रोजची भाजी ‘अहो’च आणतात. नेहमीप्रमाणे बाहेर जाताना विचारलंच, “भाजी कोणती आणू?” (अत्यंत आज्ञाधारक आहेत बरं का!)
“कोणती आणाल बरं? आणा झालं नेहमीचीच!”
“पालेभाजी आणू एखादी?”
“मुळ्ळीच नक्को हं! कंटाळा आलाय अगदी पालेभाजीचा!” जरा उसळूनच.
“बरं बरं! मग… हं… फ्लावर आणतो!”
“परवाच तर झालाय फ्लावर!”
“मग, काय आणू?”
“तुम्हाला स्वत:ला काही सुचतच नाही काय हो?”
“वांगी आणू का? भरली वांगी कर मस्तपैकी!”
मग तिच्या आठ्याळ चेहऱ्याकडे बघून, एकदम गडबडून, “म्हणजे… करूया… करूया! आपण भरली वांगी करूयात!” (हुश्श!)
“मला आता अगदी मसाला वाटायचा कंटाळा आलाय! त्यापेक्षा ती आणा ना!”
“कोणती?”
“ती हो… आपण नेहमी आणतो ती!”
हेही वाचा – …असाही विचार करता येतो!
त्याची मुद्रा प्रश्नांकित!
“शिमला मिरची?”
“नाही हो, ती हिरवी… पोपटी… पांढरटशी असते!”
“अगं मग कोबी म्हण ना, हात्तिच्चा! आणतो!” चेहऱ्यावर ‘सुटलो बुवा एकदाचा’, हे भाव!
“कोबी नाही हो!” अंगठा आणि तर्जनी जुळवून ती चिमटी हळूहळू मोठी करत, “साधारण या आकाराची असते. लहान मोठी… बोटभर… कधी त्याहून छोटी!”
“हां हां! शिराळी!!”
आता तिचा संयम संपलेला!
“शिराळी काय शिराळी!! शिराळी काय बोटभर असते? ती तर हातभर असते.”
“अगं मग काssssय? नीट सांगना!”
“थांबा चित्र काढून दाखवते.” समोरचा कागद ओढून तिची चित्रकला!
“समजलं? ही भाजी!”
तो साशंक होऊन… “बीन्स?”
आपली चित्रकला निरखून पहात ती, “बीन्स नाही हो! ती नाही का, आपण कधी कधी तिचा भात करतो!”
“आपण भाजीचा भात करतो?”
“तसा भात नाही हो, वन डिश मिल करतो तेव्हा खिचडीत घालतो ती!”
“गाजर?”
“गाजर काय गाजर… फक्त गाजराची आपण भाजी करतो का? …. अगदी जिभेवर आहे बघा!”
“काय भाजी?”
“तुम्ही तर बाई, भारीच विसराळू! इतकं पण कसं तुम्हाला आठवत नाही!! ती नाही का आम्ही मध्यंतरी कोशिंबीर करायची म्हणत होतो!”
“तुम्ही म्हणजे कोण? मैत्रिणी? कसली कोशिंबीर करत होता? आणि ते मला कसं कळणार?”
“मैत्रिणी म्हणजे फेसबुक मैत्रिणी हो! कोशिंबीर की भरीत म्हणत होतो नाही का?”
“तू फेसबुकवर काय गोंधळ घालत असतेस, तो मला कसा कळणार? मी आहे का फेसबुकवर!”
तो उच्च कोटीचा वैतागून!
ती अत्यानंदाने किंचाळून… “अहो, तोंडली तोंडली… तोंडली आणा!”
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
तो कपाळाला हात लावून निघाला. कालच तिचा वाढदिवस झालेला असल्याने आज वसवसायचं नाही, एवढं सामान्यज्ञान परमेश्वराने त्याला दिलंय!
तो दारापर्यंत पोचतोय तोपर्यंत तिची ट्यूब पेटली, “अहो अहो, ऐका! काल अचानक आपण बाहेरच गेलो जेवायला. कालची भाजी उरलीय ती संपवूया आज. उगाचच आणखीन शिळी कशाला करायची! नका आणू आज भाजी!”
तो हताश होऊन दाणकन सोफ्यावर आदळला!
तिचा चेहरा अगदी निरागस! “वय झालंय आता! एवढं तर होणारच…” ही ढाल सुरक्षितपणे तिच्या हातात!
दोघेही एकमेकांकडे बघत राहिले आणि मग कोंडून ठेवलेलं हसू भसाभसा उतू गेलं…


