अध्याय तेरावा
तरि जीवों ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निकें । जैसें गुरु कौतुकें । माग म्हणती ॥403॥ तैसिया साचा उपास्ती । गोसावी सुप्रसन्न होती । तेथ मी विनंती । ऐसी करीन ॥404॥ म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा । तेतुलें रूप होआवा । मीचि एकु ॥405॥ आणि उपकरतीं आपुलीं । उपकरणें आथि जेतुलीं । माझीं रूपें तेतुलीं । होआवीं जी ॥406॥ ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती गुरु । मग तो परिवारु । मीचि होईन ॥407॥ उपकरणजात सकळिक । तें मीचि होईन एकैक । तेव्हां उपास्तीचें कवतिक । देखिजेल ॥408॥ गुरु बहुतांची माये । परी एकलौती होऊनि ठाये । तैसें करूनि आण वायें । कृपे तिये ॥409॥ तया अनुरागा वेधु लावीं । एकपत्नीव्रत घेववीं । क्षेत्रसंन्यासु करवीं । लोभाकरवीं ॥410॥ चतुर्दिक्षु वारा । न लाहे निघों बाहिरा । तैसा गुरुकृपें पांजिरा । मीचि होईन ॥411॥ आपुलिया गुणांचीं लेणीं । करीन गुरुसेवे स्वामिणी । हें असो होईन गंवसणी । मीचि भक्ती ॥412॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हृदयशुद्धीचां आवारीं, आराध्यु तो धुरु करी
अर्थ
तर त्याच्या मनात असा विचार असतो की, मी गुरूचे असे चांगले दास्य करीन की, जेणेकरून गुरु मला प्रेमाने माग म्हणून म्हणतील. ॥403॥ तशा खर्या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील, त्या वेळी मी अशी विनंती करीन. ॥404॥ मी असे म्हणेन की, देवा, हा जो तुमचा सर्व परिवार आहे, तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे ॥405॥ आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे (पूजेची भांडी वगैरे वस्तु) आहेत, महाराज, तेवढे सर्व मी व्हावे. ॥406॥ असा मी (श्रीगुरूला) वर मागेन, तेव्हां गुरु हो म्हणतील. मग तो त्यांचा सर्व परिवार मीच होईन. ॥407॥ गुरुंच्या उपयोगी पडणार्या जेवढ्या वस्तुमात्र आहेत, त्यापैकी प्रत्येक जेव्हां मी होईन, तेव्हा उपासनेचे कौतुक दृष्टीस पडेल. ॥408॥ श्रीगुरु हे अनेकांची आई आहेत; परंतु, ते माझी एकट्याचीच आई होऊन राहतील, असे करून (म्हणजे अनन्यभावाने त्यांची सेवा करून) त्यांच्या कृपेकडून शपथ वाहवीन ॥409॥ श्रीगुरूंच्या त्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एकपत्नीव्रतच घेववीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्रसंन्यास करवीन, (म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कोठे जाणार नाही असे करीन), ॥410॥ वारा किती जरी धावला तरी तो चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही, त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईन. ॥411॥ गुरुसेवा जी (माझी) मालकीण, तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन, हे असो! गुरुभक्तीला मीच गवसणी होईन. ॥412॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाभीं आपणचि जन्मे ऐसें गुरुमूर्तिप्रेमें


