दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 01 जुलै 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 10 आषाढ 1948; तिथि : प्रतिपदा 07:37; नक्षत्र : पूर्वाषाढा 06:50;
- योग : ऐंद्र 16:03; करण : तैतिल 20:39;
- सूर्य : मिथुन; चंद्र : धनु 13:31; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:19;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया
टीम अवांतर
बासरीसारख्या लोकवाद्याला शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते त्या पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म 1 जुलै 1938 साली अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या कुटुंबात संगीताचा वारसा नव्हता. त्यांचे वडील पैलवान होते आणि आपल्या मुलाने देखील पैलवान बनावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे हरिप्रसाद चौरसिया हे लहान असताना पहाटे लवकर उठून वडिलांच्या तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेत असत. मात्र, हे करत असतानाच त्यांचे मन संगीतात अधिक रमत होते. त्यांना बासरीने भुरळ घातली होती.
कुस्तीत मन न रमल्याने त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी शेजाऱ्यांकडून गुप्तपणे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाराणसीचे प्रख्यात बासरीवादक पंडित भोलानाथ प्रसन्न यांचे बासरीवादन ऐकून ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी तब्बल 8 वर्षे त्यांच्याकडे बासरीवादनाचे कठोर शिक्षण घेतले. बासरीवादनाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1957 साली ओडिशामधील कटक येथील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये नोकरी स्वीकारली. तिथे ते वादक-कलाकार आणि संगीतकार म्हणून काम करू लागले.
हेही वाचा – बाई जात, भारी देवा
पुढे अन्नपूर्णा देवी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यानंतर अनेक शास्त्रीय संगीत महोत्सव हरिप्रसादजी यांनी गाजवले. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे चित्रपटासाठी दिलेल्या संगीतामुळे आणि त्यासाठी केलेल्या बासरीवादनामुळे. हरिप्रसादजी यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासमवेत ‘शिव-हरी’ नावाचा एक संगीत गट तयार केला होता. या जोडीने सिलसिला, फासले, चांदनी, साहिबान, विजय, चार दिन की चांदनी यासारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी संगीत दिले आणि अत्यंत लोकप्रिय गाणी तयार केली.
पंडित चौरसिया यांनी ओडिशाचे संगीतकार भुवनेश्वर मिश्रा यांच्यासोबतही संगीतकार म्हणून काम केले. त्यांनी भुवन-हरी (शिव-हरि यांच्या अनुषंगाने) जोडी तयार केली आणि या जोडीने बरीच ओडिया चित्रपटांसाठी संगीत दिले. असंख्य गाणी संगीतबद्ध केली. जी राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली.
जॉन मॅक्लॉफलिन, जॅन गरबारेक आणि केन लॉबर यांसारख्या पाश्चात्य संगीतकारांच्या सहकार्यानेही त्यांनी संगीत दिले. जॉर्ज हॅरिसनने लिहिलेल्या ‘द इनर लाइट’ या अल्बमसाठीही त्यांनी वादन केले. याशिवाय प्रसिद्ध सतारवादक रवी शंकर यांच्यासोबतही अनेक मैफिली आणि अल्बमसाठी त्यांनी बासरी वादन केले. त्यांनी नेदरलँड्समधील ‘रॉटरडॅम म्युझिक कन्झर्व्हेटरी’ येथे जागतिक संगीत विभागाचे कलात्मक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
भारतातील बासरीवादनाची गुरू-शिष्य परंपरा टिकवून ठेण्यासाठी त्यांनी 2002 मध्ये मुंबईत आणि 2010 मध्ये भुवनेश्वरमध्ये ‘वृंदावन गुरुकुल’ नावाच्या संस्थेची स्थापना केली. हरिप्रसादजींना आजवर अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत. त्यामधील ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ तसेच उत्तर ओडिशा आणि उटकल विद्यापीठाकडून ‘डॉक्टरेट’ पदवी मिळाली आहे. फ्रेंच सरकारकडून ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स ॲण्ड लेटर्स’ हा सन्मान आणि ब्रिटिश राजघराण्याकडूनही गौरव प्राप्त झाला आहे. याशिवाय 2019 मध्ये ‘ब्रेथ ऑफ गॉल्ड’ या नावाने त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे.
आजचे राशीभविष्य
मेष – रागावर नियंत्रण ठेवा, कारण अगदी लहानसहान गोष्टींवरचा रागसुद्धा कौटुंबिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो. कुटुंबावर अति नियंत्रण ठेवणे टाळा. नवीन विचार आणि बदलत्या काळाचा स्वीकार करा. एखादी नको असलेली घटना तुमच्या मानसिकतेवर परिणाम करू शकते, म्हणून प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या.
वृषभ – कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला कठीण परिस्थितीवर मात करण्यास मदत करेल. भावंडांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्या मनमोकळ्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा, आरोग्यपूर्ण दिनचर्या पाळा.
मिथुन – कुटुंबात आणि नात्यांमध्ये सलोखा टिकवण्यासाठी काही बाबतीत तडजोड करावी लागू शकते. एकाच वेळी अनेक कामे सुरू करण्याऐवजी, ती एक-एक करून पूर्ण करा. जोडीदाराचा राग दूर करण्याचा प्रयत्न करा. विवाहितांनी अनावश्यक वाद टाळावेत. संयमाने राहून तणाव टाळण्याचा प्रयत्न करावा.
कर्क – स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मात्र, त्यासाठी जाणकारांचा सल्ला घेणे इष्ट ठरेल. वाढत्या कामाच्या दबावामुळे चिडचिड होऊ शकते, परंतु याचा परिणाम कुटुंबावर किंवा मुलांवर होऊ देऊ नका. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखल्यास यश मिळेल.
सिंह – यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू शकतात. दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वत:च पुढाकार घेऊन जबाबदारी पार पाडावी लागेल. सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. संयमाने कठीण परिस्थिती सहज हाताळू शकाल. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे कुटुंबासाठी वेळ काढणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या – मनोरंजनासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. शेअर बाजारातून किंवा गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु बिघडलेल्या वैवाहिक संबंधांमध्ये सबुरीची भूमिका घेणे गरजेचे आहे. भागीदारासोबतच्या संभाषणात संयम बाळगा. नवीन गोष्टी शिकण्याची संधीसुद्धा मिळेल.
तुळ – बुद्धिमत्ता आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे कठीण परिस्थितीही सोपी बनेल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील, याचा भविष्यात फायदा होईल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला सकारात्मक फळ मिळण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ खूश होतील.
वृश्चिक – एखाद्या नातेवाईकासाठी अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. भावनिक दृष्टिकोनाऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकते. कठीण काळात जोडीदाराचा पाठिंबा तुमच्यासाठी शक्तीचा स्रोत ठरेल आणि तुम्ही नवीन प्रकल्पांवर काम सुरू कराल.
हेही वाचा – आजच्या भाजीचा बेत…
धनु – दिवसाची सुरुवात थोडी तणावपूर्ण असू शकते, मात्र मुलांसोबत आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने तुम्ही बऱ्यापैकी रिलॅक्स व्हाल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल. विवाहितांच्या नात्यात जिव्हाळा आणि विश्वास परत येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी अनावश्यक वादात अडकू नका. कामावर लक्ष केंद्रीत ठेवा.
मकर – कुटुंबाकडून एखादा सुखद धक्का मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांचे नवीन सौदे करार होतील. मात्र, या व्यवहारात सावध रहा. भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल. अविवाहित जातकांना आपल्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवता येईल.
कुंभ – दीर्घकालीन आरोग्य समस्येपासून आराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. कुटुंबासोबत वेळ घालवा, ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे त्यांना जाणवून द्या. आजच्या दिवसात खरेदी आणि घरगुती कामे करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
मीन – आपली ऊर्जा योग्य दिशेला लावा. इतरांच्या अनावश्यक बाबींमध्ये ढवळाढवळ करणे टाळा. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा आणि भविष्यासाठी एखादी योग्य योजना आखा. व्यग्र वेळापत्रकामुळे जोडीदाराची चिडचिड होऊ शकते. मात्र तक्रार करण्याऐवजी जोडीदाराला समजून घेणे गरजेचे असेल.


