अध्याय तेरावा
ज्ञेयं यत तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते ॥ अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥12॥
तरि ज्ञेय ऐसें म्हणणें । वस्तूतें येणेंचि कारणें । जें ज्ञानेंवांचूनि कवणें । उपायें नये ॥864॥ आणि जाणितलेयावरौतें । कांहींच करणें नाहीं जेथें । जाणणेंचि तन्मयातें । आणी जयाचें ॥865॥ जें जाणितलेयाचिसाठीं । संसाराची काढूनियां कांटी । जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाचां ॥866॥ तें ज्ञेय गा ऐसें । आदि जया नसे । परब्रह्म आपैसें । नावं जया ॥867॥ जें नाहीं म्हणों जाइजे । तंव विश्वाकारें देखिजे । आणि विश्वचि ऐसें म्हणिजे । तरि हे माया ॥868॥ रूप वर्ण व्यक्ती । नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती । तरि कोणें कैसें आथी । म्हणावें पां ॥869॥ आणि साचचि जरी नाहीं । तरि महदादिक कोणें ठाईं । स्फुरत कैचें काई । तेणेंवीण असे ॥870॥ म्हणोनि आथी नाथी हे बोली । जें देखोनि मुकी जाहली । विचारासीं मोडली । वाट जेथें ॥871॥ जैसी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी । तैसें सर्व होऊनियां सर्वीं । असे जे वस्तु ॥872॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता
अर्थ
जे ज्ञेय आहे (व) जाणले असता (मनुष्य) अमृतत्व पावतो, ते मी सांगतो (ते हे) आदिरहित परब्रह्म होय ते सत् ही नाही व असत् ही नाही असे (ज्ञाते) म्हणतात. ॥12॥
तर ब्रह्माला ज्ञेय म्हणावयाचे, ते एवढ्याचकरिता की ते (ब्रह्म) ज्ञानावाचून दुसर्या कोणत्याही उपायांनी जाणले जात नाही ॥864॥ आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावयाचे राहात नाही व ज्याचे ज्ञान जाणणाराला ज्ञेयस्वरूप करते. ॥865॥ जे ज्ञेयस्वरूप जाणल्यामुळेच संसाराचे कुंपण काढून टाकून (संसाराचा निरास करून) नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे (म्हणजे नित्यानंदरूप व्हावे) ॥866॥ अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की ज्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावत:च नाव आहे. ॥867॥ जे नाही म्हणायला जावे, तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि जे ब्रह्म विश्वच आहे, असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे. ॥868॥ त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप, रंग व आकार ही नाहीत व पाहाण्याचा विषय व पाहणारा ही स्थिती नाही. असे असल्यामुळे ते आहे, हे कोणी व कसे म्हणावे? ॥869॥ आणि जर ते खरोखरच नाही असे म्हणावे, तर महतत्त्वादिक कोणाच्या ठिकाणी स्फुरतात? व त्याच्यावाचून कोठले काय आहे? ॥870॥ म्हणून जे ब्रह्म पाहून ‘आहे, नाही’ ही भाषा मुकी झाली (जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही) व ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे (ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही) ॥871॥ डेरा, घागर व परळ यामधे माती जशी त्या त्या आकाराने असते, त्याप्रमाणे ही वस्तु ब्रह्मवस्तु सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे ॥872॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त


