अध्याय तेरावा
जैसें अवचितपणें । वायूसि सर्वत्र विचरणें । कां निरभिमान उदैजणें । सूर्याचें जैसें ॥527॥ कां श्रुति स्वभावता बोले । गंगा काजेंविण चाले । तैसें अवष्टंभहीन भलें । वर्तणें जयाचें ॥528॥ ऋतुकाळीं तरी फळती । परी फळलों हें नेणती । तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ती । कर्मीं सदा ॥529॥ एवं मनीं कर्मीं बोलीं । जेथ अहंकारा उखी जाहली । एकावळीची काढिली । दोरी जैसी ॥530॥ संबंधेंवीण जैसीं । अभ्रें असती आकाशीं । देहीं कर्में तैसीं । जयासि गा ॥531॥ मद्यपाआंगींचें वस्त्र । लेपाहातींचें शस्त्र । बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ॥532॥ तया पाडें देहीं । जया आहे हे सेचि नाहीं । निरहंकारता पाहीं । तया नांव ॥533॥ हें संपूर्ण जेथें दिसे । तेथेंचि ज्ञान असे । इयेविषीं अनारिसें । बोलों नये ॥534॥ आणि जन्ममृत्युदुःखें । व्याधिवार्धक्यकलुषें । इयें आंगा न येतां देखे । दुरूनि जो ॥535॥ साधकु विवसिया । कां उपसर्गु योगिया । पावे उणेयापुरेया । वोथंबा जेवीं ॥536॥ वैर जन्मांतरींचें । सर्पा मनौनि न वचे । तेवीं अतीता जन्माचें । उणें जो वाहे ॥537॥ डोळां हरळ न विरे । घायी कोत न जिरे । तैसें काळींचें न विसरे । जन्मदुःख ॥538॥ म्हणे पूयगर्ते रिगाला । अहा मूत्ररंध्रें निघाला । कटा मियां चाटिला । कुचस्वेदु ॥539॥ ऐसेऐसियापरी । जन्माचा कांटाळा धरी । म्हणे आतां तें न करीं । जेणें ऐसें होय ॥540॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें
अर्थ
ज्याप्रमाणे हेतूवाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचे उगवणे जसे निरभिमान असते; ॥527॥ अथवा वेद जसे स्वभावत: बोलतात अथवा गंगा नदी जशी हेतूवाचून वाहाते, त्याप्रमाणे अहंकारावाचून ज्याचे चांगले वागणे असते ॥528॥ वृक्षास योग्य ऋतुकाळात तर फळे येतात, परंतु आपणास फळे आली, हे वृक्ष जाणत नाहीत; त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मांमधे त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहेमी असते ॥529॥ याप्रमाणे जशी एकपदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनांतून, कर्मांतून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते ॥530॥ ज्याप्रमाणे आकाशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात, त्याप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्मे त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्यशिवाय ती कर्मे असतात ॥531॥ मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते ॥532॥ त्याप्रमाणे त्याला (आपण) देहामध्ये आहो, अशी आठवण नसते, त्याच्या त्या स्थितीला निरहंकारता हे नाव आहे. असे समज. ॥533॥ ही निरहंकारता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये. ॥534॥ आणि जन्म, मृत्यु, दु:ख, रोग, जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत तोच दुरून (प्राप्त होण्य़ाच्या आधीपासूनच) पाहतो. ॥535॥ जसे ठेव्यावर असलेल्या पिशाच्चाचा आधी प्रतिबंध दूर करण्याविषयी मांत्रिक जसा दक्ष असतो अथवा योगाभ्यासास येणार्या अडथळ्यासंबंधाने योगी जसा दक्ष असतो किंवा भिंत वाकडीतिकडी येऊ नये म्हणून, गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो ॥536॥ जसे सर्पाच्या मनातून जन्मांतरीचे वैर जात नाही, त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो. ॥537॥ डोळ्यात गेलेला खडा जसा डोळ्यात विरघळत नाही (म्हणजे सारखा खुपत राहतो), अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही (तर ते एकसारखे खुपत राहते), त्याप्रमाणे जो मागील जन्मांचे दु:ख विसरत नाही ॥538॥ तो म्हणतो, हाय! हाय! मी कसा या (जन्मामुळे) पुवाच्या खड्ड्यात शिरलो व मूत्रद्वाराने बाहेर निघालो! अरेरे, मी स्तनावरील घाम चाटला! ॥539॥ याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व तो म्हणतो की, ज्या योगाने (जन्म घ्यावा लागेल) असे भोगावे लागेल, ते मी आता करणार नाही. ॥540॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव


