Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध
    ललित

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीAugust 19, 2026No Comments11 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, दीपक तांबोळी, लेखक दीपक तांबोळी, मालमत्तेचा वाद, दोन बहिणींची नोटीस, भावाला नोटीस, दोन बहिणींची भावाला नोटीस, मैत्रिणीचा अनिताला सल्ला, मैत्रिणीची रंजनाला सल्ला, रंजनाची लालची सासू, अनिताची लालची सासू, मालमत्तेची दीड कोटीला विक्री, वडिलोपर्जित संपत्तीवर बहिणीचा अधिकार
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    चपला काढून जसा सचिन घरात शिरताच, त्याच्या बायकोने, सुचिताने एक पाकीट त्याच्या हातात दिलं.

    “काय आहे हे?” त्याने विचारलं.

    “काय माहीत! रजिस्टर पोस्टाने आलंय. कुणा वकिलाचं दिसतंय…”

    वकील म्हटल्याबरोबर सचिनच्या पोटात खड्डा पडला. त्याने घाईघाईने पाकीट उघडून आतलं पत्र बाहेर काढलं. पत्राच्या उजव्या बाजूला वरती ॲड. सुचित्रा पाटील असं लिहिलेलं होतं. खाली त्याच्या जुन्या घराचं सविस्तर वर्णन होतं आणि त्याखालचा मजकूर असा होता –

    “वरील मिळकत वडिलोपार्जित असून आपण वर्ष 2003 साली बनविलेल्या मुख्त्यारपत्रानुसार या मिळकतीची परस्पर विक्री केली आहे. हिंदू कौटुंबिक कायद्यानुसार आपल्या बहिणी, अनिता आणि रंजना यांचा या मिळकतीवर समान हक्क असतानाही आपल्या बहिणींना विश्वासात न घेता किंवा त्यांना न कळवता या मिळकतीची विक्री केली आणि या विक्रीन्वये आलेली रक्कम, रुपये दीड कोटी परस्पर हडप केली आहे. तरी या नोटिशीद्वारे आपणास सूचना देण्यात येत आहे की, ही नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत आमचे अशील अनिता आणि रंजना यास प्रत्येकी रु. 50 लाख देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा, योग्य त्या कलमांखाली, योग्य त्या न्यायालयात आपणाविरुद्ध खटला दाखल करण्यात येईल आणि या खटल्याला येणाऱ्या खर्चास आपण जबाबदार असाल.”

    खाली वकिलाची सही होती. त्याखाली अनिता आणि रंजनाच्या सह्या होत्या. ती नोटीस वाचून सचिन एकदम खचून गेला. सहा महिन्यांपूर्वीच तर या घराच्या कोर्टकचेऱ्यातून त्याला मुक्तता मिळाली होती. परत एकदा कोर्टकचेरीच्या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. तो मटकन खुर्चीत बसला. त्याचा चेहरा पांढराफटक पडलेला पाहून सुचिता लगबगीने त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन तिने विचारलं –

    “का, काय झालं? काय आहे त्या पत्रात?”

    “रंजू आणि अनूने नोटीस पाठवलीये आपल्याला. आपण जे घर विकलं त्यात दोघी हिस्सा मागताहेत!”

    “काय्य? पण तुम्ही तर त्यांना वीस-वीस लाख द्यायचं कबूल केलं होतं ना?”

    “हो केलं होतं, पण त्यांना समान हिस्सा म्हणजे पन्नास लाख हवे आहेत…”

    “अस्सं. म्हणजे तुम्ही पंधरा वर्षं कोर्टात लढलात. ते घर वाचवण्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं. केस लढण्यासाठी पदरचे पाच-सहा लाख खर्च केले. वकिलामागे फिरण्यात आणि कोर्टाच्या चकरा मारण्यात तुमचं पूर्ण तारुण्य तुम्ही वाया घालवलंत, त्याचं काय?”

    सचिनकडे बोलायला शब्दच नव्हते. सुचिता म्हणत होती त्यातला एकूण एक शब्द खरा होता.

    “…आणि तुमच्या बहिणींसाठी तुम्ही काय नाही हो केलं? आईवडिलांच्या पश्चात त्यांना वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. त्यांची लग्नं चांगल्या घरात लावून दिलीत. आई-वडील काय करतील, इतकं तुम्ही केलंत त्यांच्यासाठी… त्याचे असे उपकार फेडताहेत त्या? कोर्टात जाताहेत म्हणे! येऊच दे त्यांना दिवाळीत, चांगला जाब विचारणार आहे मी त्यांना…”

    संतापाने ती बराचवेळ बडबडत राहिली. असह्य होत असूनही सचिन ते मुकाट्याने ऐकत राहिला.

    0000

    सचिनच्या वडिलांचं वडिलोपार्जित घर शहराच्या अगदी मध्यवस्तीत होतं. कालांतराने आजूबाजूला बकाल वस्ती वाढू लागली. देशी दारूची दुकानं आली. ते पाहून त्याच्या वडिलांनी आपल्या मुलांवर वाईट संस्कार होऊ नयेत, यासाठी स्वतःचं घर सोडून शहराबाहेरच्या वस्तीत भाड्याने घर घेतलं. मध्यवस्तीतलं घर त्यांच्याच एका व्यापारी मित्राला भाड्याने दिलं. मित्रच तो, त्यातून शब्दाला जागण्याचा तो काळ होता. त्यामुळे लेखी करार करण्याची गरज कुणालाच भासली नाही. वर्षामागून वर्षं उलटत गेली. सगळं व्यवस्थित सुरू असताना एका आजाराचं निमित्त होऊन सचिनचे वडील वारले. त्यावेळी सचिन फक्त पंधरा वर्षाचा होता. घरी कमावणारं कुणी नाही. परिस्थिती पाहून वडिलांच्या मित्राने घराचं भाडं तर वाढवून तर दिलंच, शिवाय सचिनला आपल्या डाळ मिलमध्ये कामगाराची नोकरीही दिली. सचिनचं घर अडचणीत का होईना, सुरळीत चालू झालं. मात्र, वडिलांना जाऊन एक वर्ष होत नाही, तर वडिलांच्या मृत्युमुळे खचलेली आईही देवाघरी गेली. 16 वर्षांच्या सचिनवर 13 वर्षांच्या रंजनाची आणि 11 वर्षांच्या अनिताची जबाबदारी येऊन पडली. वडील वारल्यामुळे आधीच मोठा झालेला सचिन आईच्या निधनामुळे एकदम प्रौढ झाला. वयाच्या मानाने तो जास्तच समजूतदार होता. आपल्या लहान बहिणींवर त्याने उत्तम संस्कार केले. त्यांना स्वयंपाक करणं शिकवलं. त्याच्यासाठी बहिणी आणि बहिणींसाठी तो सर्वस्व होता!

    नोकरी करता-करता त्याने आपलं शिक्षणही सुरू ठेवलं होतं. तो ग्रॅज्युएट झाला आणि वडिलांचे मित्र वारले. सचिनचा एक मोठा आधार गेला. डाळ मिलचा कारभार वडिलांच्या मित्राच्या तरुण मुलांकडे गेला आणि सचिनच्या हाल-अपेष्टांना सुरुवात झाली. नवीन मालकांना अनुभव नव्हता, त्याचबरोबर माणुसकीही नव्हती. कामगारांना पगार तर वेळेवर मिळतच नव्हता; पण सचिनला त्याचं हक्काच्या घराचं भाडंही तीन-तीन महिने मिळेनासं झालं. घरात खायची मारामार व्हायला लागली, तशी मोठ्या रंजनाने लोकांची धुणीभांडी करायची तयारी दाखवली; पण स्वाभिमानी सचिनला बहिणींनी असं लाजीरवाणं काम केलेलं सहन होणं शक्यच नव्हतं. म्हणून फॅक्टरीतून आला की, तो एका झेरॉक्स दुकानावर जाऊ लागला.

    हेही वाचा – प्रदीप नक्की कोण होता?

