भाग – 37
दिवाकर उठून त्याच्या शेजारी येऊन बसले. तेव्हा शर्वाय विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. त्यांनी शर्वायच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं —
“आराध्या तयार आहे का? आणि या निर्णयाच्या परिणामांची कल्पना आहे ना तुम्हाला?”
शर्वाय ठामपणे म्हणाला, “तिला मी कधीच जबरदस्तीने काहीच सांगितलं नाही. तिचं मत, तिचा आदर — हे माझं पहिलं कर्तव्य आहे… आणि परिणाम… तो स्वीकारायला मी तयार आहे. तिच्यासोबत असल्यास काहीही कठीण वाटणार नाही.”
दिवाकर आणि आजींचा नजरेचा एक छोटासा संवाद झाला — जणू काळजाच्या एका कोपऱ्यात आधीच त्यांनी हे नातं मान्य केलं होतं, फक्त वेळेची वाट पाहत होते.
“मग एक करा,” आजी म्हणाल्या, “तिच्या घरीही तुम्ही दोघं जाऊन स्पष्ट बोला. या नात्याला दोन घरांचा आशीर्वाद असणं महत्त्वाचं आहे.”
शर्वायने मान डोलावली. आता तो एकटा नव्हता. त्याच्या पाठीशी त्याच्या माणसांची मान्यता होती — आणि त्याचं प्रेम, आराध्या… त्याची ताकद होती.
शर्वाय खूप दिवसांनी घरी आला होता अन् आपल्या आयुष्यातील इतकी मोठी बातमी तो देणार होता, परंतु आज त्याची आईशी भेट झालीच नाही… घराबाहेर जायला तो निघाला, पण आईच्या आठवणीने त्याचे पाय तिथेच रेंगाळले… त्याला असं रेंगाळलेलं पाहून दिवाकर तिथे आले.
त्याच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, “थांब शर्वाय, इतक्यात आराध्याच्या घरी जाऊ नकोस. आपण आधी ही गोष्ट दादांच्या कानावर घालू, ते योग्य ते सुचवतील… तशी कृती करायला आपण मोकळे.”
बाबांचं हे बोलणं शर्वायला पटलं त्याने होकारात मान हलवली… आपल्या मुलाचा आणि नातवाचा संवाद सुमित्रा आजी कौतुकाने पाहत आणि ऐकत होत्या. आराध्याला भेटल्यापासून तीच आपली नातसून व्हावी, अशी इच्छा आजी बाळगून होत्या. पण ही आजकालची मुलं… आपले विचार पटतील की नाही, कोणास ठाऊक? असंच त्यांना वाटलं होतं. पण नशीब आता मुलांनीच एकमेकांना पसंत केलं होतं, त्यामुळे आजींचा आनंद द्विगुणित झाला होता… शर्वाय समोर दाखवणं त्यांनी मात्र टाळलं.
आजी आणि आपल्या वडिलांना भेटून सकाळीच आपल्या मूळ वसंतविहार बंगल्यातून तो ऑफिससाठी निघाला होता. आराध्या अजूनही फ्लॅट वर सुरक्षित होती. पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच कठोर भाव होते — गंभीर, रोषाने भरलेले…
0000
त्याने जसं ऑफिसमध्ये पाऊल टाकलं, एकदम सगळं वातावरण बदलून गेलं… फॉर्मल ऑफ व्हाइट शर्ट आणि ब्राऊन ब्लेझर… चेहरा शांत असला तरी, आता हा कोणाला खाईल की गिळेल, असा काहीसा त्याचा अविर्भाव होता… त्याच्या थेट एंट्रीनं सगळे चक्रावले.
हेही वाचा – आराध्याला पुन्हा भेटला शिवा…
सामान्यतः शांत वाटणारा शर्वाय, आज शांततेचा मुखवटा फेकून विस्फोटक शांतता घेऊन आला होता. कॉन्फरन्स रूममध्ये प्रवेश करताच, तो म्हणाला…
“माझ्या साइनशिवाय ही फायनल प्रेझेंटेशन फाइल सबमिट झाली कशी?”
कपाळावरच्या आठ्या होत्या. सगळे टीम लीड्र्स एका मागून एका खुर्चीत बसले होते — पण कोणाचीही थेट शर्वायच्या डोळ्यांमध्ये पाहण्याची हिम्मत होत नव्हती.
“तुमच्या मधला कोणीतरी माझ्या विश्वासाला तडा देतोय… आणि मला तो चेहरा शोधायला वेळ लागणार नाही,” त्याच्या आवाजात धार होती.
एक मोठ्या टेंडरच्या दस्तऐवजांमध्ये फेरफार झाल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं… आणि हे काम केवळ आतली व्यक्तीच करू शकते, हे त्याला माहीत होतं.
“मी कुठे होतो, कोणाबरोबर होतो — यापेक्षा महत्त्वाचं आहे, माझं ऑफिस कोण चालवतंय!”
त्याचं फक्त विचारणं नव्हतं… ते आरोप होते… आणि सगळ्यांना ते जाणवत होतं. कारण, कधी नव्हे ते उगीचच त्याच्याबाबत कोणी तरी वावड्या उठवत होतं. आपल्याच मालकाबाबत अशा वावड्या उठवणं योग्य नसलं तरी, लोकं विनाकारण नको ते विषय चघळत होते. आपल्या सिक्रेट लोकांच्या मार्फत सगळं काही त्याला कळत होतं, पण तो जाणून बुजून दुर्लक्ष करत होता.
“काम सोडून, नको ती चर्चा… गॉसिप करायला तुम्हाला जमतं, पण एखादा तुमच्यात येऊन ऑफिसविरोधात एखादी ॲक्टिव्हिटी करतो, ते कळत कसं नाही? लक्ष ठेवत का नाही? की तुम्ही सगळेच त्याला मिळालेले आहात?”
शर्वाय चांगलाच बरसत होता… कोणाचाही ब्र उच्चारायची हिंमत नव्हती. सगळ्यांना शेवटची वॉर्निंग देऊन तो निघाला… तो तिथून बाहेर पडल्यावर दत्ता त्याच्या मागे गेला.
“बॉस… तुम्ही बरोबर आहात. काहीतरी घोटाळा झालाय. मला दोन दिवस द्या, मी मुळापर्यंत पोहोचतो.”
शर्वाय फक्त एक वाक्य बोलला, आणि पुढे निघून गेला…
“दत्ता, या इमारतीत जे काही सडलंय, ते उखडून बाहेर काढायचंय.”
एक क्षण दोघांची नजरा नजर झाली… फार कमी शब्दांत शर्वाय बरंच काही सांगून गेला…
“क्षितिज 9” हा जहागीरदार इंडस्ट्रीजचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प… हा शर्वाय जहागीरदारचा ड्रीम प्रोजेक्ट होता… एक हाय-टेक, ग्रीन एनर्जीवर चालणारं औद्योगिक टाऊनशिप, जे महाराष्ट्रातल्या एका अशा लोकेशनवर उभारलं जाणार होतं, जो नेहमी वादग्रस्त राहिला आहे. पण या प्रकल्पामुळे लोकांना रोजगार मिळणार होता, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित होणार होती… आणि जहागीरदार इंडस्ट्रीजच्या नावावर एक शाश्वत विकासाचं ब्रीद उमटणार होतं!
शर्वायने स्वतः या प्रोजेक्टच्या जागेपासून ते प्रत्येक डिझाइनपर्यंत लक्ष दिलं होतं. त्याचं स्वप्न होतं की, ही जागा उद्योग आणि निसर्गाच्या समतोलात वसलेली असेल — जिथे कामही होईल आणि माणुसकी ही जपली जाईल!
या प्रकल्पासाठी गुप्त लिलावाची प्रक्रिया सुरू झाली होती. जहागीरदार ग्रुप हा सर्वात प्रबळ दावेदार होता. पण कुणीतरी गुपचूपपणे एक डार्क प्ले खेळला होता…
जहागिरदार कंपनीच्या फायनान्स टीममधल्या एका विश्वासू कर्मचाऱ्याशी संगनमत केले गेलं होतं… त्याला एक मोठी रक्कम आणि पुढील काही दिवसांत त्यांच्या फर्ममध्ये मोठ्या पदावर नियुक्तीचे आमिष दाखवले गेले होते…
मुळातच ती एक बनावट डेव्हलपमेंट फर्म तयार केली गेली होती… या फर्मने त्या लिलावात जहागीरदार इंडस्ट्रीजच्या अगदी जवळची, पण थोडीशी जास्त बोली लावली — पण ही इतकी बारीक माहिती त्याला कशी मिळाली? हा प्रश्न होताच…
कारण “क्षितिज 9” प्रोजेक्टचे इनसाइड डिटेल्स — लँड मॅपिंग, बँक गॅरंटी आणि डिझाइन प्लॅन्स — आराध्याच्या सिस्टीममध्ये होते… ते तिथून हॅक करून घेणं सोपं होतं आणि उद्या काही झालंच. तर या सगळ्यात तिचा हात होता, हे दाखवता येणंही सोपं होतं…
कॉन्फरन्स करता आराध्या जाईल, असं पाहून तिच्यावर लक्ष ठेवलं जातं होतं… आणि झालंही तसंच! त्याने पाहिलं की, आराध्या अजूनही कॉन्फरन्सला आहे आणि तिची सिस्टीम ॲक्सेस ओपन राहिलं… हो, नेमकी त्या दिवशी तिची सिस्टीम ओपन राहिली होती…
पण इथे कुणी तरी जागरूक होतं, नजर ठेवून होतं…
‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक झाल्याचं कळताच आराध्या थिजून गेली.
शर्वायसारख्या परिपक्व आणि संयमी माणसाच्या चेहऱ्यावरचा तो संताप, ती उग्र नजर — त्या ऑफिसमध्ये इतकं तणावपूर्ण वातावरण होतं…. की, पुढे काय होतंय आणि काय नाही, याची सर्वाना भीती वाटतं होती…
आराध्या गप्प होती, पण तिच्या डोळ्यांत एक खोल अपराधी भाव दाटून आला होता. तिच्याच सिस्टीमवरून काहीतरी लीक झालं होतं, आणि ती जाणीव तिला आतून पोखरत होती.
“किती काळजी घेतो तो… तरीही चुकून का होईना, ही उणीव माझ्याकडूनच राहिली!”
शर्वायने कॉन्फरन्स रूममधल्या प्रत्येक माणसाला धारेवर धरलं होतं. त्याचा आवाज शांत होता, पण त्यातली ती धार — बोलणं म्हणजे जणू एक एक शब्दांनी समोरच्याच्या मनात उलथापालथ सुरू होती.
हेही वाचा – आराध्याचे धाडस अन् शर्वाय…
“ही चूक म्हणजे केवळ माहितीची चोरी नाही. ही विश्वासघाताची सुरुवात आहे. आणि मी हे घरं, ही कंपनी — कोणासाठीच गमावणार नाही.”
त्याचा गंभीर स्वर कॉन्फरन्स रूममध्ये घुमला. सगळे स्तब्ध होते… आणि त्यात आराध्या — त्याला समजून घेऊ पाहणारी… पण स्वतःलाही माफ न करू शकणारी!
शर्वाय तिच्या समोर आला, त्याच्या नजरेत प्रश्न नव्हता — फक्त एक ओळखीचा विश्वास होता.
“मला माहिती आहे, तू नाहीस यामागे. पण माझ्या सावलीतून चालणाऱ्यांनी ही चूक का केली, हे शोधण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन करावं लागेल, आराध्या.”
ती त्याच्याकडे पाहत राहिली… तो शर्वाय होता — रागात असलेला, पण अजूनही तिच्यावर विश्वास ठेवणारा! त्या क्षणी तिच्या मनात उमटलेलं फक्त एकच वाक्य होतं…
“ज्याने आपल्यावर एवढा विश्वास दाखवलाय, त्याच्यासाठी मी आता स्वतःला सिद्ध करणारच…”


