सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे । ते इंद्रियां कीर जोगें । काइ होईल ॥41॥ परि ध्यानाही कुवाडें । म्हणोनि एके ठायीं न संपडे । व्यक्तीसि माजिवडें । कवणेही नोहे ॥42॥ जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें । जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें ॥43॥ जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे । ऐसें म्हणोनि उपाये । उपजतीचिना ॥44॥ जें चळे ना ढळे । सरे ना मैळे । तें आपुलेनिचि बळें । आंगविलें जिहीं ॥45॥
संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः । ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥4॥
पैं वैराग्यमहापावकें । जाळूनि विषयांचीं कटकें । अधपलीं तवकें । इंद्रियें धरिलीं ॥46॥ मग संयमाची धाटी । सूनि मुरडिलीं उफराटीं । इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचां ॥47॥ अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा । मूळबंधाचा हुडा । पन्नासिला ॥48॥ आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले । निद्रेचें शोधिलें । काळवखें ॥49॥ वज्राग्नीचां ज्वाळीं । करूनि अपानधातूंची होळी । व्याधींचां सिसाळीं । पूजिलीं यंत्रें ॥50॥ मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा । तया चोजविलें प्रभा । निमथावरी ॥51॥
हेही वाचा – Dnyaneshwari : इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला
अर्थ
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही, आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करत नाही, ते इंद्रियांना खरोखर गोचर होईल काय? ॥41॥ परंतु जे ब्रह्म एका ठिकाणी न सापडल्यामुळे आणि कोणात्याही आकारात ते येत नसल्यामुळे जे ध्यानालाही कठिण आहे, ॥42॥ जी वस्तू सर्व ठिकाणी, सर्व रूपाने आणि सर्वकाळी असते, ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरिता गेले असता, चिंतन करण्याची क्रिया, तेथे आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते, ॥43॥ जी वस्तू उत्पन्न होत नाही आणि नाशही पावत नाही आणि जी वस्तू नाही असेही नाही आणि आहे असेही नाही, आणि जी वस्तू अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाहीत, ॥44॥ जे चालत नाही आणि हलत नाही, जे संपत नाही आणि मळत नाही, ते (ब्रह्म) आपल्या बळानेच ज्यांनी स्वाधीन करून घेतले आहे. ॥45॥
इंद्रियसमुदायांचे नियमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवणारे आणि सर्व भक्तांचे हित त्यामध्ये रत असणारे, (अशी उपासना करणारे) ते देखील माझ्याप्रतच येतात. ॥4॥
(ज्यांनी) वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयांची सैन्ये जाळून, त्यायोगाने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून धरली ॥46॥ मग इंद्रियास (निग्रहाच्या) पाशात घालून अंतर्मुख केले आणि अशा तर्हेने त्यास हृदयाच्या कपाटात कोंडले ॥47॥ हे सुजाण अर्जुना, गुदद्वाराला आसनमुद्रा लावून मूळबंधाचा किल्ला तयार केला. ॥48॥ आशेचे संबंध तोडून टाकले, भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकला. ॥49॥ वज्राग्नीच्या ज्वाळाने अपानरूप धातूंची होळी करून रोगरूप मुंडक्यांनी प्राणायामरूपी तोफा पूजिल्या. ॥50॥ मग कुंडलिनीची मशाल आधारचक्रावर उभी केली आणि तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रपर्यंत मार्ग समजला. ॥51॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तरि व्यक्त आणि अव्यक्त, हें तूंचि एक निभ्रांत


