सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
पाहे तंव तें कुरुक्षेत्र । तैसेंचि दोहीं भागीं झालें गोत्र । वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवारी ॥661॥ तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु आहे निवांतु । धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥662॥
अर्जुन उवाच – दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन । इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥51॥
एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीर्यविलासें । मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥663॥ बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान । अहंकारेंसी मन । देशधडी जाहलें ॥664॥ इंद्रियें प्रवृत्ती भुलली । वाचा प्राणा चुकली । ऐसी आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥665॥ तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृती । आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें इयां ॥666॥ ऐसें सुख जीवीं घेतलें । मग श्रीकृष्णातें जी म्हणितलें । मियां तुमचें रूप देखिलें । मानुष हें ॥667॥ हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया । बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥668॥ जी विश्वरूपाचां सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी । तो इयें निजमूर्तीचां तीरीं । निगालों आतां ॥669॥ आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतीया जी झाडा । हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥670॥ सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला । आतां जिणयाचा फिटला । अभरंवसा ॥671॥ माझां हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी । सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ॥672॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढु कैसा
अर्थ
अर्जुन पाहावयास लागला, तो ते कुरुक्षेत्र तसेच होते, दोन्ही बाजूंना नातलग मंडळी तशीच (पूर्वीप्रमाणे) उभी होती आणि योद्धे, शस्त्रांचे आणि अस्त्रांचे समुदायच समुदाय वर्षाव करीत होते. ॥661॥ त्या बाणांच्या मांडवाआंत रथ पूर्वीप्रमाणेच स्थिर होता व घोडे हाकण्याच्या जागी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झालेले होते आणि आपण खाली होता. ॥662॥
अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानवरूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो आहे. ॥51॥
पराक्रम करणे हाच ज्याचा खेळ आहे, त्या अर्जुनाने याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे कृष्णाचे रूप पाहिले. मग श्रीकृष्णास म्ह्णाला, आता मी जगलो असे मला वाटते. ॥663॥ माझे ज्ञान बुद्धीला सोडून भयाने रानोमाळ झाले होते आणि मन हे अहंकारासह परागंदा झाले होते. ॥664॥ इंद्रिये विषयांकडे धावण्याचे विसरली होती आणि वाचाही प्राणास मुकली होती. (बंद पडली होती). याप्रमाणे शरीररूपी गावात दुर्दशा उडाली होती. ॥665॥ ती (बुद्धी, मन आणि इंद्रिये) सर्वच पुन्हा टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आली. आता श्रीकृष्णा, यांना जिवंतपण प्राप्त झाले. (ही आपल्या स्वभावावर येऊन आपापली कामे करावयास लागली). ॥666॥ असा त्याने मनात आनंद मानला आणि मग तो कृष्णास म्हणाला, महाराज, तुमचे हे मनुष्यरूप (एकदाचे) माझ्या दृष्टीस पडले. ॥667॥ हे देवाधिदेवा, हे रूप दाखविणे म्हणजे मी जे चुकलेले मूल, त्या मला तू जी माझी आई, तिने माझी समजूत घालून मला स्तनपानच दिले. ॥668॥ महाराज, विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने लाटेमागून लाट आक्रमीत होतो (गटांगळ्या खात होतो), तो मी या आपल्या चतुर्भुज मूर्तिरूप किनार्यास आता लागलो. ॥669॥ हे द्वारकेच्या राजा, ऐक. (विश्वरूपदर्शनानंतर या चतुर्भुज रूपाची भेट) ही भेट नव्हे, तर मी जे सुकावयास लागलेले झाड, त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षाव होय. ॥670॥ तहानेने पीडलेला जो मी, त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात भेटला. आता माझा जगण्याविषयीचा संशय दूर झाला. ॥671॥ माझ्या हृदयदेशात आनंदाच्या वेलाची लावणी होत आहे. (आज) सुखाची आणि माझी गाठ पडत आहे. ॥672॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा संतोषु बहु चित्तें, घेइजत असे पांडुसुतें


