नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
माझ्या आयुष्यात आलेली ही ‘बेबी’, म्हणजे ‘स्नेहलता प्रभाकर गुप्ते’… माझ्या सासूबाई! म्हणजे मी त्यांना आईच म्हणते; पण त्यांची भावंडं त्यांना ‘बेबी’ म्हणायची आणि माझा मुलगा पण त्यांना बेबी म्हणायचा. खरंतर, सगळ्या नातवंडांची ती ‘ओबा आजी’. ओबा म्हणजे माझे सासरे. माझ्या भाच्याने बाबा + आजोबा = ओबा असे त्यांचं नामकरण केलं आणि त्यांची बायको म्हणजे ओबा आजी हे माझ्या लेकाने केलेल नामकरण!
तर अशा या माझ्या सासूबाई. म्हणजे आमच्या आई. गोऱ्यापान, देखण्या, कुरळे केस, सुगरण, टिपीकल सीकेपी… म्हणजे मसाल्याचं पाणी जरी उकळवून दिलं तरी ते चविष्टच लागणार. बरं, फक्त सुगरण नाही तर, एक नंबर पिक्चरबाज. राहायला वरळी सेंच्युरी बाजारला… घरापासून चालत तीन थिएटर होती – सत्यम, सुंदरम आणि सचिनम. म्हणजे, घरात भांडण झालं किंवा आई चिडल्या की, घरातून निघून जायच्या… त्या डायरेक्ट सिनेमा बघायला! मला म्हणाल्या होत्या ना की, “घरखर्चातले सुट्टे पैसे गल्ल्यात टाकायचे. नंतर ते पैसे कपाटात साड्यांच्या घडीमध्ये ठेवायचे. सिनेमा बघायला उपयोगी पडतात. तू पण चिल्लर जमा करतेस ना? काय करतेस त्या पैशांचं?” मी हसले आणि म्हटलं की, “दादर टीटी सर्कलच्या सिल्क म्युझियममध्ये जाऊन साड्या विकत घेते. ॲक्टिव्हिटी सेम पण शौक वेगवेगळे!
हेही वाचा – स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!
बाई प्रचंड सुगरण. वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड. देण्यासाठी हात मोकळा. समोरच्याला अगदी सढळ हस्ते खाऊ-पिऊ घालणार. कामाचा उरक भन्नाट. तसा मला स्वयंपाक बनवता येत होताच. पण तरीही मी संपूर्ण प्राविण्य त्यांच्या हाताखाली मिळवलं. थोडक्या वेळेत उत्तम चवीच हेल्दी जेवण कसं बनवायचं, हे त्यांनी शिकवलं. खूप सारे नवीन पदार्थ मी त्यांच्याकडेच शिकले. शिवाय, काम कितीही असलं तरी बाईला उरक हा हवाच! किचनचं काम झटपट आवरून बाईने स्वतःला वेळ द्यायलाच हवा. वाचन कर, लिखाण कर, सिनेमे बघ, विणकाम, भरतकाम कर. फक्त किचनमध्ये नको बाई राहुस, हा सल्ला.
वरळीहून मालाडला आल्यावर थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघणं बंद झालं. आता त्यांच्या जुन्या आवडीने डोकं बाहेर काढलं… स्पोर्ट्स! फक्त क्रिकेट नाही तर, फुटबॉल आणि टेनिस सुद्धा!! खूप आवडीने आणि समजून उमजून बघायच्या. उगाच लोक बघतात म्हणून नाही. त्यांनी माझं नाव काय ठेवलं असेल? Hopeless. कारणही तसंच आहे. आई माझ्या धाकट्या नणंदेच्या सोबत रहायच्या. तिच्याकडे दीड दिवसाचा गणपती… गणपती विसर्जन झालं आणि त्या मला म्हणाल्या, “हर्षा जिथे बाप्पाची मूर्ती होती ना, तिथे मोठ्या थाळीत फळे ठेवली आहेत. त्यातली दोन वेलची केळी घेऊन ये.”
मी ‘ok’ म्हटलं आणि गेले हॉलमध्ये. बरे, त्या थाळीत वेलची केळी सोडून दुनियाभरची सगळी फळं होती. नणंदेने विचारलं काय हवंय गं? मी म्हटलं, “वेलची केळी.” ती म्हणाली, “रात्रीची केळी खाऊ नकोस. शुगर वाढेल तुझी.” मी म्हणाले, “अगं मला नकोत, आईना हवीत.” ती ओरडलीच मला… “अगं, आई इन्सुलिन टोचवते आणि रात्रीची केळी कसली देतेस तिला.” मी हात हलवत आईंच्या बेडरूममध्ये गेले. तेव्हा आई विचारत्या झाल्या… “केळी कुठे आहेत?” मी म्हणजे धन्यवादच! म्हटलं “आई, नीता ओरडली मला म्हणे आईला रात्रीची वेळी केळी द्यायची नाहीत.” आणि आमच्या सासूबाईंनी कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाल्या, “Hopeless साधी दोन केळी नाही चोरता आली तुला?” मी म्हटलं, “आई, तुम्ही मला चोरी करायला पाठवलं होतंत?” आई आणि माझी मुलं माझ्या फजितीवर हसत होती.
माझ्या सीरियल, फिल्म त्या खूप आवडीने बघायच्या. त्याचं expert opinion द्यायच्या. बरं, फक्त स्टोरी, कॅरेक्टरच नाही तर, माझ्याबरोबरच्या इतरांच काम कसं झालं, माझ्या तर मेकअप, कपडे, दागिने या सगळ्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. त्याबाबत त्या माझ्याशी चर्चा पण करायच्या. “अमुक रोल करताना, ते मंगळसूत्र जरा घसघशीत घालायच ना! काय दिसली असतीस… अजून छाप पडली असती.” वगैरे वगैरे.
दिवस तर कायम भराभर पळत असतात. आई वाढत्या वयानुसार गोष्टी विसरायला लागल्या होत्या. ऑन-ऑफ व्हायच्या. कधी कधी सगळ्यांची नाव विसरायच्या. एके दिवशी मी भेटायला गेले… विचारलं, “आई सांगा बघू मी कोण आहे?” त्या काहीच बोलेनात. वाटलं ऑफ मोडवर गेल्यात अणि त्या पटकन बोलल्या, “या या जिजाबाई, शूटिंग संपलं का तुमचं?” मी एकदम खूश. म्हणजे नाव जरी विसरल्या तरी मला विसरल्या नव्हत्या!
एकदा त्यांना चेकअपसाठी मी आणि माझी नणंद कोकिलाबेनमध्ये घेऊन गेलो होतो. त्यांचं ते favourite hospital… चेकअप सुरू असताना डॉक्टर गप्पा मारत होते. आम्ही सांगितलं की, “त्यांना सिनेमे आणि मॅचेस बघायला खूप आवडतं.” डॉक्टरने विचारलं, “आजी कोणता क्रिकेटर आवडतो?” छान गप्पा मारता मारता एकदम गप्प झाल्या. म्हटलं, या आता ऑफ मोडवर गेल्यात. आम्ही बिल पे करून निघतच होतो. समोरून तेच डॉक्टर आले. आईंनी मला विचारलं की, “त्यांना सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरचं नाव सांगू का?” आम्ही दोघी उडालोच. त्या काही ऑफ मोडवर नव्हत्या… विचार करत होत्या. मग डॉक्टरांनी त्यांना आवडते अभिनेते कोण, ते विचारलं. मला वाटलं, अमिताभ बच्चन सांगतील किंवा राजेश खन्ना. या म्हणजे सॉलिड निघाल्या. “सुबोध भावे आणि आस्ताद काळे. या दोघांची कामं मला खूप आवडतात. कोणत्याही गेटअपमध्ये मी त्यांना ओळखू शकते. खूपच कमाल.”
मधे कलर्स मराठीवर माझी एक सीरियल टेलिकास्ट झाली – बाईपण जिंदाबाद. एक तासाचा एक एपिसोड… टेलिकास्टच्या दुसऱ्या दिवशी आईंचा मूड छान होता… म्हणून नणंदेने तो एपिसोड त्यांना लावून दिला. एपिसोड बघून झाल्यावर डायरेक्ट व्हिडीओ कॉल! “हर्षा तुझा सिनेमा बघितला. सुंदर स्टोरी, तुझा रोल पण मस्त! सगळ्यांनी काय सुरेख काम केली आहेत. तुझ्या साड्या किती सुंदर आहेत… अणि चांगली बारीक झाली आहेस. लक्ष दे जरा स्वतःकडे. आता जाडी नको होऊस…” त्यांनी पाहिलेलं माझं शेवटच काम.
हेही वाचा – वाढदिवसाच्या शुभेच्छा… दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा!
दहा दिवसांपूर्वी कोकिलाबेनमध्ये ॲडमिट केलेलं त्यांना. खरंतर, त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन राहायला आवडायचं. आयसीयूमध्ये जाऊन भेटून आले. गोऱ्यापान रंगाची हाडाची जुडी गादीवर ठेवली होती. सगळीकडून नळ्या घातल्या होत्या. त्या नाजूक झालेल्या जीवाचे किती हाल?! चार दिवसांपूर्वी त्या चक्क मला ‘आई’ म्हणाल्या… “आई मला खाऊ आण”! गलबलून आलं. पण मधल्या नणंदबाई म्हणाल्या की, आईला सध्या तिच्या आईची आठवण येते बहुदा.
गुरुवार, 25 जून 2026. दुपारी फोन आला… “लवकर निघून हॉस्पिटलमध्ये या. आई गेली.” आई गेली? कितीतरी वेळ मी एका जागी बसून होते. मला काही सुधरतच नव्हतं. पण आवरून निघायला हवंच होत. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. सगळी औपचारिकता पूर्ण करून आम्ही तिचं शव घेऊन घरी आलो… आता शेवटचा प्रवास. विधी सुरू झाले. बाहेरच्या देशात असणाऱ्या नातवंडांना व्हिडीओ कॉलद्वारे आजीचं अंतिम दर्शन करवलं. तीन बहिणी आणि एक भाऊ म्हणजे माझा नवरा. चौघांनी आईला मुखाग्नी दिला. आई त्यांच्या पुढल्या प्रवासाला निघून गेल्या.
अग्नीनंतर जीवखड्यावर पाणी पाजत असताना माझ्या नवऱ्याच्या अंगावर मोठा मुंगळा फिरताना दिसला त्याला नमस्कार केला आणि म्हटलं, “बेबी स्वामीचरणी रुजू झाली…”


