दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 15 जुलै 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 24 आषाढ शके 1948; तिथि : प्रतिपदा 11:51; नक्षत्र : पुष्य 21:46;
- योग : हर्षण 08:04, वज्र 28:29; करण : बालव 22:18;
- सूर्य : मिथुन; चंद्र : कर्क ; सूर्योदय : 06:08; सूर्यास्त : 19:19;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
आषाढ मासारंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर
टीम अवांतर
साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी मराठवाड्यातील नांदापूर (जि. हिंगोली) येथे झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव. प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथं त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. लहान वयातच त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला होता. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांचे गुरू भालचंद्र महाराज कहाळेकर यांचा त्यांच्या जडणघडणीत विशेष वाटा होता. ‘कशाचा विचार करावा, यापेक्षा कसा विचार करावा हे त्यांनी मला शिकवले,’ हे कुरुंदकर मोठ्या कृतज्ञतेने सांगत असत.
अनेकानेक कठीण विषयांचे सहज सोप्या शब्दांत विश्लेषण करणे, विषय कितीही गंभीर असला, तरी हास्यविनोदांची पेरणी, बुद्धिचातुर्य, उपरोध यांचा खूबीने वापर करत सभा नेहमी जागृत ठेवणे हे त्यांच्या वक्तृत्व शैलीचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. याच शैलीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषय-विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले.
हेही वाचा – कालातीत कलाकृती…
लेखन आणि वाचन हे आचार्य कुरुंदकरांचे आवडते छंद होते. मराठी साहित्य विश्वाला- विशेषत: समीक्षेला- त्यांनी आपल्या लिखाणातून एक नवीन दिशा दिली. मराठी कथा, कादंबरी, कविता, नाटक, वैचारिक साहित्य, ललित लेखन, दलित साहित्य अशा अनेक विषयांवर त्यांनी मांडलेले समीक्षात्मक विचार मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरले.
रूपवेध हा त्यांचा स्वतंत्ररित्या लिहिलेल्या मौलिक समीक्षापर लेखांचा संग्रह आहे. मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून शासनाने या संग्रहास गौरवले आहे. धार आणि काठ या ग्रंथात त्यांनी मराठी कादंबरीचा विकास आणि उत्कर्षाचा सर्वंकष आढावा घेतला असून, मराठी कादंबरीच्या अभ्यासासाठी तो एक परिपूर्ण ग्रंथ मानला जातो. पायवाट या पुस्तकामध्ये त्यांचे मराठी समीक्षा, कविता आणि नाटक या सर्व वाङ्मय प्रकारांवरील समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
आणीबाणीनंतरच्या महाराष्ट्रात ज्या साहित्यिक आणि विचारवंतांनी महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व केलं त्यामध्ये कुरुंदकरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी लिहिलेले उतारे, निबंध, लेख हे सोशल मीडियावर सातत्याने दिसत राहतात.
इतिहासाचे अभ्यासक म्हणून त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य ठरले. त्यांनी काळानुरूप बदलणार्या शब्दांच्या अर्थाशी निगडीत असलेल्या अर्थ आणि संकल्पना तसेच प्रक्रिया यांचा अभ्यास केला. ह्या प्रक्रियांच्या माहितीशिवाय हा सारा अभ्यास किती अपुरा आणि एकांगी आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून सांगितले. त्यांनी इतिहासाच्या अभ्यास पद्धतीला एक नवी दिशा दिली त्यांनी लिहिलेले इतिहासपर ग्रंथ हे पुढील अभ्यासकांसाठी मार्गदर्शनपर ठरत आहेत. त्यांच्या या ग्रंथात मुख्यत्वे करून मागोवा – प्राचीन ऐतिहासिक लेखांचा संग्रह: जागर– भारतीय इतिहास, राजकारण, अर्थकारण, धर्म यांवरील प्रगल्भ विचार ; शिवराय – छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनरहस्य उलगडून दाखवणारे पुस्तक – यांचा समावेश होतो. श्रीमानयोगी या शिवरायांवरील गाजलेल्या पुस्तकाची त्यांनी लिहिलेली प्रस्तावनाही विशेष उल्लेखनीय आहे. 10 फेब्रुवारी 1982 रोजी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात भाषणास सुरुवात करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे अकस्मात निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असलेल्या एका प्रकल्पात आज यश मिळण्याची चांगली चिन्हे दिसत आहेत. अपूर्ण राहिलेली कामेही पूर्ण होऊ शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी कठोर परिश्रम आणि एकाग्रता याला पर्याय नाही. व्यवसायात थोडे नुकसान होण्याची शक्यता आहे, परंतु काळजी करण्याची गरज नाही. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना पदोन्नतीसह चांगली संधी मिळू शकते.
वृषभ – जीवनशैलीत आणि सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा आजचा दिवस असेल. कामाच्या ठिकाणी एखादे काम पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागू शकते. तुमच्या चांगल्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला एखादा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. पोटाच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन – आर्थिक बाबतीत आज नशीब तुमच्या बाजूने असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, नवीन कल्पना तुमच्या कामाला नवी दिशा देतील. मात्र अनावश्यक वाद किंवा भांडणे टाळा. कौटुंबिक जीवन सुखकर राहील, जोडीदार प्रत्येक पावलावर तुम्हाला साथ देईल. किरकोळ कुरबुरी निर्माण होऊ शकतात. मात्र त्या देखील लवकरच संपतील.
कर्क – मनात थोडीशी चिंता निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी बदल करण्याविषयी विचार मनात येतील, पण सध्या मोठे निर्णय पुढे ढकलणेच उत्तम. वाढता खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे ठरेल. सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार टाळणे शहाणपणाचे ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अडचणी वाढू शकतात.
सिंह – यश मिळवण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष आणि एकाग्रतेने आज काम करावे लागेल. काही प्रभावशाली व्यक्तींना भेटल्याने भविष्यात नवीन संधींची दारे उघडू शकतात. बोलण्यात संयम ठेवा. सरकारी योजनेत गुंतवणूक करण्याचाही विचार करू शकता. कामाच्या ठिकाणी कोणाच्यातरी बोलण्याने तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पण त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल.
कन्या – खूप व्यग्रतेचा असा आजचा दिवस असणार आहे. अनेक जबाबदाऱ्यांमुळे तुमची धावपळ वाढू शकते. मात्र या सगळ्यात घाईघाईने निर्णय घेणे टाळा, कारण त्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घेणे उत्तम. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या जातकांनी ध्यानधारणा आणि श्वासाचे काही प्रकार अवश्य करावेत.
तुळ – तुमच्या विवेकबुद्धीमुळे विरोधकांचे प्रयत्न आज निष्फळ ठरू शकतात. उत्पन्न वाढविण्याच्या नवीन संधी निर्माण होतील. तर दुसरीकडे काही कामे शेवटच्या क्षणी अडकू शकतात, त्यामुळे कामाकडे पूर्ण एकाग्र होऊन लक्ष द्या. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होऊ शकते, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तुमची निर्णयक्षमता आज तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करेल.
वृश्चिक – आजचा दिवस प्रगती आणि नवीन यशाचा आहे. चांगल्या बातम्यांमुळे तुमचा उत्साह वाढेल. व्यावसायिक बाबींमधील तुमची सतर्कता लाभ मिळवून देईल. जुन्या समस्यांपासून सुटका होण्याची शक्यता आहे. संततीला पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात जावे लागेल. नवीन कपडे किंवा आवडते गॅझेट खरेदी करण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा – शेठजी अन् ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे
धनु – आज खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. बजेट सांभाळल्याने आर्थिक संतुलन राखले जाईल. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. पालकांशी एखाद्या कौटुंबिक विषयावर मोकळेपणाने चर्चा कराल. लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पालकांचा सल्ला घेणे उत्तम. प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते.
मकर – व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. दूरच्या नातेवाईकाकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. संततीच्या यशामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. कोणाशीही वैयक्तिक किंवा महत्त्वाची माहिती शेअर करणे टाळा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाशी संबंधित समस्या सुटू शकतात. कुटुंबासोबत एकत्र बसून जुने मतभेद मिटवण्याची संधी मिळेल.
कुंभ – प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु संयम आणि समजूतदारपणाने तुम्ही त्यावर मात कराल. वेळेचा योग्य वापर ही आज तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. प्रवास करताना मिळालेली महत्त्वाची माहिती भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
मीन – आज तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांची नीट ओळख करून घ्यावी लागेल. त्यामुळे छुप्या शत्रूंना ओळखणे सोपे जाईल. कोणाबद्दलही मत्सर किंवा द्वेष बाळगू नका, केवळ सकारात्मक विचारच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. स्वतःच्या छंदांवर आणि मनोरंजनावर पैसे खर्च कराल. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि त्यांच्यासोबत घालवलेला वेळ तुमचे नाते अधिक घट्ट करेल.


