अध्याय तेरावा
श्रीगुरूंचें मन । जया देईल अवधान । तें मी पुढां होईन । चमत्कारु ॥425॥ तया श्रवणाचा अंगणीं । होईन शब्दाचिया आक्षोणी । परिसु होईन घसणी । आंगाचिया ॥426॥ श्रीगुरूंचे डोळे । अवलोकनें स्नेहाळें । पाहाती तियें सकळें । होईन रूपें ॥427॥ तिये रसने जो जो रुचेल । तो तो रसु म्यां होईजेल । गंधरूपें कीजेल । घ्राणसेवा ॥428॥ एवं बाह्यमनोगत । गुरुसेवा समस्त । वेंटाळीन वस्तुजात । होऊनियां ॥429॥ जंव देह हें असेल । तंव ऐसी वोळगी कीजेल । मग देहांतीं नवल । बुद्धि आहे ॥430॥ इये शरीरींची माती । मेळवीन तिये क्षिती । जेथ श्रीचरण उभे ठाती । आराध्याचे ॥431॥ माझा स्वामी कवतिकें । स्पर्शति जियें उदकें । तेथ लया नेईन निकें । आपीं आप ॥432॥ श्रीगुरु वोंवाळिजती । कां भुवनीं जे उजळिती । तयां दीपांचिया दीप्तीं । ठेवीन तेज ॥433॥ चवरी हन विंजणा । तेथ लयो करीन प्राणा । मग आंगाचा वोळगणा । होईन मी ॥434॥ जिये जिये अवकाशीं । श्रीगुरु असती परिवारेंसीं । आकाश लया आकाशीं । नेईन तिये ॥435॥ परि जीतु मेला न संडीं । निमेषु लोकां न धडीं । ऐसेनि गणाविया कोडी । कल्पांचिया ॥436॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये
अर्थ
श्रीगुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तु मीच होईन, असा चमत्कार करीन. ॥425॥ श्रीगुरूंच्या श्रवणरूप अंगणात असंख्य शब्द मी होईन, त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्शविषय मी होईन. ॥426॥ श्रीगुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तु पहातील त्या त्या सर्व मीच होईन. त्यांच्या जिभेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणांची सेवा करीन. ॥427॥ त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल् तो तो मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणाची सेवा करीन. ॥428॥ याप्रमाणे सर्व वस्तुमात्र मी होऊन श्रीगुरूंची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन, असे त्याचे मनोगत असते. ॥429॥ हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून याप्रमाणे सेवा घडेल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड बुद्धीमधे मी धरीन. (ती अशी) ॥430॥ जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे रहातील, त्या जागी या (माझ्या) शरीराची माती मिळवीन. ॥431॥ माझे स्वामी ज्या पाण्याला सहजच स्पर्श करतील त्या पाण्यात मी माझ्या शरीरातील पाणी चांगले लयाला नेईन. ॥432॥ ज्या दिव्यांनी श्रीगुरूंस ओवाळतात अथवा जे दिवे श्रीगुरूंच्या मंदिरात लावतात, त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिसळीन. ॥433॥ श्रीगुरूंची चवरी व पंखा जो असेल तेथे (त्या चवरीत व पंख्यात) मी माझ्या प्राणांचा लय करीन. व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा (वारा) मी होईन. ॥434॥ ज्या ज्या पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन. ॥435॥ परंतु जिवंत असतांना अथवा मेल्यावर श्रीगुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिषभर (सुद्धा) गुरूंची सेवा) लोकांवर सोपविणार नाही व अशी ही सेवा कोट्यावधी कल्पांचा काल मोजला तरी चालू राहील. ॥436॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे


