आरेन
“पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी महिला क्रिकेट संघाची योग्य दिशेने तयारी सुरू आहे. तथापि, अष्टपैलू अमनजोत कौरची उणीव भरून काढणे सोपे नाही. तिची कमतरता संघाला नक्कीच जाणवेल,” असे मत भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी व्यक्त केले. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ॲण्ड मॅनेजमेंटचा (आयआयएसएम) दीक्षांत सोहळा रविवारी पार पडला. यावेळी, मुजुमदार यांनी आपले मत व्यक्त केले.
इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. तत्पूर्वी, भारतीय संघ 10 ते 16 मेदरम्यान बंगळुरूमध्ये सराव शिबिरात सहभागी होईल. विश्वचषकानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामनादेखील खेळणार आहे.
हेही वाचा – युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?
अमोल मुजुमदार यांनी सांगितले की, “अमनजोत दुखापतग्रस्त आहे आणि तिच्यासारख्या खेळाडूची जागा भरणे खूप कठीण आहे. तिने भारतासाठी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे आणि तिची उणीव आम्हाला जाणवेल. दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. तिला गंभीर दुखापत झाली असून किमान चार ते पाच महिने ती क्रिकेटपासून दूर राहील. ती पूर्णपणे तंदुरुस्त होऊन अधिक मजबूत पुनरागमन करेल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
संघाच्या तयारीबाबत मुजुमदार म्हणाले की, “संघ योग्य दिशेने प्रगती करत आहे. सराव शिबिराचे आयोजन महत्त्वाचे ठरले आहे. यापूर्वीही आम्ही अशा शिबिरांमध्ये सहभागी झालो आहोत. आमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानासाठी आम्ही चांगली तयारी करण्यावर विश्वास ठेवतो. इंग्लंडचा दौरा नेहमीच आव्हानात्मक असतो. पण, आमचा संघ त्यासाठी सज्ज आहे. गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडला नमवले होते आणि या वेळीही चांगली कामगिरी करण्यासाठी संघ तयार आहे.”
हेही वाचा – सर्व विद्यार्थ्यांना भरपूर खेळण्याची संधी मिळायलाच हवी…
रंगशारदा सभागृहामध्ये झालेल्या या सोहळ्यादरम्यान स्टार क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज हिचीही उपस्थिती होती. यावेळी, विद्यार्थ्यांना मुजुमदार आणि जेमिमा यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. जेमिमा रोड्रिग्ज हिने सांगितले की, “गेल्या वर्षी पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकल्यानंतर संघ आणखी एक विजेतेपद जिंकण्यासाठी सज्ज आहे. माझ्या मते, एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील विजय आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आम्ही एक विश्वविजेतेपद जिंकले आहे. पण, आम्हाला आणखी एक विश्वविजेतेपद जिंकायचे आहे. केवळ एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकून आम्ही समाधानी राहू शकत नाही.”


