अध्याय तेरावा
हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणें भावें । तैसें जिणें होआवें । ऐसी आशा ॥195॥ पै चालतु कां नोहे । कीं वारेनि जातु आहे । जना ऐसा भ्रमु जाये । तैसें होईजे ॥196॥ माझें असतेपण लोपो । नांवरूप हारपो । मज झणें वासिपो । भूतजात ॥197॥ ऐसीं जयाचीं नवसियें । जो नित्य एकांता जातु जाये । नावेंचि जो जिये । विजनाचेनि ॥198॥ वायू आणि तया पडे । गगनेंसीं बोलों आवडे । जीवें प्राणें झाडें । पढियंतीं जया ॥199॥ किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी । जाण तया ज्ञानेंसीं । शेज जाहली ॥200॥ पैं अमानित्व पुरुषीं । तें जाणावें इहीं मिषीं । आतां अदंभाचिया वोळखीसी । सौरसु देवों ॥201॥ तरि अदंभित्व ऐसें । लोभियाचें मन जैसें । जीवु जावो परी नुमसे । ठेविला ठावो ॥202॥ तयापरी किरीटी । पडिलाही प्राणसंकटीं । तरी सुकृत न प्रकटी । आंगें बोलें ॥203॥ खडाणे आला पान्हा । पळवी जेवीं अर्जुना । कां राहे पण्यांगना । वडिलपणें ॥204॥ आढ्यु आतुडे आडवीं । मग आढ्यता हारवी । नातरी कुळवधू लपवी । अवेवांतें ॥205॥ नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें । तैसें झांकी निपजलें । दानपुण्य ॥206॥ वरिवरी देह न पूजी । लोकांतें न रंजी । स्वधर्मु वाग्ध्वजीं । बांधों नेणे ॥207॥ परोपकारु न बोले । न मिरवी अभ्यासिलें । न शके विकूं जोडलें । स्फीतीसाठीं ॥208॥ अंगभोगांकडे । पाहतां कृपणु आवडे । एऱ्हवीं धर्माविषयीं थोडें । बहु न म्हणे ॥209॥ घरीं दिसे सांकड । देहींची आयती रोड । परी दानीं जया होड । सुरतरूसीं ॥210॥ किंबहुना स्वधर्मीं थोरु । अवसरीं उदारु । आत्मचर्चे चतुरु । एऱ्हवी वेडा ॥211॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे
अर्थ
ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही, अशी लोक आपल्याविषयी शंका धरतील, अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते. ॥195॥ पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही, किंवा वार्यानेच जात आहे अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे (असे त्यास वाटते.) ॥196॥ मी एक अमका आहे, अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये, माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्य़ासमोर येऊ नये, कदाचित मला पाहून प्राणिमात्र भितील, तर तसे होऊ नये ॥197॥ याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोदित एकांतामधे जात असतो व ज्याला एकांत जीवाइतका आवडतो. ॥198॥ वायूचे व त्याचे पटते, आकाशाशी बोलणे त्याला आवडते. (त्यास बोलण्याचा कंटाळा असतो); व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात. ॥199॥ फार काय सांगावे! अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील, त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरुण झाले आहे, असे तू समज. ॥200॥ साधकामधे असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणांनी जाणावा. आता अदंभाच्या ओळखीकरता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो. ॥201॥ तर ऐक. अदंभित्व असे आहे; ज्याप्रमाणे लोभ्यांचे मन (आपल्या धनाविषयी इतके आसक्त) असते की, जीव गेला तरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही. ॥202॥ अर्जुना, त्याप्रमाणे त्याच्या प्राणांवर जरी संकट आले, तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करत नाही. ॥203॥ खोड्याळ गाईला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते, अथवा उतार वयाला आलेली वेश्या उतार वयासारखी राहते काय? (तर नाही. मग ती आपले उतार वय झाकते). ॥204॥ श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो (जसा) आपली श्रीमंती लपवितो अथवा कुलीन स्त्री (जशी) आपले अवयव झांकते, ॥205॥ अथवा शेतकरी पेरलेले बीज (जसे माती टाकून) झाकतो त्यांप्रमाणे तो आपल्या हातून झालेले दान आणि पुण्य झांकतो ॥206॥ देहाची वरवर पूजा करत नाही, (लोकांना फसविणारा बाह्य वेष धारण करून देहाला सजवीत नाही), व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते. (आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही). ॥207॥ आपण दुसर्यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करत नाही, आपण जो काही (वेदशास्त्र वगैरेचा) अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवीत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळविलेले पुण्य विकण्यास धजत नाही, ॥208॥ तो आपल्या शरीराला जे (विषय) भोग देतो त्यावरून (त्याच्या उदारपणाचा) अंदाज केला तर, तो कृपण आहे असे वाटेल; एऱ्हवी धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर, तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास थोडेफार असे म्हणत नाही. ॥209॥ घरामधे सर्व गोष्टींची टंचाई दिसते, शरीराचा बांधा रोडका असतो; परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरूशी प्रतिज्ञेने चढाओढ करतो. ॥210॥ फार काय सांगावे! स्वधर्मामध्ये तो थोर असतो, योग्य प्रसंगी तो उदार असतो, आत्मचर्चा करण्यात तो हुशार असतो. एऱ्हवी (इतर गोष्टीत) तो वेडा असतो. ॥211॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां


