सकाळी साडेसहाची वेळ. शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले –
“जाता पंढरीसी सुख वाटे जीवा…”
कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या सकाळी कधी आवाज ऐकू आला नसल्याने तिकडे लक्ष गेले. हळूहळू आवाज बंद झाला.
दुसरी दिवशी पण,
“सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले…” ऐकू आले.
तिसऱ्या दिवशी फिरायला निघाले तेव्हा आवाज कुठून येतो ते समजले…
एक पन्नास-पंचावन्न वर्षांच्या बाई रस्ता झाडत होत्या. त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती. आपल्याच तंद्रीत त्या गाणी ऐकत काम करत होत्या. त्यांना विचारलं,
“ताई तुम्ही नवीन आलात का?”
“हो बदलीवर आले आहे, आठ दिवसांच्या… माझी मैत्रीण इथं काम करायची, तिला बरं नाही म्हणून मी येत आहे…”
“असं का? तरीच आधी कधी तुम्हाला पाहिलं नव्हतं.”
हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्वज्ञान शिकवते!
“नीट झाडलं जातंय ना?”
“हो हो, त्याचं काही नाही… देवाची गाणी ऐकू आली म्हणून विचारलं.”
“अहो, मुलीने मोबाइलमध्ये गाणी भरून दिली आहेत. ती कशी लावायची ते शिकवलं आहे. विठुरायाची गाणी ऐकत काम कधी होतंय समजतच नाही बघा! …आणि शीण पण वाटत नाही…”
“भजनाला जाता का?”
“कुठलं हो… मला खूप आवड आहे, पण वेळ भेटत नाही बघा… माझी आई गाणी म्हणायची. आता आमच्या घराजवळ विठ्ठलाचे देऊळ आहे तिथे ही गाणी लावतात.”
“हो का? तुमच्या लेकीला गाण्याचे हे चांगलं सुचलं…”
त्या हसल्या आणि कामाला लागल्या.
मला जनाबाईचा अभंग आठवला,
“झाड लोट करी जनी
केरभरी चक्रपाणी
पाटी घेऊनीया शिरी
नेऊन टाकी दूरी
ऐसा भक्तिसी भूलला
नीच कामे करू लागला
जनी म्हणे विठोबाला
काय उतराई होऊ तुला…”
विठूराया तू जनीला मदत करत होतास हे तिच्या अभंगातून आम्हाला माहीत आहे. पण खरं सांगू? इतकी वर्षं लोटली तरी आजही तू भक्तांच्या तनामनात आहेसच…
नाम रूपाने…
हेही वाचा – पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!
अनेक संतांनी तुझे गुणगान करणारे अभंग रचलेले आहेत. तेच अभंग आजही मनाला उभारी देत आहेत. संकटात साथ देत आहेत. काम करताना भक्तांना कष्ट जाणवत नाहीत…
तुझ्यावर अलोट प्रेम करणारी जनी आज मला दिसली रे… या ताईंमध्ये…
खरंच, विठुराया जनीची कामे निश्चितच करत असेल!
असं होतचं असेल… फक्त श्रद्धा आणि दृढ विश्वास हवा… जनी इतका…! मग तो येतोच मदतीला सगळं सोपं करतो. नीट लक्ष दिल्यावर ध्यानात येत की, प्रत्यक्ष जगतानाही अशीच आपल्याला पण पांडुरंगाची साथ असते! त्याची रूप वेगवेगळी असतात अन् ती एकदा दिसायला लागली की, मग सगळीकडे तो दिसतो…
आता ठरवलं आहे, सवयच करून घ्यायची रोजच्या जगण्यात त्याला बघायची… मग तो विठूराया दिसेल… पंढरपूरला न जाता सुद्धा… आपल्या आसपास… आज कशी मला जनी भेटली तसाच…


