अध्याय तेरावा
उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः । परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥22॥
हा प्रकृतिमाजीं उभा । परी जुई जैसा वोथंबा । इया प्रकृति पृथ्वीनभा । तेतुला पाडु ॥1021॥ प्रकृतिसरितेचां तटीं । मेरु होय हा किरीटी । माजीं बिंबे परी लोटीं । लोटों नेणे ॥1022॥ प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे । म्हणोनि आब्रह्माचें होये । शासन हा ॥1023॥ प्रकृति येणें जिये । याचिया सत्ता जग विये । इयालागीं इये । वरयतु हा ॥1024॥ अनंतें काळें किरीटी । जिया मिळती इया सृष्टी । तिया रिगती ययाच्या पोटीं । कल्पांतसमयीं ॥1025॥ हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोललाघवी । अपारपणें मवी । प्रपंचातें ॥1026॥ पैं या देहामाझारीं । परमात्मा ऐसी जे परी । बोलिजे तें अवधारीं । ययातेंचि ॥1027॥ असा प्रकृतिपरौता । एक आथी पंडुसुता । ऐसा प्रवादु तो तत्त्वता । पुरुषु हा पैं ॥1028॥
य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह । सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥23॥
जो निखळपणें येणें । पुरुषातें यया जाणे । आणि गुणाचें करणें । प्रकृतीचें तें ॥1029॥ हें रूप हे छाया । पैल जळ हे माया । ऐसा निवाडु धनंजया । जेवीं कीजे ॥1030॥ तेणें पाडें अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना । जयाचिया मना । गोचर जाहली ॥1031॥ तो शरीराचेनि मेळें । करूं कां कर्में सकळें । परि आकाश धुये न मैळे । तैसा असे ॥1032॥ आथिलेनि देहें । जो न घेपे देहमोहें । देह गेलिया नोहे । पुनरपि तो ॥1033॥ ऐसा तया एकु । प्रकृतिपुरुषविवेकु । उपकारु अलौकिकु । करी पैं गा ॥1034॥ परि हाचि अंतरीं । विवेकभानूचिया परी । उदैजे तें अवधारीं । उपाय बहुत ॥1035॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हे प्रकृती क्षणीं नीच नवी, रूपाचीच आघवी
अर्थ
(प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृतिकार्याहून) आपणास वेगळा पाहाणारा, अनुमोदन देणारा (शास्ता) व भर्ता, उपभोग घेणारा, महेश्वर, या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात, प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष, असे ज्याला म्हणतात (तो हाच). ॥22॥
हा पुरुष प्रकृतिमधे उभा आहे (खरा) परंतु जुईच्या वेलास जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे, तेवढे अंतर प्रकृति व पुरुष यामधे आहे. ॥1021॥ (अर्जुना), प्रकृतिरूप नदीच्या तीरावर मेरु पर्वतासारखा हा असून, तिच्यामधे याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहात जात नाही. ॥1022॥ प्रकृति होते व जाते परंतु हा (पुरुष) आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे. ॥1023॥ प्रकृति याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हा हिचा नवरा आहे. ॥1024॥ अर्जुना, अनंत कालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात, त्या कल्पांताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात. ॥1025॥ हा (पुरुष) प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो, (म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो). ॥1026॥ आणि या देहामधे परमात्मा आहे, अशा प्रकारचे जे बोलतात, ते यालाच, असे समज. ॥1027॥ अरे अर्जुना, प्रकृतिपलिकडे (कोणी) एक आहे, अशी जी वदंता आहे (असे जे लोक म्हणतात), तो वस्तुत: हाच पुरुष आहे. ॥1028॥
पुरुष आणि प्रकृति, यांना जो जो (या त्यांच्या) गुणांसह याप्रमाणे (म्हणजे पुरुष हा प्रकृति व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे) जाणतो, तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही. ॥23॥
अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे, असे जाणतो ॥1029॥ हा देह व ही त्याची छाया, पलीकडे दिसते ते (खरे) पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे (मृगजल) आहे, अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी ॥1030॥ अर्जुना, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृतिपुरुषांतील भेदाचा विचार स्पष्ट कळला; ॥1031॥ तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करीना का? परंतु आकाश जसे धुराने मळत नाही, तसा तो आहे. (सर्व कर्मे करीत असतांना तो त्या कर्मांकडून लिप्त होत नाही). ॥1032॥ देह असतांना जो त्या देहाच्या मोहाने भुलविला जात नाही, तो देह पडल्यावर पुन: जन्म पावत नाही. ॥1033॥ हा प्रकृतिपुरुषविचार, त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो. ॥1034॥ परंतु हाच विचार अंत:करणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत, ते ऐक. ॥1035॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : विदळ बहु चोखा, मीनलिया वाला एका


