतो आणि संपूर्ण जग प्रकाशाने न्हाऊन निघते अगदी, त्याच क्रमाने मानवी जीवनात ज्ञानाचा उदय होतो. आपल्या बुद्धीवर अज्ञानाचा आणि मोहाचा जो गडद काळोख साचलेला असतो, तो दूर करण्यासाठी आधी विवेकाचा आणि वैराग्याचा उषःकाल व्हावा लागतो. शुद्ध विचार आणि शास्त्रांचा अभ्यास यांमुळे जेव्हा, “अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा अचानक एका क्षणी अंतःकरणात आत्मज्ञानाचा प्रखर सूर्योदय होतो आणि आत्म्याचा साक्षात साक्षात्कार होतो.”
सूर्य जसा बाहेरून आणावा लागत नाही, तो तिथेच असतो… केवळ पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे, तो दिसू लागतो किंवा दिसत नाही. तो दिसत नाही म्हणून अंधार होतो. अगदी तसेच आत्मा नेहमी तिथेच असतो, केवळ आपल्या अज्ञानाचे आवरण दूर झाले की, तो आपल्या पूर्ण तेजाने आणि आनंदाने तो प्रकट होतो.


