कूकरची शिट्टी झाली, दाराची बेल वाजली… चटकन उठायचं, पटकन धावायचं, झटकन वळायचं, लगबग करायची… हे माझ्या अंगातच. मुद्दाम नाही करत. आपोआपच होतं. आई तर म्हणायचीच, “अगं अगं आपटशील!”
आणि खरोखरच घरातील कधीही न हालणाऱ्या वर्षोनुवर्ष एकाच जागी स्थिर असणाऱ्या भिंती, कपाट अशांवर मी आदळायची… हळूहळू माझं वय वाढलं. ओरडायला आई पण राहिली नाही.
एकदा मी बेडवर लोळत वाचत पडले होते. फोनची रिंग वाजली, तेव्हा लॅण्डलाइन फोन होते, मी ताडकन उठले, फोनकडे धावले आणि गुडघ्यातून कट्टकन आवाज झाला. एक पाऊल टाकता येईना. हे दुखणं पुढे मला सहा महिने पुरलं. घरात अडकले. हालचालींवर अनेक बंधनं आली. एका धसमुसळेपणामुळे! ज्याची काहीच गरज नव्हती. मी हे सर्व संथपणे करू शकले असते.
हेही वाचा – असेच कानावर पडलेले संवाद…
आपला जॉब, मुलं-बाळं, सांसारिक जबाबदाऱ्या… धावपळीचं आयुष्य म्हणजे मल्टी-टास्किंग! त्यामुळे आपल्या शरीराला काही सवयी आपोआप पडलेल्या असतात, काही आपण प्रयत्नाने अंगी बाणवलेल्या असतात. वय वाढत गेल्यावर यातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात, पण आपल्या सवयी मात्र त्याच राहिलेल्या असतात. त्या आपण जाणीवपूर्वक बदलायला हव्यात. कदाचित जबाबदाऱ्या कमी झाल्या नसतील किंवा आणखीन दुसऱ्या अंगावर पडल्या असतील… तरीही आपण बदलायला हवं. शीर सलामत तो पगडी पचास! स्वहीत जपावे, परहीत जाणावे. अग्रक्रम आपल्या स्वास्थ्यालाच द्यायला हवा.
आता मी पायऱ्या चढता उतरताना, रस्त्याच्या चढ उतारावर शांतपणे चालते. जिथे उपलब्ध असेल, तिथे कठड्याचा आधार घेणे. कोणी आधार देण्यासाठी हात पुढे केला तर, तो विनासंकोच स्वीकारणे… मग पुरुष आहे की स्त्री आहे, याचा विचार करीत न बसणे…
माणसं खरंच चांगली असतात. आपणही हा विश्वास मनात बाळगायचा. एकदा मी रस्ता ओलांडायला बराच वेळ उभी होते. तिथे आणि पुढे बऱ्याच अंतरावर सिग्नल नाहीये. दोन पावलं पुढे… चार पावलं मागे… असं माझं चाललं होतं. इतक्यात एक तरुण मुलगा आला, म्हणाला, “काकू मी लांबून बघितलं तुम्हाला, भराभरा आलो. चला, मी नेतो तुम्हाला पलीकडे…” त्याने मला सुखरुप रस्ता ओलांडून दिला.
वय वाढल्यावर आत्मविश्वास कमी होतो. अंतराचं, वेळेचं, आपल्या वेगाचं त्रैराशिक जुळत नाही. रिस्क घ्यायचीच नाही, सांभाळायचं स्वतःला! घरात स्लीपर्सऐवजी बंद बूट घालावेत. यावर एका ताईंनी म्हटलं होतं, “कितीही सांभाळा पडायचं असेल तर पडतोच!”
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
अगदी खरंय हे… तरीही स्वतःला सांभाळायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचाच. ‘होणारे न टळे ब्रह्मा येता जरी आडवा’ असं म्हणतातच. पण ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असंही म्हणतात… मग काय आपण नोकरी-धंदा, भविष्याची बेगमी नाही करीत? करतो ना? की त्या हरीची वाट पाहात बसतो? नाही ना? मग या ब्रह्माला तरी का संधी द्यायची? आपल्याला शक्य आहे तेवढं करायचंच!
माझी आई म्हणायची, “आपण सांभाळायचं आणि दुसऱ्यांना यश द्यायचं.”
तेव्हा मला फक्त शब्दार्थ कळायचा. आता भावार्थ कळतो.
आपल्याला काही झालं, तर आपल्याला काही करावं लागत नाही. आपण बेशुद्ध असतो किंवा वेदनांनी कण्हत, कुथत, कळवळत पडलेलो असतो. आपल्यासाठी धावपळ शुश्रूषा, आर्थिक तरतूद… सगळं आपल्या परिवाराला करावं लागतं. आपल्याला बरं वाटावं म्हणून ते इकडची दुनिया तिकडे करीत असतात! आपल्या तारुण्यातील कर्तबगारीचा वेळ ते आपल्यासाठी खर्च करीत असतात. आपल्या जीवलगांवरील आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही खूप मोठी संधी आपल्या हातात असते ती वापरूया… स्वत:ला सांभाळूया!


