संत एकनाथ महाराजांचे ‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले’ हे भारूड अत्यंत श्रेष्ठ आध्यात्मिक ठेवा आहे. नाथांना यातून प्रपंचातील ‘भास’ आणि परमार्थातील ‘अनुभव’ यांची सांगड घालायची आहे.
चिंचेच्या पानावर देऊळ रचिले |
आधी कळसू मग पाया रे |
देव पुजू गेले तव देऊळ उडाले |
खेळिया सद्गुरुराया रे ||
नाथांनी इथे मानवी देहाचे वर्णन ‘चिंचेच्या पानावर’ असे केले आहे. चिंचेचे पान हे लहरी आणि चंचल असते. आपला हा देह देखील पंचमहाभूतांच्या एका लहरीवर उभा आहे.
‘आधी कळसू मग पाया’
गर्भाश्रमात असताना माणसाचे ब्रह्मरंध्र, मस्तक आधी तयार होते आणि मग इतर देह! माणसाचा ‘अहंकार’ हा कळसासारखा उंच दिसतो. जेव्हा सद्गुरूंच्या कृपेने आपण अंतरात्म्यातील परब्रह्म ईश्वराला ओळखतो, तेव्हा लक्षात येतं की, हा देह तर केवळ ‘भास’ आहे. ‘देऊळ उडाले’ म्हणजे देहबुद्धी नष्ट झाली आणि केवळ चैतन्य उरले. हा सर्व खेळ त्या सद्गुरू माऊलीचा आहे.
यदा देवं भजेत् कश्चित्
देहभानं विलीयते ।
सद्गुरोः कृपया सा हि
मुक्तिः सहजसंज्ञिता ।।
– गीताव्रत
जेव्हा एखादा मनुष्य मनापासून, पूर्ण समर्पणाने देवाचे भजन करू लागतो, तेव्हा त्याचे लक्ष हळूहळू शरीरापासून दूर जाऊ लागते. ‘मी हा देह आहे’ ही जाणीव मंदावू लागते. देह, त्याच्या इच्छा, त्याचे सुखदुःख यांचे भान विरघळू लागते. मन अधिक शांत, अधिक निर्मळ होत जाते. या अवस्थेत मनुष्य स्वतःच्या आतल्या परमसत्या जवळ जातो. बाह्य जगाची धावपळ, अहंकार आणि आसक्ती यांचा प्रभाव कमी होतो. मन एकाग्र होऊन ईश्वरात रमू लागते. ही अवस्था केवळ स्वतःच्या प्रयत्नाने पूर्ण होत नाही, तर त्यामागे सद्गुरूंची कृपा असते.
हेही वाचा – कान्होपात्रेचे समर्पण
सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि कृपेने ही अंतर्मुखता अधिक गाढ होते. त्यांच्या कृपेने मनातील अज्ञान दूर होते आणि खरे स्वरूप जाणवू लागते. त्या वेळी जे मुक्तत्व प्राप्त होते, ती सहज मुक्ती! ही मुक्ती कष्टाने मिळवलेली नसते, ती नैसर्गिकपणे, सहजपणे प्रकट होते. जिथे देहभान नाही, अहंकार नाही, तिथेच खरे स्वातंत्र्य असते. अशी ही शांत, निर्मळ आणि आनंदमय अवस्था म्हणजेच सहज मुक्ती होय.
पाषाणाची सांगड मृगजळ डोही |
वांझेचा पुत्र पोहला रे |
‘पाषाणाची सांगड’ म्हणजे आपले हे जड कर्म आणि जड देह. ‘मृगजळ डोह’ म्हणजे हा संसार! मृगजळात पाणी नसते, पण तरीही ते लांबून पाणी आहे, असेच भासते. तसाच संसारही मृगजळासारखाच भास असतो, त्यात सुख नाही. ‘वांझेचा पुत्र’ म्हणजे आपला ‘अहंकार’. वांझेला पुत्र नसतो, म्हणजे जो मुळात अस्तित्वातच नाही, तरीही उगाचच प्रौढी, मिजास म्हणजे हा खोटा अहंकार!
हा खोटा अहंकार या खोट्या संसारात पोहतो आहे, असा आपल्याला खोटाच भ्रम होतो. जेव्हा ज्ञान होते, तेव्हा कळते की, हा पोहणाराही खोटा आणि डोहही खोटा!
दुहीतोंडी हरणी पाणी पिण्या आली |
मुखाविण पाणी प्याली रे |
‘दुहीतोंडी हरणी’ म्हणजे आपली ‘द्वैत बुद्धी’ किंवा ‘आशा तृष्णा’. जिला संसाराचे एक तोंड आणि परमार्थाचे दुसरे तोंड आहे. ही हरणी विषयांचे पाणी प्यायला येते, पण ती ‘मुखाविण’ पिते. याचा अर्थ असा की, वासना ही शरीराने नव्हे, तर मनाने विषयांचा उपभोग घेते. डोळे बंद असले तरी, मन मात्र, अगदी स्वप्नातही विषयांचे सेवन, चिंतन करते यालाच ‘मुखाविण पाणी पिणे’ म्हणतात.
आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले |
पांगळ्याने पाठलाग केला रे |
इथे नाथांनी आपली ज्ञानेंद्रिये कशी पालटतात, हे सांगितले आहे. जोपर्यंत आपण आत्मज्ञानशून्य आहोत, तोपर्यंत आपण आंधळेच आहोत. पण सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा अंतर्चक्षू उघडतात, तेव्हा या ‘आंधळ्या’ जीवात्म्याला ते अदृश्य तत्त्व दिसू लागते. बहिरा, जो जगाच्या कोलाहलाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो, तो बहिरा होतो, तोच अंतरातील ‘अनाहत नाद’ ऐकू शकतो. कानांची तिथे गरज नसते. पांगळा असं म्हटलंय, कारण आपले ‘मन’ हे पांगळे आहे. कारण त्याला पाय नाहीत, पण ते सर्वत्र धावते. जेव्हा हे मन सद्गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून साधना करते, तेव्हा ते स्थिर होऊन ईश्वरापर्यंत पोहोचते.
एकाजनार्दनी एकपणे विनवी |
हरिच्या नामे तरलो रे ||
शेवटी नाथ महाराज म्हणतात की, माझ्या जनार्दन स्वामींच्या चरणी मी एकरूप झालो आहे. हे सर्व चमत्कार, हे सर्व कूट प्रश्न तेव्हाच सुटतात, जेव्हा आपण हरीच्या नामाचा आधार घेतो. नामस्मरण हे एकमेव सत्य आहे, जे या ‘उफराट्या’ संसारातून आपल्याला सरळ मार्गावर आणते.
हेही वाचा – हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन
नाथ म्हणतात, “मी स्वतः या हरिनामानेच तरून गेलो आहे आणि तुम्हालाही हीच विनंती करतो आहे की, तुम्ही आता नामाची कास धरा! “दृष्टी बदला, म्हणजे सृष्टी बदलेल!” आपण आत्मबुद्धीने पाहू, त्या दिवशी आपल्याला कळेल की, हा सर्व ईश्वराचा खेळ आहे.
अहंकाराचा ढग, सद्गुरू म्हणजे वारा… जो हे ढग दूर करतो आणि आपल्याला आतला ईश्वर दाखवतो. नाथमहाराज सांगतात, हे जग गुंतागुंतीचे आणि उफराटे वाटते, पण ते नामाच्या, नामस्मरणाच्या बळावर सोपे आहे. संकोच सोडा, द्वैत सोडा आणि त्या ‘एकपणात’, ‘अद्वैतात’ विलीन व्हा!
महाराजांचे हे भारूड आपल्याला संसारातील ‘असत्यता’ आणि नामातील ‘सत्यता’ एकाच वेळी पटवून देते. हरीच्या नामाने भवसागरातून सहज पोहून जाऊया!


