अध्याय तेरावा
गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं । ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥413॥ म्हणे गुरूचें भुवन । आपण मी होईन । आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिंचें ॥414॥ निर्गमागमीं दातारें । जे वोलांडिजती उंबरे । ते मी होईन आणि द्वारें । द्वारपाल ॥415॥ पाउवा मी होईन । तियां मीचि लेववीन । छत्र मी आणि करीन । बारीपण ॥416॥ मी तळ उपरु जाणविता । चंवरु धरु हातु देता । स्वामीपुढें खोलता । होईन मी ॥417॥ मीचि होईन सागळा । करूं सुईन गुळळां । सांडिती तो नेपाळा । पडिघा मीचि ॥418॥ हडप मी वोळगेन । मीचि उगाळु घेईन । उळिग मी करीन । आंघोळीचें ॥419॥ होईन गुरूचें आसन । अलंकार परिधान । चंदनादि होईन । उपचार ते ॥420॥ मीचि होईन सुआरु । वोगरीन उपहारु । आपणपेनि श्रीगुरु । वोंवाळीन ॥421॥ जे वेळीं देवो आरोगिती । तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं । मीचि होईन पुडती । देईन विडा ॥422॥ ताट मी काढीन । सेज मी झाडीन । चरणसंवाहन । करीन मीचि ॥423॥ सिंहासन होईन आपण । वरि श्रीगुरु करिती आरोहण । होईन पुरेपण । वोळगेचें ॥424॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाभीं आपणचि जन्मे ऐसें गुरुमूर्तिप्रेमें
अर्थ
गुरूच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन, याप्रमाणे तो मनोरथांच्या अनंत सृष्टि तयार करतो. ॥413॥ तो म्हणतो, गुरूंचे राहते घर, मी स्वत: होईन व त्यांच्या घराचा चाकर होऊन तेथील चाकरी (मीच) करीन. ॥414॥ श्रीगुरु बाहेर जातेवेळी व घरात येतेवेळी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मी होईन. आणि घराची दारे व दारांवरील राखण करणारे गडी मीच होईन. ॥415॥ श्रीगुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्यांचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करीन. ॥416॥ श्रीगुरूंना खड्डा, उंचवटा जाणविणारा (चोपदार) मीच होईन, त्यांच्यावर चवरी धरणारा मीच होईन, त्यांना हात देणारा मीच होईन व श्रीगुरूपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन. ॥417॥ श्रीगुरूंची झारी धरणारा शागीर्द मीच होईन व त्यांना चूळ भरण्याकरिता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन. ॥418॥ श्रीगुरूंना विडा देण्याची सेवा मीच करीन, त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. ॥419॥ गुरूंचे आसन मी होईन, त्यांच्या अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदनादि उपचार मीच होईन. ॥420॥ श्रीगुरूंचा स्वयंपाक करणारा आचारी मीच होईन व त्यास फराळाचे वाढीन व मी आपल्या आपलेपणाने श्रीगुरूस ओवाळीन. ॥421॥ श्रीगुरु जेव्हा भोजन करतील, तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व (भोजन झाल्यानंतर त्यांच्या) पुढे मीच होईन आणि विडा देईन. ॥422॥ श्रीगुरूंचे भोजन केलेले पान मीच काढीन व त्यांचा बिछाना मी झाडीन व त्यांचे पाय मीच चेपीन. ॥423॥ मी स्वत: सिंहासन होईन, त्यावर गुरु बसतील व मी त्यांची संपूर्ण सेवा करीन ॥424॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये


