भाग – 42
उद्यापासून नव्या योजनेला प्रारंभ करायचा होता आणि त्याआधी गुरुजींना भेटणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं होतं…
“आपण पहाटे लवकरच गुरुजींना भेटायला निघतोय… आज इथेच रहा, इथूनच एकत्र निघू…”
“पण माझ्याजवळ दुसरे कपडे नाहीत… मी ऑफिसमधून इथेच आलेय…” आराध्याच्या चेहऱ्यावर तो अवघडलेपणा आणि प्रश्न होताच…
“बस इतकंच ना… नंदिनीला सांग ती तयार करून ठेवेल… आपला माणूस जाऊन घेऊन येईल…” क्षणात त्याने प्रश्न सोडवला.
आराध्याला आता यावेळी घरी पाठवणे आणि उद्या तिच्या राहत्या घरातून सोबत घेणे त्याला योग्य वाटले नाही… न जाणो कोणाची पाळत असेल तर… त्याला सध्या कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती…
इथे दिवाकरही गुरुजींशी कॉलवर बोलत होते. पण आवाज आणि बोलण्यावरून ते खूपच भांबवलेले होते…. दादा (गुरुजी) बोलत होते…
“असं अचानक…. कसं शक्य आहे?”
पुन्हा समोरून काही बोलणं झालं, “नाही नाही… दादा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही बोलाल तसं, तुम्ही बोलाल ते… मी प्रयत्न करतो… नाही तसंच करतो…”
शर्वाय पाठी येऊन उभा होता आणि दादांना असा काही रिप्लाय देताना तो पहिल्यांदा पाहात होता. पाठी आलेल्या शर्वायकडे पाहातच त्यांनी कॉल कट केला… त्यांचं हे असं काही बोलणं ऐकून विषय काय असेल, हे ध्यानात यायला त्याला वेळ लागला नाही… तोही एखादा धक्का बसावा असंच पाहात होता त्यांच्याकडे…
हेही वाचा – शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड
दिवाकर यांनी घरी त्यांच्या आईला कॉल केला… काही माहिती त्यांना पुरवली आणि दादांनी जे आणि जसं सांगितलं तसं करा अशी पुस्ती जोडली….
एक दीर्घ श्वास घेऊन त्यांनी आपलं अंग बेडवर टाकलं. शर्वायजवळ प्रश्न असले तरी यावेळी ते स्पष्टपणे विचारायला त्याच्याकडे धर्य नव्हतं आणि तोही जाणून होता, कदाचित याची पूर्ण उत्तर आपल्या बाबांकडेही नाहीत… ती आणि ती केवळ दादाच देऊ शकणार होते… आणि त्याकरिता दुसरा दिवस उजाडायची तो वाट पाहत होता. नितळ पण तणावपूर्ण शांततेत गुंतलेला तो क्षण होता.
आराध्या शांतपणे त्या सुंदर व्हिलामधल्या खोलीत फिरत होती. तिच्या चेहऱ्यावर विचारांची सावली होती, पण नजरेत मात्र एक ठाम शांतता होती — जणू पुढील टप्प्याचा निर्णय तिच्या आतल्या कोणत्यातरी खोल थरात आधीच होऊन गेला होता! नंदिनीने तिची बॅग भरून पाठवली होती, प्रत्येक वस्तू तिने सांगितल्याप्रमाणे पाठवली होती….
बाहेर दरवाजाजवळ शर्वाय शांतपणे उभा होता. त्याची नजर आराध्यावर स्थिरावलेली — तिच्या हावभावातून काही गूढ वाचायचा प्रयत्न करत होता…
शर्वाय : “दत्ता यायला अजून थोडा वेळ लागेल. तो गाडी घेऊन निघालाय. तू काही हवं असेल तर…”
त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आराध्या म्हणाली, “तुम्ही आहात ना इथे? मग अजून काय हवं.”
त्या क्षणात एक मृदू, पण खोल भावना दरवाज्यातून हलकेच त्याच्यापर्यंत पोहोचली. शब्द सुटले दोघांकडून, पण नजरा एकमेकांना आधार देत राहिल्या. आराध्या शर्वायच्या दिशेने काही पावले चालत आली. दोघांमध्ये केवळ एक अर्धा हात अंतर होतं तोच… आराध्या म्हणाली,
“ती बॅग… ती माझ्यासारखीच आहे. खूप प्रवासातली, खूप गुपितं लपवणारी. पण आता तिला कोणत्या थांब्यावर थांबायचं आहे, ते स्पष्ट होत चाललंय.”
शर्वाय हसला…
“कधी कधी बॅगेपेक्षा, प्रवास करणारा माणूस अधिक महत्त्वाचा असतो… आणि इथे तर तू आहेस…”
तो थोडा थबकला आणि तो म्हणाला, “तू थांबायचं ठरवलं आहेस का माझ्यासोबत?”
आराध्याने शांतपणे डोळे मिटले आणि हळूच म्हणाली, “थांबते. पण हे असं उभं राहणं, हे नुसतं थांबणं नसतं शर्वाय, ते प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत उभं राहणं असतं!”
इतक्यात दत्ताची गाडी बाहेर येऊन थांबली. दरवाजा उघडून तो आत आला आणि हसत समोर येत म्हणाला…
“मॅडम, बॅग आली आहे…”
शर्वाय आणि आराध्या एकमेकांकडे पाहून फक्त हसले. एक शांत, अव्यक्त, पण कबूल केलेली भावना त्यांच्यादरम्यान स्थिरावलेली होती. त्या शांत वेळी, हवेत एक नजाकत होती, पण मनात धुकं होतं…
आराध्या शर्वायच्या समोर बसली होती, दोघंही गप्प होते. मधेच हातचाळा म्हणून मोबाइल पाहात… पण त्यांच्या त्या गप्प असण्यामध्ये खूप काही बोललं जात होतं. एकमेकांची साथ ते जणू आवाजाशिवाय देत होते. शर्वायच्या चेहऱ्यावर एक अल्लड हसू होतं… पण ते डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं.
