बँकेतील जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाल्यानंतर दादासाहेब पुण्यातील प्रभात रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत वास्तव्यास आले. आज सकाळी त्यांचा धुळ्याचा मित्र त्यांना भेटायला आला. बरोबर आणलेला पेढ्यांचा बॉक्स त्याने दादासाहेबांसमोर धरला. त्या बॉक्सवरील ‘चत्रभुज नानजी’ हे नाव पाहताच दादासाहेब क्षणात भूतकाळात शिरले.
एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. मोठ्या कष्टाने जमवलेले पंचवीस रुपये वडिलांनी राजला परीक्षेची फी भरण्यासाठी दिले होते. काय ते दुर्दैव! राजच्या आईला चक्कर आली. त्यानंतर डॉक्टरांची फी, इंजेक्शन आणि औषधे यावर ते पंचवीस रुपये केव्हाच खर्च झाले.
राजने दोघा-तिघा नातेवाईकांकडे पैसे उसने मागितले; परंतु कोणीही पैसे दिले नाहीत. म्हणतात ना, “बोलतात सर्व, पण गरजेच्या वेळी कोणीही पुढे येत नाही.” पूर्णतः रिकामा खिसा. राज मोठ्या खिन्न मनाने शाळेत जायला निघाला.
दगडी शाळेजवळील स्वस्तिक टॉकीजसमोर भर रस्त्यात एक टेम्पो थांबला होता. तिथे एका बंगल्याचे बांधकाम सुरू होते. “सिमेंटच्या गोण्या उतरवायला एकही मजूर मिळत नाही,” टेम्पो ड्रायव्हर अग्रवाल शेठजींना सांगत होता.
“शेठजी, मला पंचवीस रुपये द्या. मी सिमेंटच्या गोण्या उतरवून देतो,” राज म्हणाला. मध्यम उंची, अशक्त प्रकृती; पण तरीही अवजड काम करण्याची तयारी!
“तू हे काम करू शकशील?” विस्मयाने शेठजींनी विचारले.
“हो, नक्की करेन,” म्हणत राजने कामाला सुरुवातसुद्धा केली आणि अवघ्या अर्ध्या तासांत टेम्पो रिकामा केला.
घामाघूम झालेल्या राजला शेठजींनी प्यायला पाणी दिले आणि सांगितले, “हे 30 रुपये घे आणि 5 रुपये मला परत आणून दे.”
राजने समोरील दोन-तीन दुकानांत विचारले; परंतु सुटे मिळाले नाहीत. ऑफिस बंद व्हायला फक्त अर्धा तास बाकी होता, म्हणून राज घाईघाईत शाळेत गेला आणि परीक्षेची फी म्हणून 25 रुपये भरले.
हेही वाचा – हा खेळ कागदांचा…
राज बराच वेळ परतलाच नाही. शेठजींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
“मुलगा तसा गरीब आणि प्रामाणिक वाटला, म्हणूनच मी त्याच्यावर विश्वास ठेवला; परंतु तो पाच रुपये घेऊन गायब झाला. हल्ली कोणावरही विश्वास ठेवू नये,” शेठजी स्वतःशीच पुटपुटले.
पुढच्या दहा मिनिटांत राज पळत-पळत आला. त्याला धाप लागली होती.
“माफ करा, शेठजी. थोडा उशीर झाला,” म्हणत त्याने पाच रुपये शेठजींना सुपूर्द केले. शेठजी मनोमन ओशाळले.
“शेठजी, तुम्ही मला मदत केली म्हणूनच मला परीक्षेची फी भरता आली,” असे म्हणत अतिशय कृतज्ञतेने राजने शेठजींना वाकून नमस्कार केला.
एस.एस.सी. परीक्षेचा निकाल लागला. राजला 72% गुण मिळाले. 20 पैसे घेऊन राज पेढे आणण्यासाठी दुकानात गेला.
“काका, मला पेढे द्या,” म्हणत राजने 20 पैसे दुकानदाराला दिले.
“काय रे, काठावर पास झाला का?” दुकानदाराने 20 पैशांच्या नाण्याकडे पाहात तुच्छतेने विचारले.
“नाही काका, मला 72% गुण मिळाले.”
“20 पैशांत फक्त एकच पेढा मिळेल,” दुकानदार काका हसत म्हणाले.
“काका, प्लीज, मला दोन पेढे द्या ना. एक देवापुढे ठेवायचा आणि दुसरा देवासमान असलेल्या अग्रवाल शेठजींना द्यायचाय.”
“भाऊ, या मुलाला एक किलो पेढे द्या,” मागून कणखर आवाज आला.
“शेठजी, परंतु त्याच्याकडे फक्त 20 पैसे आहेत.”
“एक किलो पेढ्याचे पैसे मी देईन!”
राजने मागे वळून पाहिले. तिथे उभे होते साक्षात त्याचे दैवत—अग्रवाल शेठजी!
हेही वाचा – ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य
भरभरून आशीर्वाद देत, ‘चत्रभुज नानजी’कडचे एक किलो पेढे राजच्या हातात ठेवत शेठजी म्हणाले, “मनापासून अभिनंदन! यशस्वी भव!”
राजने पुढे खूप कष्ट केले. प्रतिकूल परिस्थितीत पुढचे शिक्षण घेतले. बँकेत नोकरी मिळवली आणि एका मागोमाग एक प्रमोशन घेत जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाला. प्रत्येक प्रमोशननंतर तो आवर्जून अग्रवाल शेठजींना भेटत असे आणि कृतज्ञता व्यक्त करत असे.
‘अग्रवाल शेठजी’ आणि ‘चत्रभुज नानजी’ ही दोन नावे राजच्या स्मृतिपटलावर कायमची कोरली गेली.
“राज, अरे कुठे हरवलास? घे ना हा बॉक्स. ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे आहेत,” मित्राच्या आवाजाने दादासाहेब भानावर आले.


