“अनया, अगं आज आपल्याला जायचं आहे ना अप्पूकडे. तू थांब जरा मी येते तुझ्याकडे आणि मग तुला तयार करून मी पण तयार होते. मग जाऊ आपण. तुला एवढं पोट घेऊन कुठे सगळं आवरता येणार आहे. त्यात पीयूष पण उद्या घरी नाही. दिल्लीला गेला आहे ना आज सकाळीच… आणि तुझी आई पण इथे नाहीये. मी बरोब्बर 3 वाजता येते, मग आपण जाऊ,” मैथिली असं बोलून फोन ठेवते.
मैथिली म्हणत होती ते काही तितकंसं खोटं नव्हतं. आताशा अनयाची हालचाल थोडीफार मंदावली होती. तिला सातवा महिना लागला होता. पोटाचा घेर चांगलाच वाढला होता. आतून बाळ भरपूर लाथापाणी खेळत होतं. खरंतर, अनया गेल्या काही दिवसांपासून खट्टू झाली होती. तिला आईची आठवण येत होती. आई इथे असती तर, तिने आपलं डोहाळजेवण केलं असतं या महिन्यात. पण ते दोघे दादाकडे गेलेत. वहिनी पण बाळंत झाली आहे, त्यामुळे आईला तिकडे जायला लागलं. आपलेही लाड पुरवले जावेत, बाळंतपणात आईने आपली सतत काळजी घ्यावी, असं तिला वाटत होतं.
पीयूष त्याच्यापरीने करतच होता सगळं, पण तरी आई ती आईच! तिने पीयूषजवळ ही खंत बोलूनही दाखवली. त्यावर तो तिला समजावत म्हणाला, “अगं त्यात काय एवढं. तू सारखा तोच विचार नको करूस. आता माझे आई-बाबा या जगात नाहीत आणि तुझे आई-बाबा तुझ्या दादाकडे बंगलोरला गेलेत तुझ्या वहिनीचं बाळंतपण करायला. तिकडे पण आत्ताच गोडुली आली आहे ना! मग ते कसे येणार त्या व्यापातून… आणि सगळ्याच बायकांची डोहाळजेवणं होतात, असं थोडीच आहे. आपण असं करू बाळ आलं ना, की मस्त त्याचं बारसं करूयात. अगदी दणक्यात… आता फक्त आपल्या बाळाच्या आणि तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची…” त्याच्या अशा बोलण्याने तिला थोडा धीर आला, पण विचार मनातून जातच नव्हते. तरीही तिने बाळाचा विचार करून आनंदी रहायचं ठरवलं.
आज तर तिच्या शाळेपासूनच्या खास मैत्रिणीकडे दरवर्षीप्रमाणे श्रावणी शुक्रवारचं हळदीकुंकू होतं. त्यामुळेच तर त्यांचा सात जणींचा ग्रुप तयार होऊन जायचा होता. मैथिली बरोब्बर तीन वाजता आलीच. तिने अनयाला अगदी छान, पण वजनाला हलकी साडी नेसवून दिली. केसांची साधीशीच, पण सुंदर केशभूषा केली. त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला… “अगं मैथिली, कित्ती सुंदर गजरा आहे. अगदी सुवासाने मन भरून गेलं बघ… पण तुझं काय हे? एवढी काय सजावट करतेस माझी. अगं साधं हळदीकुंकू तर आहे. कशाला हवाय इतका नट्टापट्टा.”
हेही वाचा – गुलकंद
यावर मैथिली हसतच म्हणाली, ” अगं ए बायो, ते मला काही विचारू नको. मला सगळ्यांनी सांगितलं, छान तयार होऊन यायचं आणि अनयाला थोडं जास्तच तयार करायचं आहे. अग तू आता आई होणार ना? मग पुढच्या एक-दोन महिन्यात अजून बिझी होशील. मग आम्हाला इतक्यात भेटशील की नाही… म्हणून करतेय सगळं आणि हो आता बडबड पुरे. मला पण साडी नेसायची आहे आणि आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे. नाहीतर बाकीच्या सगळ्या मला फाडून खातील.” असं म्हणत मैथिली तयार व्हायला गेली. थोड्या वेळाने दोघी अप्पूकडे पोहोचल्या.