    इकडे फॅक्टरीत नवीन मालकांची अरेरावी आणि छळ वाढला. एकदा तर सहा महिने उलटून गेले तरी, सचिनला त्यांनी घराचं भाडं दिलं नाही. तीन महिन्यांपासून पगारही नव्हता. हवालदिल झालेला सचिन मालकाला जाऊन भेटला. भाडं आणि पगार द्यायची कळकळीची विनंती केली. मालकाने नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं दिली. बिथरलेला सचिन बोलून बसला –

    “भाडं देणं जमत नसेल तर खाली तरी करून द्या घर! मला दुसऱ्याला तरी भाड्याने देता येईल…” ते ऐकून तरुण मालक संतापला आणि म्हणाला,

    “नाही सोडत घर. जा तुला काय करायचं ते करून घे… आणि उद्यापासून फॅक्टरीतही येऊ नकोस. मी आतापासूनच तुला फॅक्टरीतून काढतोय.”

    ते ऐकून सचिनच्या हातापायातलं त्राण गेलं. गयावया करत तो म्हणाला –

    “शेठजी, भाडं नाही तर, पगार तरी द्या. फार अडचण चालू आहे सध्या…”

    “तुला एकदा सागितलेलं कळत नाही का? सिक्युरिटी याला बाहेर हाकलून द्या.”

    म्हणतात ना संकटं आली की, गठ्ठ्याने येतात. सचिन ज्या झेरॉक्स दुकानात काम करत होता, तेही बंद पडलं. सचिन रस्त्यावर आला. भीक मागण्याशिवाय त्याला पर्याय उरला नाही. महिनाभर नोकरीच्या शोधात तो  वणवण फिरला. शेवटी एका मित्राच्या ओळखीने एका रस्ते बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे त्याला मजुरीचं काम मिळालं. काही महिने त्याने तिथे काम केलं. पण सचिनसारख्या सभ्य सुशिक्षित मुलाने असं मजुराचं काम करावं, हे कॉन्ट्रॅक्टरला पटेना. त्याने त्याला एका खासगी पतपेढीत कारकुनाची नोकरी मिळवून दिली. इथेही पगार कमीच होता, पण नियमित होता. शिवाय, पिळवणूक नव्हती. थोड्याच दिवसात तो मॅनेजर झाला. आता त्याला ते बंद पडलेलं झेरॉक्स दुकान खुणावू लागलं. एक दिवस हिंमत करून त्याने ते भाड्याने घेतलं. पतपेढीतून कर्ज घेतले आणि जुन्या झेरॉक्स मशीन्स काढून नवीन आधुनिक मशीन्स आणल्या. कॉलेजसमोरच दुकान असल्याने ते उत्तम चालू लागलं. सचिनने मग त्या दुकानात अनेक जोडधंदे सुरू केले. आता नोकरीपेक्षाही चांगलं उत्पन्न मिळू लागलं. म्हणून सचिनने नोकरी सोडली. पगारातून बचत केलेल्या पैशातून त्याने ते दुकानच विकत घेऊन टाकलं. म्हणता म्हणता सचिनची शहरात दोन झेरॉक्सची दुकानं झाली.

    आता त्याच्या जुन्या घराकडे लक्ष देणं गरजेचं होतं. दोन वर्षांपासून भाडं येणं बंद होतं. सचिनने त्याच्या एका मित्राला सल्ला विचारला, मित्र त्याला वकिलाकडे घेऊन गेला. वकिलाने सगळा इतिहास शांततेने ऐकून घेतला आणि म्हणाला –

    “तुम्ही काही काळजी करू नका. आपण त्यांना नोटीस पाठवू. नोटीस पाहिल्याबरोबर ते घराची चावी घेऊनच धावत येतील आणि समजा नाही आले तर, आपण सरळ दावा ठोकू. कसे देत नाही घर पहातोच मी! कोर्टाचं समन्स आलं की, मोठमोठे गुन्हेगार घाबरून जातात. हे तर काय व्यापारी आहेत. लक्षात ठेवा कोणताही व्यापारी कोर्टकचेऱ्या सहसा टाळतो.”

