अध्याय तेरावा
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥7॥
तरी कवणेही विषयींचें । साम्य होणें न रुचे । संभावितपणाचें । वोझे जया ॥184॥ आथिलेचि गुण वानितां । मान्यपणें मानितां । योग्यतेचें येतां । रूप आंगा ॥185॥ तैं गजबजों लागे कैसा । व्याधें रुंधला मृगु जैसा । कां बाहीं तरतां वळसा । दाटला जेवीं ॥186॥ पार्था तेणें पाडें । सन्मानें जो सांकडे । गरिमेतें आंगाकडे । येवोंचि नेदी ॥187॥ पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी । हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोकां ॥188॥ तेथ सत्काराची गोठी । कें आदरा देईल भेटी । मरणेंसीं साटी । नमस्कारितां ॥189॥ वाचस्पतीचेनि पाडें । सर्वज्ञता तरी जोडे । परी वेडिवेमाजीं दडे । महमेभेणें ॥190॥ चातुर्य लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी । आवडोनि ॥191॥ लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु । उगेपणीं चांगु । आथी भरु ॥192॥ जगें अवज्ञाचि करावी । संबंधीं सोयचि न धरावी । ऐसी ऐसी जीवीं । चाड बहु ॥193॥ तळौटेपण बाणे । आंगीं हिणावो खेवणें । तें तेंचि करणें । बहुतकरुनी ॥194॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी
अर्थ
अमानित्व, दंभरहितता, अहिंसा, सर्वसहनशीलता, सरळपणा, सद्गुरुसेवा, (आंतर व बाह्य) शुद्धि, स्थैर्य, अंत:करणनिग्रह – ॥7॥
तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी न करणे ज्याला आवडत नाही व मोठेपणाचे ज्याला ओझे वाटते ॥184॥ त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर, अथवा लोकांनी मागण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रकटता झाली तर, ॥185॥ त्या वेळी तो कसा गडबडून जातो, तर ज्याप्रमाणे पारध्याने चोहोंकडून वेढलेले हरिण घाबरे होते अथवा हातांनी पोहून जात असता, तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवर्यात सापडावा ॥186॥ अर्जुना, त्याप्रमाणे सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही ॥187॥ आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ति आपण कानांनी ऐकू नये, हा एक अमूक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये ॥188॥ (असे ज्याला वाटते) अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल? असा मनुष्य आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करेल? त्याला जर कोणी नमस्कार केला, तर त्याला ते मरणासारखे वाटते ॥189॥ बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते, परंतु महत्त्वाच्या भीतीने तो वेडांत लपतो ॥190॥ आपल्या ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो, आपल्यांत असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो व मोठ्या आवडीने लोकांत वेडेपण दाखवितो ॥191॥ लोकांत होणार्या प्रसिद्धीची ज्यास शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो; काही न करता उगाच राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो ॥192॥ लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये (आपल्या नादी लागू नये) अशा प्रकारची ज्याच्या जीवामधे फार इच्छा असते ॥193॥ ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वत:च्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल, त्याच गोष्टी तो बहुतेक करतो. ॥194॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे


