आमच्या गावात माध्यमिक आणि पुढील शिक्षणाची काही सोय नव्हती. शिक्षणासाठी म्हणून गावाच्या बाहेर पडलो. शहराच्या अलिबाबाच्या गुहेला बाहेर पडायची वाट नव्हती. गोष्टीतल्या सिंहाच्या गुहेत जसे फक्त आत जाणाऱ्या प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसायचे; बाहेर येणारे ठसेच नसायचे, तसंच हे शहराच्या बाबतीत सुद्धा!
खूप वर्षं गावाकडची याद सतावत होती. आज शेवटी आलोच गावी. सगळं बदललंय. माझं गाव मलाच ओळखता येत नाहीये. खाडीच्या काठाकाठाने शहराकडे जाणारा एक रस्ता होता. जाताना खूप दूरपर्यंत त्याने माझी सोबत केली होती; पण ती खाडीच आता दिसत नव्हती. गडप झाली होती. खाडी, तळी, विहिरी सगळंच बुजवलं होतं. तिवरांची जंगलं, वाड्या, आमराया सगळं सफाचट झालं होतं. या गगनाला भिडणाऱ्या इमारतींच्या जंजाळात मला माझं, लहानपणीचं छोट्ट घर शोधून काढायचं होतं. ज्या वाड्यात आम्ही तिन्ही त्रिकाळ उच्छाद घालायचो, तो पाटलाचा वाडा शोधायचा होता. समोरच एक पोलीस स्टेशन दिसलं. रम्याची आठवण आली. म्हटलं बघूया त्याचा काही ठावठिकाणा लागतोय का! भेटला तर त्याच्याच संगतीनं गाव पालथा घालू. लहानपणी विटीदांडू खेळताना करायचो, तसा याच पोलीस स्टेशनमध्ये तो होता.
शिरलोच आतमध्ये कोणीतरी दखल घेईपर्यंत, भिंतीवर लावलेले गुन्हेगारांचे फोटो बघत बसलो. शेवटी हात हालवत बाहेर पडलो. रम्या आता तिथे नव्हताच; पण पाटलाच्या वाड्याचा मात्र पत्ता मिळाला. पोहोचलो तिथे… आबाबाबाबाSS, वाडा कसला? बकिंगह्याम पॅलेसच होता तो! पण आता तो पाटलाचा वाडा नव्हता, इनामदाराचा होता. पम्यापण दोस्तच माझा! म्हटलं बघूया भेटतो का!
गेटवरचा दरवान पाहिल्यावर पोटात गोळाच आला. जुन्या सिनेमात दाखवतात तसा चंबळच्या खोऱ्यातला डाकू वाटत होता. या भल्यामोठ्या मिशा, त्यातच कानाशिलाकडचे कल्ले मिसळले होते. चेहराभर नुसत्या मिशाच मिशा… कायम पम्या म्हणायची सवय… त्याचं नावच आठवेना! मनाचा हिय्या करून त्याला विचारलं… शेवटी ‘साहेब भेटतील का?’
हेही वाचा – पित्याचा निर्णय!
महालात फोन… नोंद वहीत संपूर्ण माहिती, मेटल डिटेक्टरमधून तपासणी, अंगाची चाचपणी… असे सगळे सोपस्कार करून एकदाचा आत गेलो. माझी गाडी मात्र मला गेटच्या बाहेरच ठेवावी लागली.
जाताना दोन्ही बाजूला कमांडोंची कतार. दहशत बसेल असे एकेक चेहरे! महालात मात्र दिवाणखान्यातच शाही थाटात पम्या बसला होता. मला पाहिल्याबरोबर दोन्ही हात पसरून उठला, मला गळामिठी मारली… मी खूश! इतक्या वर्षांनी देखील मला ओळखलं म्हणून… आणि अचंबितही! पाचवीतच शाळा सोडल्यानंतर याची स्मरणशक्ती एवढी कशी वाढली या कल्पनेने… बोलता बोलता कळलं त्याने अबराकाडबरा युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट मिळवली होती.
माझं आगतस्वागत तर जंगी झालं. सोन्याच्या ट्रोलीवर ठेवलेल्या सोन्याच्या टी-सेटमधून मला चहा देण्यात आला. मी प्यायलो नाही, ओठ आणि जीभ भाजेल या भीतीने! बिस्किटं पण होती. ती देखील मी खाल्ली नाही. कोण जाणे, सोन्याच्या बिस्किटांना ग्लुकोजचा मुलामा दिलेला असायचा! एक म्हणता दोन व्हायचं! दाताचा तुकडाच पडायचा! ट्रोली घेऊनआलेला माणूसही नखशिखांत सोन्याने लगडलेला होता. गळ्यात मनगटाएवढ्या जाडीच्या डझनभर सोन्याच्या चेन, मनगटात, दंडावर, कमरेभोवती, बोटात, सगळीकडे निरनिराळ्या आकारात सोनंच सोनं. एवढंच काय, त्याची स्लीपर देखील सोन्याची होती. हा चेहरा देखील मला ओळखीचा वाटला होता. एकाच वेळी भीतीने माझ्या पोटात खड्डा पडून त्यात वटवाघळं उडत होती; मित्राचा उत्कर्ष बघून अभिमानाने भरून आलेल्या हृदयात फुलपाखर उडत होती; मेंदूत नाना विचारांचा गुंता होऊन, त्यात कोळी कोळिष्टके करीत होता.
एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला… अरेच्या, या सगळ्यांचे फोटो मी पोलीस स्टेशनच्या भिंतीवर ‘वाँटेड’च्या यादीत पाहिले होते! या चहा देणाऱ्याचा फोटो गंठण आणि चेन खेचाणाऱ्यांच्या गुन्हेगारांत होता. मी बाहेर जाण्यासाठी धडपडत गांगरून उभा राहिलो. पम्या मात्र चाणाक्ष, अंतर्ज्ञानी! त्याने माझा जांगडगुठ्ठा बरोब्बर ओळखला. माझ्या पाठीवर थोपटत म्हणाला, “तुला वाटतंय ते खरं आहे. अरे, हे सगळे गुन्हेगार माझ्या चाकरीला आहेत म्हणूनच तर पोलिसांना ते सापडत नाहीयेत. मी त्यांना मोठ्या उदार मनाने आधी माझ्याच घरात कामाला ठेवलेत. आता हळूहळू मी त्यांना सुधारणार आहे. माझ्याच घरात असल्यामुळे मला ते सोपेही जाणार आहे. नाहीतर, कुठे शोधत फिरू मी त्यांना सुधारण्यासाठी! मित्रा, एक लक्षात ठेव सज्जन – दुर्जन; सत्य – असत्य…” तो थोडा घुटमळला,
“पुण्य… पाप; चांगले… वाईट…” मी म्हणालो.
तो हसला! खळखळून, गडगडून आणि म्हणाला, “शाब्बास! तर मी काय म्हणत होतो, या सगळ्यांमध्ये नेहमी सज्जन, सत्य, पुण्य, चांगले यांचाच विजय होत असतो. दोस्ता, अंतिम विजय आपलाच आहे,” मला त्याची तळमळ कळत होती. त्याची कळकळ माझ्या जिव्हारी जाऊन पोहोचली होती.
हेही वाचा – आजच्या भाजीचा बेत…
मी मुंडी हलवली. पुन्हा पम्याने मला मिठी मारली. कमांडोंच्या पहाऱ्यातून मी बाहेर आलो. दरवानाने गेट उघडलं. मी माझ्या गाडीकडे वळलो आणि मटकन खालीच बसलो. गाडीची चारी चाकं, स्टीअरिंग व्हील, डेक सगळं चोरीला गेलं होतं. सैरावैरा धावतच मी पुन्हा महालाच्या गेटकडे वळलो. गेट बंद होतं, पण दरवानाच्या चौकीत मला एकावर एक ठेवलेली चार चाकं आणि इतर वस्तू दिसत होत्या.
मी दाणदाण गेट वाजवायला सुरुवात केली. कोणीही माझी दखल घेतली नाही. कमांडोंची ट्रिगरवरची बोटं मला दिसली. मी मुकाट्याने खाली मुंडी घालून रस्त्यावर आलो. आता काय करावं बरं! रिक्षाने जवळच्या पोलीस स्टेशनवर जावं की, शहाण्यासारखं एखादं गॅरेज गाठावं? काहीही करायचं तर पैसे तर हवेत! मी खिशात हात घातला आणि…
पम्याच्या गळामिठीचं रहस्य मला कळलं. पैश्याचं पाकीट गुल झालेलं होतं. मी कपाळावर हात मारला आणि स्वतःला कोसत, पाय फरफटवत, समजूतदारपणे स्टेशनच्या दिशेने चालायला सुरुवात केली…