तो क्षणभर आराध्याकडे पाहत राहिला. तिच्या डोळ्यांमध्ये काहीसं न वाचता येणारं होतं — जणू तीही काहीतरी लपवत होती किंवा सावरण्याचा प्रयत्न तरी करत होती. शर्वायच्या मनात एक खोल गुंता सुरू होता. त्याने मनातच स्वतःशी संवाद सुरू केला…
‘हे हास्य आराध्या सतत फुलत राहावं… उद्याचा दिवस आपल्याला आपल्या आयुष्याचा आरसा दाखवणार आहे. जे काही आत्तापर्यंत अंधारात ठेवलेलं, जे काही तुझ्या संरक्षणासाठी लपवलं ते उद्या उघड होणार… आणि त्यात मी तुला गमावणार तर नाही ना?’
“मी तयार आहे उद्यासाठी… पण तू तयार आहेस का, आराध्या?”
असं म्हणून तो तसाच तिच्याकडे पाहात राहिला… हसत. पण मनात मात्र धडधड सुरू होती.
आराध्या त्याच्या नजरेत हरवून गेली होती. पण यावेळेस ती डोळे बंद करत म्हणाली, “शर्वाय… उद्या काय होईल माहीत नाही, पण माझा हात तुमच्या हातात असेल, हे मी तुम्हाला आजच सांगते.”
शर्वाय तिच्या त्या शब्दांनी क्षणभर स्तब्ध होतो. मनातल्या वादळाला जणू एक ओलसर, शांत स्पर्श मिळाला… त्याने हळूच तिचा हात हातात घेतला ….
शर्वाय मनातच म्हणाला, “आरसा फुटला तरी त्यातलं आपलं प्रतिबिंब तुटत नाही… उलट, ते आपल्याला आपलंच खरं रूप दाखवतं.”
वेळ पुढे सरकत होती अन् रात्र आपल्याच बहरात होती… पहाटे निघायचं होतं आणि त्याकरिता आता झोपणं गरजेचं होतं.
एकमेकांना “गुडनाइट” म्हणताना त्या क्षणात एक वेगळी स्थिरता होती — ना त्यात नकारात्मकता होती, ना फार गोडवा… फक्त एक गूढ शांतता होती.
आराध्या हळूच शर्वायकडे बघत म्हणाली, “उद्या सकाळी भेटू. सगळं सोपं होईल.”
शर्वायने फक्त डोळ्यांनी होकार दिला. शब्द निघालेच नाहीत.
तो वळला आणि हळूहळू आपल्या रूमकडे निघाला.
रात्र… ऐन बहरात होती… शर्वायच्या खोलीत हळूवार पिवळसर प्रकाश पडलेला होता. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याबरोबर पडद्यांची हलकीशी हालचाल सुरू होती. शर्वायने फोन हातात घेतला, मेल्स स्क्रोल केले, प्रोजेक्ट फाइल्स पुन्हा एकदा पाहिल्या — पण डोळे तिथे नव्हतेच… त्याच्या मनात तेच एक वाक्य पुन्हा पुन्हा उमटत होतं —
“आरसा दाखवणारा दिवस आहे उद्याचा.”
तेवढ्यात त्याला त्याच्या आणि माधवमधील जुने काही प्रसंग आठवले — गुरुजींचे सूचक बोलणे, सुमित्रा आजींच्या काही इशाऱ्यांसारख्या शांत प्रतिक्रिया, आणि एक एक करून जोडले जाणारे तुकडे…
“माधवचं हे खेळणं फार पुढे गेलंय… पण मला आराध्या सावरण्याच्या आत हे संपवायचं आहे.,” तो स्वतःशी म्हणाला.
तो उठून बाल्कनीत गेला. समोरचा अंधार पहात उभा राहिला. त्या अंधारातही त्याला तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता — आराध्या.
तर दुसरीकडे, आराध्या आपल्या रूममध्ये गादीवर निजली होती. तिचं शरीर दमलं होतं, पण मन मात्र आश्वस्त होतं. तिला माहिती होतं — उद्या जे काही होईल, ते खरं होईल… आणि ती तयार होती!
हेही वाचा – शर्वायचा माधवविरुद्ध नवा डाव
ती वळून छताकडे पाहत म्हणाली, “शिवा की शर्वाय… जो कुणी आहात तुम्ही… मी तुम्हाला ओळखलंय आणि हीच ओळख उद्याच्या कोणत्याही गोंधळावर मात करेल.”
तिने डोळे मिटले. हळूहळू तिचा श्वास खोल गेला. क्षणात तिला झोप लागली… ती ठाम होती अन् निश्चिन्त…..
उद्या कोणता पर्दाफाश होणार होता?
काय खरं आणि काय धादांत खोटं?
शर्वाय आणि आराध्या — आता केवळ प्रेमात नव्हते, ते दोघं आता एका खऱ्याखुऱ्या लढाईत उतरले होते. त्यांची ही लढाई त्यांना आता फक्त लढायची नव्हती तर ती जिंकायचीही होती… आपल्या शत्रूचा… व्यक्तीपेक्षा त्या विचारांचा खात्मा करायचा होता. तेही एकमेकांना उत्तम साथ सोबत करत…


