दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 04 जुलै 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 13 आषाढ शके 1948; तिथि : चतुर्थी 12:39; नक्षत्र : धनिष्ठा 13:43;
- योग : प्रीति 17:00; करण : कौलव 25:08;
- सूर्य : मिथुन; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:20;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
विनोदी साहित्यिक वि. आ. बुवा
टीम अवांतर
मराठी भाषेत विनोदी शैलीत तब्बल 150हून अधिक पुस्तके लिहिणारे साहित्यिक विनायक आदिनाथ अर्थात वि. आ. बुवा यांचा जन्म 4 जुलै 1926 रोजी पंढरपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्यांनी पंढरपूर आणि मिरज येथे झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे शिक्षण अर्धवट राहिले. नोकरीसाठी ते कल्याण येथे स्थायिक झाले.
हस्ताक्षर अत्यंत सुंदर असल्याने बुवा यांनी 1950 साली इंदुकला नावाचा एक हस्तलिखित साहित्यिक अंक प्रकाशित केला. हे हस्तलिखित दर्जेदार स्वरूपात असल्याने मराठी साहित्यिकांचा चांगला पाठिंबा यास मिळाला. अनंत काणेकर, महादेवशास्त्री जोशी, चिं. वि. जोशी, दुर्गा भागवत, माधव मनोहर, गो. नी. दांडेकर, शांता शेळके, वसंत बापट, विजय तेंडुलकर, द. मा. मिरासदार असे अनेक ख्यातनाम साहित्यिक या अंकासाठी लिखाण करत असत.
हेही वाचा – दुधावरची साय…
पुढे नवशक्ती या वृत्तपत्राचे संपादक प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना वृत्तपत्रातून लिखाणासाठी उद्युक्त केले आणि त्यांनी वृत्तपत्रातून विनोदी लेखनास प्रारंभ केला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि उत्स्फूर्त विनोद ही वि. आ. बुवा यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यानंतर हंस, मोहिनी, नवयुग, आवाज यांसारखे नावाजलेले दिवाळी अंक आणि कितीतरी मासिके तसेच साप्ताहिक अंकांमधून बुवा लेखन करू लागले. त्यांचा पहिला कथासंग्रह अकलेचे तारे 1953मध्ये प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ आणि नाट्य पुरस्कार समित्यांवर अनेक वर्षे त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
आकाशवाणीवर त्यांचे 600हून अधिक कार्यक्रम प्रसारित झाले. त्या काळच्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या “पुन्हा प्रपंच” या लोकप्रिय मालिकेच्या 400 हून अधिक भागांचे लेखन त्यांनी केले. याशिवाय, बुवा यांवे वक्तृत्व उत्तम असल्याने व्याख्याने आणि कथा-कथनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही त्यांनी दौरे केले होते. संस्कृत भाषेचा त्यांचा चांगला अभ्यास होता. तसेच, त्यांच्या लेखणीने विनोदी लेख, कथा, निबंध, विडंबने, एकांकिका, आकाशवाणीवरील श्रुतिका, पटकथा, तमाशाच्या संहिता अशा अनेक प्रकारांना स्पर्श केला. त्यांच्या साहित्याची संख्या मोठी आहे; पण संख्या हा त्यांच्या योगदानाचा एकमेव मापदंड नाही. त्यांनी सातत्याने विनोद लिहिला आणि विनोदाला केवळ हलकाफुलका करमणुकीचा प्रकार न मानता तो एक साहित्यप्रकार म्हणून समृद्ध केला.
त्यांच्या विनोदाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सहजता. त्यांच्याकडे उपहास होता, उपरोध होता, पण त्यात कडवटपणा द्वेषपूर्णता नव्हती. त्यांची शाब्दिक कोटी, प्रसंगातील चमत्कृती, मानवी स्वभावातील विसंगती ओळखण्याची ताकद आणि ती वाचकांसमोर मोकळेपणाने मांडण्याची शैली विलक्षण होती. त्यांचा विनोद वाचताना वाचकाला “हे तर आपल्याच घरात घडते”, “हे तर आपल्या ओळखीच्या माणसासारखे आहे” असे वाटायला लावणे हीच त्यांच्या लेखनाची खरी ताकद होती.
1972 साली कल्याण येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. 1983मध्ये ‘प्रेमाची एस्सो स्टाइल’ या पुस्तकाला, तर 1997मध्ये प्रकाशित झालेल्या ‘शंभरावे पुस्तक’ याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट विनोदी साहित्यासाठीचा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट विनोदी लेखक म्हणून 1997 साली मुंबई मराठी साहित्य संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाला. साहित्य परिषद कल्याण शाखा, कल्याण नगरपरिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे अशा संस्थांकडून त्यांचा प्रदीर्घ आणि गुणवत्तापूर्वक लेखनाबद्दल गौरव झाला होता. 17 एप्रिल 2011 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगती आणि यशाच्या नवीन संधी घेऊन येत आहे. तुमच्या मेहनतीचे फळ अखेर मिळणार असून रखडलेल्या कामांना गती मिळेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि कागदपत्रांची कसून तपासणी करा. स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, त्यामुळे निष्काळजीपणा टाळा.
वृषभ – आज प्रत्येक काम विचारपूर्वक कराल, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिक दौऱ्याची शक्यता आहे आणि तो भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल. ते पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. दिवसभर तुमच्यामध्ये ऊर्जा आणि सकारात्मकता टिकून राहील.
मिथुन – कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आज टाळा. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला गांभीर्याने घ्या. आज मिळणारे शहाणपण भविष्यात नवीन संधींची दारे उघडू शकते.
कर्क – आज जुन्या चिंता दूर होतील. संतती सोबत दिवस घालवाल. जोडीदाराला करिअरमध्ये मोठे यश किंवा बढती मिळू शकते, ज्यामुळे संपूर्ण घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते, पण धीर धरा, कारण यश तुमचेच आहे.
सिंह – आज धैर्य आणि आत्मविश्वास दिसून येईल. लोक तुमची क्षमता ओळखतील. कामे पूर्ण करण्यासाठी सौम्य दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असेल. अनोळखी लोकांवर अति विश्वास ठेवणे टाळा. काही कौटुंबिक बाबी चिंता निर्माण करतील, पण तुमच्या समजूतदारपणामुळे त्यातूनही मार्ग काढता येईल.
कन्या – आज प्रयत्नांना नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, पण परिस्थिती लवकरच पूर्ववत येईल. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक बातमी मिळू शकते. जुने कौटुंबिक वाद मिटतील, नातेसंबंध अधिक गोड होतील. नवीन वाहन खरेदी करण्यासंदर्भातील चर्चा पुढे सरकेल.
तुळ – आज एखादे सरकारी प्रकरण किंवा आर्थिक वादामुळे काहीसा तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. संततीच्या भविष्याबद्दल आणि शिक्षणाबद्दल एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. स्वतःसाठीही काहीतरी नवीन खरेदी करण्याची आज इच्छा होऊ शकते. घरी एखाद्या प्रिय पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचे वातावरण असेल.
वृश्चिक – आजचा दिवस आनंदाच्या बातम्या घेऊन येणारा असेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. व्यावसायिक भागीदारीतून नफा मिळू शकतो, नवीन योजना व्यवसायाला नवी दिशा देऊ शकतात. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचारही मनात येऊ शकतो. एकूणच, आजचा दिवस यश आणि समाधानाने भरलेला असेल.
हेही वाचा – सगुण साकार उपासना
धनु – आर्थिक बाबींबाबत सकारात्मक चिन्हे दिसू लागतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायात प्रगतीच्या संधीही दिसत आहेत. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले सरकारी काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. संततीच्या उज्ज्वल भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. कामानिमित्त प्रवास घडून येईल.
मकर – आजचा दिवस अनेक सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. एखाद्या लहानशा गोष्टीवरून जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, परंतु समजूतदारपणाने परिस्थिती हाताळा. एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल थोडी काळजी करावी लागू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे.
कुंभ – गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आज आत्मिक समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. संयम राखणे तुमच्या हिताचे ठरेल. घरातील पाहुण्यांच्या वर्दळीमुळे आनंदाचे वातावरण असेल. आई तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकते आणि तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडाल..
मीन – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज भासू शकते, त्यामुळे विश्रांतीकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे विशेष लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी पूर्वी झालेली एखादी चूक समोर आल्यास, ती नम्रतेने आणि समजूतदारपणे हाताळा.


