विशाल कुलकर्णी
क्रिकेटमध्ये अनेक विक्रम झाले. कुणी शतकांचे डोंगर उभी केले, कुणी विकेट्सचा पाऊस पाडला, तर कधी एखाद्या चमत्कारिक क्षणाने सामने पलटवले. पण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम आहे, जो ना चौकारांनी बनला, ना विकेट्सनी… तो घडला संयमाने, अचूकतेने आणि विलक्षण एकाग्रतेने!
1964 साल. मद्रासचं कॉर्पोरेशन स्टेडियम. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना… आणि त्या दिवशी भारतीय संघाचा एक साधासुधा दिसणारा डावखुरा फिरकीपटू जगाला दाखवून देणार होता की, क्रिकेटमध्ये फक्त आक्रमणच महान नसतं, नियंत्रणही तितकंच भयावह असू शकतं!
तो गोलंदाज होता… बापू नाडकर्णी.
131 चेंडू… एकही धाव नाही!
इंग्लंडचे फलंदाज ब्रायन बोलस आणि केन बॅरिंग्टन बचावात्मक खेळ करत होते. भारताची मोठी धावसंख्या पाहता त्यांचा उद्देश स्पष्ट होता, सामना वाचवायचा. पण त्यांना कल्पनाही नव्हती की, समोरून येणारा भारतीय गोलंदाज त्यांच्या संयमाचीच परीक्षा घेणार आहे.
हेही वाचा – ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!
बापू नाडकर्णींनी अशी गोलंदाजी सुरू केली की, जणू काही प्रत्येक चेंडू एकाच ठिकाणी पडत होता. ना जास्त टर्न, ना वेगात फार बदल, ना दिखाऊपणा… फक्त परिपूर्ण लाइन आणि लेंग्थ!
एक ओव्हर गेली.
मग दुसरी.
मग तिसरी…
आणि पाहता पाहता सलग तब्बल 21 मेडन ओव्हर्स!
होय… सलग 131 चेंडूंवर इंग्लंडला एकही धाव घेता आली नाही.
आजच्या टी-20च्या युगात हे ऐकून अविश्वसनीय वाटतं. पण त्या दिवशी मैदानावर जणू वेळच थांबली होती. स्कोअरबोर्ड हलत नव्हता… फक्त बापूंची अचूकता वाढत चालली होती.
त्यांच्या त्या स्पेलची आकडेवारी आजही थक्क करते :
32 ओव्हर्स
27 मेडन
फक्त 5 धावा
एकही विकेट नाही!
विकेट नाही, पण तरीही तो स्पेल क्रिकेट इतिहासात अमर झाला.
ही कसलीही जादू नव्हती. It was not by fluke either. “हे काही योगायोगाने (किंवा नशीबाने) घडलेले नव्हते… ही तपश्चर्या होती. बापू नाडकर्णींची गोलंदाजी पाहणारे म्हणायचे, “हा माणूस चेंडू नाही टाकत, तो जणू शिवणकाम करतो.”
त्यांच्या अचूकतेमागे वर्षानुवर्षांची साधना होती. असं म्हणतात की, सराव करताना ते पिचवर नाणं ठेवायचे आणि पुन्हा पुन्हा त्याच जागी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करायचे. त्यांच्या मते गोलंदाजाचं खरं सामर्थ्य वेगात नसतं, तर नियंत्रणात असतं.
आजच्या क्रिकेटमध्ये जिथे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका शोधला जातो, तिथे बापूंनी जगाला दाखवलं होतं की, फलंदाजाला “धाव घेऊ न देणं” हे देखील तितकंच मोठं शस्त्र असतं.
0000
दक्षिण आफ्रिकेच्या ह्यू टेफिल्ड यांनी 1956-57मध्ये इंग्लंडविरुद्ध 137 डॉट बॉल्स टाकण्याचा विक्रम केला होता. मात्र तो विक्रम दोन वेगवेगळ्या डावांमध्ये विभागलेला होता.
पण बापू नाडकर्णींचे 131 डॉट बॉल्स एका सलग स्पेलमध्ये, एका डावात होते. म्हणूनच क्रिकेटप्रेमी आजही म्हणतात, “टेफिल्डचा विक्रम मोठा असेल… पण बापूंची गोलंदाजी अधिक थक्क करणारी होती.”
तो काळ वेगळा होता…
त्या काळात क्रिकेट म्हणजे सहनशक्ती, मानसिक ताकद आणि तांत्रिक परिपूर्णतेचा खेळ होता. प्रत्येक धाव मेहनतीने मिळायची. प्रत्येक विकेटसाठी डावपेच आखावे लागायचे. बापू नाडकर्णींची ती गोलंदाजी म्हणजे जणू भारतीय क्रिकेटच्या शिस्तबद्ध संस्कृतीचं प्रतीक होती.
ना आक्रमक सेलिब्रेशन.
ना आक्रस्ताळेपणा.
फक्त शांत चेहरा… आणि अविश्वसनीय अचूकता.
आजही तो विक्रम का जिवंत आहे?
कारण काही विक्रम आकड्यांमध्ये मोजले जात नाहीत… ते जिवंत इतिहास बनून जातात.
हेही वाचा – मारवाडी…
131 डॉट बॉल्स म्हणजे फक्त स्कोअरबोर्डवरील शून्य नव्हतं. तो होता संयमाचा विजय. एकाग्रतेचा आणि स्वतःवर असलेल्या अफाट नियंत्रणाचा विजय. आजही क्रिकेटमधील अचूक गोलंदाजीचा विषय निघाला की, बापू नाडकर्णींचं नाव आदराने घेतलं जातं. कारण त्यांनी त्या दिवशी सिद्ध केलं होतं की, क्रिकेटमध्ये शांतताही इतिहास घडवू शकते.
माझा जन्म झाला तेव्हा बापू ऑलरेडी क्रिकेटमधून निवृत्त झालेले होते. नवीन खेळाडूंनी त्यांची जागा घेत अनेक विक्रम रचायला सुरुवात केले होती. पण बापूंचा हा विक्रम मात्र आजही अबाधित आहे.
आजचं युग भले फास्ट क्रिकेटचं असेल. आज भले 20 ओव्हरमध्ये 300-400 धावांचा पाऊस पाडला जात असेल. पण माझ्यासारख्या कसोटी क्रिकेट प्रेमींसाठी आजही ते जुनं क्रिकेटच खरं क्रिकेट आहे! आजकाल प्रत्येक मॅचमध्ये होणाऱ्या फिक्सिंगच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटला फिक्सिंगचा रोग लागण्यापूर्वीचं ते निखळ खिलाडूवृत्तीचे दिवस, त्या मॅचेस निव्वळ अविस्मरणीय आहेत.
21 सलग मेडन ओव्हर्स…
131 सलग डॉट बॉल्स…
आणि क्रिकेट इतिहासात कायमचं कोरलं गेलेलं एक नाव… बापू नाडकर्णी!