अप्पूचं घर म्हणजे नागपुरातल्या जोश्यांचं बडं प्रस्थ. त्यामुळे अगदी प्रशस्त असा वाडाच. आज त्याला छान सजावट केली होती. वाड्याशी गेल्यावर समोर अप्पू उभी होतीच. “अगं अप्पू अशी दारात काय उभी आहेस? हळदीकुंकू आहे आणि तू निवांत कशी? आणि बाकी आपल्या मैत्रिणी, आपल्या “बिनधास्त बायका” कुठे आहेत?” असं अनयाने विचारताच अप्पूने मोठ्याने हसत टाळी वाजवत हाक मारली, ” या गं सगळ्या… आपली डोहाळतुली आली उंबऱ्यापाशी.” असं म्हणताच हातात औक्षणाचं तबक घेऊन छान तयार झालेल्या तिच्या मैत्रिणी आणि मधोमध नाकात नथ घालून डोळ्यात आनंदाचे अश्रू आणत अनयाची आई आली. सगळ्यांना बघून अनयाला धक्काच बसला. तिने बाजूला उभ्या मैथिलीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि मैथिलीने अनायाच्या कानाशी हळूच कुजबुज करत म्हटले,
” वेलकम डोहाळतुली मॅडम. आज तुमचं डोहाळजेवण आहे बरं!” हे ऐकताच अनयाचा आनंद गगनात मावेना. तिला काय बोलावं काही सुचेचना. आईने ओवाळून आत घेतलं तरी अनयाच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेच नाहीत. आत आल्यावर ती पहिले आईच्या गळ्यात पडून रडायलाच लागली. “आई तू कशी काय इथे? मला काहीच सांगितलं नाहीस. मी कित्ती वाट बघत होते. तुला भेटायला मन अगदी आतुर झालेलं, लहान झालेलं. सारखे तुझेच विचार येत होते आणि मनात वाटत होतं, तू असतीस तर नक्की माझं डोहाळजेवण केलं असतं.”
त्यावर डोळ्यातले रडवे भाव लपवत आई म्हणाली, ” अगं मलाही यायचं होतंच. पण तिकडे बाळाचं करण्यात मी इतकी दंग झाले की विचारूच नकोस. प्राचीची आई असती तर, तिने केलंच असतं सगळं तिचं आणि मला इथे तुझं करता आलं असतं सगळं. पण तू समजून घेते आहेस मला. आणखी एक गंमत सांगू का? मी आणि तुझे बाबा पुढच्या महिन्यात इथे परत येतोय. आमच्या लेकीचं कोडकौतुक आणि बाळंतपण करायला. पण या तुझ्या मैत्रिणी काही तोपर्यंत थांबायला तयार नाहीत… म्हणे नवव्या महिन्यात नको. आमच्या अनयाचं डोहाळजेवण आत्ताच आणि आम्हीच करणार…” असं आईने म्हणताच अनया विस्फरल्या डोळ्यांनी आईकडे बघत म्हणाली, “आई आज चक्क तू मैत्रिणी म्हणतेस. नेहमी तर सगळ्यांना ढालगज भवान्या म्हणतेस!”
त्यावर हसत आई म्हणाली, ” नाही गं! आज त्यांनी जे केलं आहे ना ते वाखाणण्याजोगं आहे. तुझा पडलेला चेहरा त्यांना दिसला आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हा सगळा घाट घातला. मलाही दोन दिवसांसाठी तरी तिकीट काढून याच अशी गळ घातली आणि बोलवून घेतलं. फक्त घाईगडबडीत तुझे बाबा येऊ नाही शकले याचं त्यांना पण वाईट वाटतंय. पण नातवंडांच्या स्वागताला सज्ज होत आहेत ते.. मी आज या सर्वजणींची खूप आभारी आहे. या काळात अशी जीवाला जीव लावणारी मैत्री असते हे यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी तुझ्या मनातलं गुपित ओळखलं हीच तर खरी मैत्री असते. आम्ही उगीच तुमच्या पिढीला प्रॅक्टिकल म्हणतो. तुम्ही भावना आणि व्यवहार दोन्ही अगदी छान सांभाळता आहात.” असं म्हणाल्यावर अनया ने सगळ्या मैत्रिणींना जवळ बोलवून मिठी मारली.
“आई तू म्हणतेस ते खरं आहे. आम्ही सगळ्या सातही जणी म्हणजे इंद्रधनुष्याचे सात रंग आहोत. इंद्रधनुष्य जसं सगळ्यांना हवंहवंसं असतं, सातही रंग एकमेकांना आलिंगन दिल्यागत एकमेकांना बिलगून उभे असतात. एखादा रंग जरी रुसला तरी इंद्रधनुष्याची मजा जाते. तशाच माझ्या या मैत्रिणी आहेत. तुम्हा सगळ्यांना खूप खूप थॅन्क्स! बाळ पण आतून लाथ मारून मावशांना ‘थँक यू’म्हणतंय. फक्त आज हे बघायला पीयूष हवा होता. नेमके दिल्लीला जाऊन बसलेत साहेब.” त्यावर प्राजक्ता म्हणाली, “अरे बापरे इतक्यातच ‘थँक्स’ म्हणालीस तर पुढे काय होणार… आणि इतकी पीयूषची आठवण काढू नकोस. त्याच्या उचक्या इथपर्यंत ऐकू येऊ लागल्या आहेत. आमचं अजून एक सरप्राइज बाकी आहे. ते बघ तिकडे आहे तुझं मोठं आणि लाडकं सरप्राइज. अनयाने मान वळवली आणि समोर तिचा नवरोबा, पीयूष उभा होता. आता मात्र अनया चक्रावली, “पीयूष तू? म्हणजे तू पण या सगळ्यांच्या डावात सामील होतास तर. मला जरासुद्धा गंधवार्ता दिली नाहीस याची. कमाल आहे तुझी!” असं म्हणून तिने पीयूषला मिठी मारली.
हेही वाचा – लेडीज स्पेशल
“अगं तुला काही हवे आहे आणि मी दिलं नाही, असं कधी झालंय का? आय लव्ह यू अनू… आणि खरंतर यात माझं काहीच नाही. मी फक्त त्यांना सांगितलं तुझ्या मनातलं… बाकी सगळी तुझ्या मैत्रिणींची कृपा. त्यांचा प्लॅन हा! एकसे बढकर एक आहेत सगळ्या… बरं चला आता सुरू करा. नाहीतर इथेच सरप्राइज देण्यात नऊ महिने पूर्ण व्हायचे.. आणि डोहाळजेवण सोडून बारसं करायला लागायचं.” असं त्याने म्हणताच एकच हशा पिकला.
नंतरचा सगळा कार्यक्रम अगदी सहज आणि छान पार पडला. मैत्रिणींनी इतर सर्वांची व्यवस्थासुद्धा अगदी चोख केली होती. अनया तर स्वर्गसुख अनुभवत होती. या सगळ्यांचं प्रेम अनया डोळ्यात आणि मनात साठवत होती… “महादेवा, मला मुलगा होवो किंवा मुलगी. मला काहीही चालेल. फक्त एकच कर देवा माझ्या बाळाला अशी सप्तरंगी इंद्रधनुष्य असलेली जीवश्च कंठश्च मैत्री आयुष्यभर लाभू दे म्हणजे भरून पावले मी…” असं म्हणून तिने नकळतपणे देवाला हात जोडले.


