अध्याय तेरावा
येतुलेंवरी धिंवसा । जयाचिया मानसा । आणि करूनियाहि तैसा । अपारुचि ॥437॥ रात्री दिवो नेणे । थोडें बहु न म्हणें । म्हणियाचेनि दाटपणें । साजा होय ॥438॥ तो व्यापारु येणें नांवें । गगनाहूनि थोरावे । एकला करी आघवें । एके काळीं ॥439॥ हृदयवृत्ती पुढां । आंगचि घे दवडा । काज करी होडा । मानसेंशीं ॥440॥ एकादिया आळामाळा । श्रीगुरुचिया खेळा । लोण करी सकळा । जीविताचें ॥441॥ जो गुरुदास्यें कृशु । जो गुरुप्रेमें सपोषु । गुरुआज्ञे निजवासु । आपणचि जो ॥442॥ जो गुरुकुळें सुकुलीनु । जो गुरुबंधुसौजन्यें सुजनु । जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु । निरंतर ॥443॥ गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम । गुरुपरिचर्या नित्यकर्म । जयाचें गा ॥444॥ गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माय गुरु पिता । जो गुरुपूजेपरौता । मार्गु नेणें ॥445॥ श्रीगुरूचे द्वार । तें जयाचें सर्वस्व सार । गुरुसेवकां सहोदर । प्रेमें भजे ॥446॥ जयाचें वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र । गुरुवाक्यावांचूनि शास्त्र । हातीं न शिवे ॥447॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे
अर्थ
येथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे सेवा करूनही गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा शिल्लक राहिलेलीच असते. ॥437॥ (गुरुसेवेपुढे) तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची दाटी असली म्हणजे तो प्रसन्न असतो. ॥438॥ गुरुसेवा करावयाची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटा गुरूंची सर्व सेवा एकाच काळी करतो. ॥439॥ त्याच्या अंत:करणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते, त्याची प्रत्यक्ष कृति मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करते. ॥440॥ श्रीगुरूंच्या एखाद्या जराशा लीलेला तो आपल्या सर्व जीविताचे लोण करतो (म्हणजे आपले सर्व जीवित त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो). ॥441॥ जो गुरुसेवेच्या योगाने कृश झालेला असतो, जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो आपण स्वत: गुरूंच्या आज्ञेचे स्वत:च्या राहण्याचे ठिकाण असतो, ॥442॥ जो गुरूंच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो, जो आपल्या गुरुबंधुवरील स्नेहाच्या योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहेमी गुरुसेवेच्या छंदामुळे नादी असतो ॥443॥ गुरुसंप्रदायाचे जे आचार असतात, ती ज्यांची वर्णाश्रम विहित कर्मे असतात, अरे, गुरुसेवा हे ज्यांचे नित्य कर्म असते ॥444॥ गुरु हेच क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरूच माता, गुरूच पिता, तो गुरुपूजेपलीकडे दुसरा मार्ग जाणत नाही. ॥445॥ श्रीगुरूंचे दार हेच ज्याचे सर्वस्व सार आहे असा तो गुरुसेवकांना सख्ख्या भावाच्या प्रेमाने भजतो ॥446॥ ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते, व गुरुवाक्यावाचून दुसर्या शास्त्राला हात लावीत नाही, ॥447॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : श्रीगुरु वोंवाळिजती, कां भुवनीं जे उजळिती