    सचिनला आनंद झाला. ते घर हातात आलं की, ते विकून सचिनला स्वतःचं घर घेता आलं असतं. रंजना आणि अनिता आता लग्नाच्या झाल्या होत्या. त्यांच्या लग्नाला तो पैसा कामाला आला असता…

    पण वकीलाने लावलेल्या आशा किती फुसक्या होत्या, हे सचिनला लवकरच अनुभवाला आलं. समोरची पार्टी नोटिशीला घाबरली तर नाहीच, उलट “ते घर आमचंच आहे. सचिनच्या वडिलांनी ते आम्हाला अनिश्चित काळाकरिता बक्षीस म्हणून दिलं होतं. सचिन मराठे हे आमची नाहक बदनामी करत आहेत. त्यांनी या नोटिशीबद्दल आमची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल,” अशी धमकी दिली. वकिलांनी सचिनला करारनामा आणि भाड्याच्या पावत्यांबद्दल विचारलं. सचिनजवळ ते असण्याचा प्रश्नच नव्हता. वकिलांना तेच तर हवं होतं! त्यांनी सचिनलाच दोष दिला. दावा दाखल केल्याशिवाय इलाज नाही, अशी सचिनची खात्री करून दिली.

    शेवटी कोर्टात केस दाखल झाली आणि सुरू झाली एक अंतहीन लढाई! ही केस सचिन हरणार हे वकिलांना माहीत होतं, पण असं सांगून त्यांचा व्यवसाय कसा चालणार होता? तारखांवर तारखा पडू लागल्या. प्रत्येक तारखेला वकील त्याच्याकडून पैसे घ्यायचे. समोरच्या पार्टीला तर केस जाणूनबुजून लांबवायचीच होती. वर्ष झालं तरी काहीच हालचाल दिसेना. अन्य एका मित्राने सचिनला वकील बदलायचा सल्ला दिला. हो, नाही करत सचिनने तो अमलात आणला. आता तारखांवर काहीतरी कामकाज होऊ लागलं. आश्चर्य म्हणजे, पाच वर्षांनी सचिनच्या बाजूने निकाल लागला. त्याच दरम्यान रंजनाचं लग्न ठरलं. सचिनला खुप आनंद झाला. सुखाचे दिवस आले, असं त्याला वाटू लागलं.

    रंजनाचं लग्न होत नाही तोच, समोरच्या पार्टीने निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील केलं. पुन्हा तारखांवर तारखा पडू लागल्या. वकिलामागे फिरणं सुरू झालं. या दरम्यान अनिताचंही लग्न रंजनाच्याच दिराशी झालं. दोघी बहिणी एकमेकींच्या जावा झाल्या.

    जिल्हा न्यायालयातला खटला चार वर्षं चालला. दुर्दैवाने, सचिन त्यात हरला. सचिनने आता वयाची तिशी गाठली होती. बहिणी आणि नातेवाईकांच्या आग्रहास्तव त्याने लग्न केलं. पण खटला हरल्याची बोच त्याला लागून राहिली होती. एका हुशार पण महागड्या वकिलाशी सल्लामसलत करून त्याने हायकोर्टात अपील दाखल केलं. पुन्हा एकदा कोर्टात चकरा सुरू झाल्या. मात्र आता कामधाम सोडून मुंबईला जावं लागत होतं…

    सचिनला आता या कोर्टकचेरीचा कंटाळा येऊ लागला होता. पण वडिलोपार्जित घर दुसऱ्यांनी जबरदस्तीने बळकावून बसावं, हेही त्याला सहन होत नव्हतं. हायकोर्टात खटला सहा वर्ष चालला. यावेळी मात्र सचिनच्या बाजूने निकाल लागला. सुदैवाने समोरच्या पार्टीने दिलेल्या मुदतीत सुप्रीम कोर्टात अपील न केल्याने सचिनला घराचा ताबा मिळाला. घराची अवस्था अतिशय वाईट होती. आजूबाजूला दुकानं झालेली असल्याने त्या जागेवर घर बांधण्यात अर्थ नव्हता. सचिनने एका बिल्डरला गाठलं. घराच्या अनेक भानगडी असल्यामुळे बिल्डर त्या जागेचे त्याला फक्त दीड कोटी द्यायला तयार झाला. जागेचं महत्त्व आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते कमीच असले तरी, कोर्टकचेऱ्यांनी थकलेला सचिन दीड कोटीसाठी तयार झाला.

    बहिणींना कोर्टात यावं लागू नये, म्हणून केलेल्या मुखत्यारपत्राच्या आधारे त्याने घराची विक्री केली. मात्र त्याने बहिणींना गृहित धरण्याची फार मोठी चूक केली होती. बहिणींना फोन करून त्याने या विक्रीची माहिती दिली आणि प्रत्येकीला वीस-वीस लाख देण्याचं कबूलही केलं. रंजना आणि अनिताला यात काही वावगं दिसलं नाही. ही गोष्ट त्यांनी आपल्या घरात सांगितली. नवऱ्यांना आनंद झाला, पण लालची सासू मात्र भडकली. त्यात या सौद्याची खबर रंजना आणि अनिताच्या वकील मैत्रिणीला लागली. तिने रंजनाला फोन केला –

    “रंजू, तुमचं जुनं घर फक्त दीड कोटीत विकलं गेलं म्हणे!”

    “फक्त म्हणजे?

    “अगं वेडे, एका ब्रोकरने मला सांगितलं की, त्या ठिकाणी भाव जास्त आहेत आणि कमीतकमी तीन कोटीत तरी ते घर विकलं गेलं असेल. याचा अर्थ, एकतर तुमच्या भावाला फसवलं गेलं असेल किंवा तुमचा भाऊ तरी तुम्हाला फसवत असेल. मला तरी दुसरी शक्यता जास्त वाटतेय… कारण माझ्या बाबतीत तेच घडलंय. माझ्या भावांनी घराचे वाटेहिस्से केले, पण मला एक रुपयासुद्धा दिला नव्हता. त्यावेळी मी लहान होते मला काही कळत नव्हतं. त्यांनी सांगितलं, त्या कागदावर सह्या केल्या. तुमचं तर काय! मुख्त्यारपत्रात तुम्ही खरेदी-विक्रीचे सर्व अधिकार भावालाच देऊन टाकले. त्याचा त्याने फायदा करून घेतला.”

    “नाही गं! दादा असं काही करणार नाही… आणि तो वीस लाख द्यायला तयार आहे ना!”

    “वीस लाख देतोय, मग पन्नास लाख का नाही? वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलींचा समान हक्क असतो. याचा अर्थ तुम्हाला पन्नास लाख मिळायला हवेत की नको?”

    “तुझं म्हणणं ठीक आहे. पण आम्ही दोघी समाधानी आहोत वीस लाखांवर!”

    “शहाण्या व्हा… रंजू मी खात्रीने सांगते सचिनने ते घर तीन कोटीला विकलं असेल आणि तुम्हाला जास्त पैसे द्यायला नको म्हणून दीड कोटी सांगतोय. शिवाय, तुमचे हक्काचे तीस लाखही तोच लाटतोय. बघा बाई विचार करा आणि मला सांगा. मी तुमच्या हक्कासाठी लढायला तयार आहे,” असं म्हणून तिने फोन ठेवून दिला.

    रंजनाची सासू तिथेच उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती. ती म्हणाली…

    “तुझी मैत्रीण बरोबर म्हणतेय. सचिनकडून तुम्ही पन्नास-पन्नास लाख घ्यायलाच पाहिजेत.”

    रंजनाने ही गोष्ट अनिताला सांगितली. तिचाही सचूदादा आपल्याला फसवेल, यावर विश्वास बसला नाही. पण त्याने पन्नास लाख द्यायला हरकत नाही, हे तिलाही पटलं. संशय आणि अविश्वासाची बीजं पेरली गेली होती. दोघींनी विचारविनिमय करून आपल्या वकील मैत्रीणीकडे जायचं ठरवलं.

    दोन दिवसांनी त्या मैत्रिणीकडे गेल्या. तिच्याकडे असलेल्या पक्षकारांच्या गर्दीकडे पाहून ती यशस्वी वकील असल्याची त्यांना खात्री पटली.

    “तुम्हाला सांगते रंजू आणि अनू, आपल्या भारतातल्या साठ-सत्तर टक्के मुलींना वडिलांच्या संपत्तीत आपला हिस्सा आहे, हे माहीतच नसतं. उरलेल्यांपैकी बऱ्याच जणी भावावरच्या प्रेमापोटी आपला हक्क सोडून देतात. बाकीच्यांवर जबरदस्ती केली जाते किंवा मग माझ्यासारखं फसवून सह्या घेतल्या जातात. तुमच्या बाबतीतही थोडंफार असंच झालंय. तुमचा भाऊ तुम्हाला फसवतोय!”

    “पण मग आता काय करायचं? आम्ही दादाशी भांडायचं का?” अनिताने विचारलं.

    “नाही. भांडून आपली एनर्जी कशाला वाया घालवायची? त्यापेक्षा आपण त्याला सरळ नोटीस पाठवू. नोटीस पाहिल्याबरोबर तो ताबडतोब पन्नास लाख आणून देईल…”

    “…आणि तसं नाही झालं तर?” रंजनाने शंका विचारली.

    “असं शक्यतो होणार नाही. कायद्याची जाण त्यालाही असेल. तुमचा हक्क तो नाकारू शकत नाही, आणि समजा तसं झालंच तर आपण सरळ कोर्टात केस टाकू.”

    “नको कोर्टात नको…” अनिता घाबरून म्हणाली, “बिचारा गेली पंधरा वर्षं कोर्टकचेरीचा सामना करतोय.”

    “हेच तर चुकतं आपलं! हे पुरुष ‘बिचारे’ वगैरे काही नसतात. महास्वार्थी आणि जहांबाज असतात. आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल करून स्वार्थ साधून घेतात… काय करायचं मग? पाठवायची का नोटीस?”

    हेही वाचा – …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    दोघींनी घाबरून एकमेकींकडे पाहिलं.

    “घरी विचारून सांगायचं का?” रंजनाने अनिताला कुजबुजत्या स्वरात विचारलं. पण दोघींचाही निर्णय होईना.

    “अगं, एवढ्या काय घाबरताय?” वकील मैत्रीण मधेच म्हणाली, “आपण असं करू. नोटीस पाठवू. परिणाम झाला तर आनंदच आहे. नाही तर पुढे कोर्टात जायचं की, नाही हे नंतर तुम्हाला ठरवता येईल. शेवटी फायदा तुमचाच आहे, तेव्हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे.”

    दोघींच्या चेहऱ्यावरची चिंता कमी झाली…

    “ठीक आहे. नोटीस पाठवू आपण,” रंजना म्हणाली.

    वकील मैत्रिणीने तयार केलेल्या नोटिशीवर दोघींनी सह्या केल्या खऱ्या, पण दोघींची मनं जड होऊन गेली होती.

    क्रमश:

    (ही कथा माझ्या ‘हा खेळ भावनांचा’ या पुस्तकातील आहे.)

    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    August 19, 2026 ललित

    मनावरचा घाव

    August 18, 2026 ललित

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    By सतीश बर्वेAugust 19, 2026

    भाग – 1 कोमातून आश्चर्यकारकरीत्या बाहेर आल्यावर मोडक आजोबांची प्रकृती झपाट्याने सुधारली आणि बघता बघता…

    मनावरचा घाव

    August 18, 2026

    सहानुभूती आणि विश्वास

    August 18, 2026

    माझं गाव अन् बालपणीचे मित्र

    August 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 20 ऑगस्ट 2026

    August 20, 2026

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    August 19, 2026

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    August 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 402
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 541
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 861
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.