अध्याय तेरावा
जयाचां मनीं आलस्य । देही अतिकार्श्य । यमदमीं सामरस्य । जयासि गा ॥517॥ तपोव्रतांचा मेळावा । जयाचां ठायीं पांडवा । युगांत जया गांवा- । आंतु येतां ॥518॥ बहु योगाभ्यासीं हांव । विजनाकडे धांव । न साहे जो नांव । संघाताचें ॥519॥ नाराचाचीं आंथुरणें । पूयपंकीं लोळणें । तैसें लेखी भोगणें । ऐहिकींचें ॥520॥ स्वर्गातें मानसें । ऐकोनि मानी ऐसें । कुहिलें पिशित जैसें । श्वानाचें कां ॥521॥ तें हें विषयवैराग्य । जें आत्मलाभाचें भाग्य । येणें ब्रह्मानंदा योग्य । जीव होती ॥522॥ ऐसा उभयभोगीं त्रासु । देखसी जेथ बहुवसु । तेथ जाण रहिवासु । ज्ञानाचा तूं ॥523॥ आणि सचाडाचिये परी । इष्टापूर्तें करी । परि केलेंपण शरीरीं । वसों नेदी ॥524॥ वर्णाश्रमपोषकें । कर्में नित्यनैमित्तिकें । तयामाजीं कांहीं न ठके । आचरतां ॥525॥ परि हें मियां केलें । कीं हें माझेनि जालें । ऐसें नाहीं ठेविलें । वासनेमाजीं ॥526॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं
अर्थ
ज्याच्या मनात विषयसेवनाचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व यमदम करण्यात ज्याला आनंद वाटतो ॥517॥ अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपाची व व्रतांची गर्दी असते व ज्याला गावात येतांना प्रलयकालाप्रमाणे संकट वाटते ॥518॥ योगाभ्यासाविषयी ज्याची अति उत्कट इच्छा असते व एकांतात राहण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही ॥519॥ बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे, तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो ॥520॥ स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की, ते जसे कुत्र्याचे कुजलेले मांस आहेत ॥521॥ वर सांगितलेले विषयांविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात ॥522॥ जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल, तेथे ज्ञानाची वसती आहे, असे समज ॥523॥ आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो, परंतु केल्याचा फुंज शरीरात राहू देत नाही ॥524॥ वर्णाश्रमधर्माला पोषक अशी नित्यनैमित्तिक कर्मे करीत असता, त्यात काहीही कमी नसते ॥525॥ परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्याने सिद्धीला गेले, असा अहंकार वासनेमधे ठेवलेला नाही. ॥526॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें


