सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
श्रीभगवानुवाच :- मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् । तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥47॥
या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला । म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥609॥ कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी । मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ॥610॥ आम्ही सावियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणे देणें । वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासि गा ॥611॥ तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें । कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ॥612॥ ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । म्हणोनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥613॥ तें हें अपारां अपार । स्वरूप माझें परात्पर । एथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥614॥ हें ज्ञानतेजाचें निखिळ । विश्वात्मक केवळ । अनंत हे अढळ । आद्य सकळां ॥615॥ हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना । जे जोगें नव्हे साधना । म्हणोनियां ॥616॥
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः । एवंरूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥48॥
याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें । याज्ञ की माघौते आले । स्वर्गौनीचि ॥617॥
साधकीं देखिला आयासु । म्हणोनि वाळिला योगाभ्यासु । आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ ॥618॥ सीगेचीं सत्कर्मे । धाविन्नलीं संभ्रमें । तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला ॥619॥ तपीं ऐश्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें । एक तपसाधन जें ठेलें । अपारांतरीं ॥620॥ तें हें तुवां अनायासें । विश्वरूप देखिलें जैसें । इये मनुष्यलोकीं तैसें । न फावेचि कवणा ॥621॥ आजि ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एकु आथिला जगीं । हें परमभाग्य आंगीं । विरंचीही नाहीं ॥622॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जी कल्पादीलागोनी, आजिची घडी धरुनी
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होऊन मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत आणि आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखविले. हे माझे (रूप) तुझ्याखेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही. ॥47॥
अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला, असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही! ॥609॥ ही कोणती वस्तू तुला प्राप्त झाली आहे! तिच्या प्राप्तीचा आनंद मानत नाहीस; उलट, एककल्ली मनुष्यासारखा भिऊन काय बोलतोस, ते कळत नाही. ॥610॥ आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो, तेव्हा आपले शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने म्हटलेले त्यास देतो. पण (याशिवाय) अर्जुना कोणास आपला जीव अर्पण केला, अशी गोष्ट कोठे घडली आहे काय? ॥611॥ आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेकरिता हे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे. ॥612॥ आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली आहे की काय, हे कळत नाही. म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा (विश्वरूपाचा) जगात ध्वज लावला (जगात प्रसिद्ध केले). ॥613॥ ते हे माझे मायेपलीकडील स्वरूप सर्व अमर्याद वस्तूंपेक्षा अमर्याद आहे आणि कृष्णादिक जे अवतार होतात, ते येथूनच होतात. ॥614॥ हे स्वरूप केवळ ज्ञानतेजाचेच बनलेले आहे आणि विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे. या स्वरूपाला कधी अंत नाही आणि ते कधी ढळत नाही आणि ते सर्वांचे मूळ आहे. ॥615॥ अर्जुना, हे (विश्वरूप) तुझ्याशिवाय पूर्वी दुसर्या कोणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही. कारण हे कोणत्याही साधनांनी प्राप्त होण्यासारखे नाही. ॥616॥
हे कुरुकुलश्रेष्ठा! वेदपठन, यज्ञयागादि, शास्त्रपठन, दान, (श्रौतस्मार्तादि) कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनीदेखील असे हे माझे रूप, मनुष्यलोकांमध्ये तुझ्याशिवाय दुसर्या कोणालाही दिसणे शक्य नाही. ॥48॥
वेद याला (विश्वरूपाला) जाणण्याच्या मार्गाला लागले आणि ते मौन धारण करून बसले आणि यज्ञ म्हणाशील तर ते स्वर्गापासूनच माघारी आले. ॥617॥ साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला, म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला आणि अध्ययनाने विश्वरूप पहाण्याची योग्यता येत नाही. ॥618॥ पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्तीकरिता धावली, पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्यलोक गाठला. ॥619॥ तपांनी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्याउभ्याच टाकून दिला. याप्रमाणे जे विश्वरूपच, तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिले ॥620॥ असे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस, तसे या मृत्यूलोकात कोणासही पाहावयास सापडणार नाही. ॥621॥ आज ध्यानरूप संपत्तीकरता जगात तूच एक संपन्न आहेस. असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. ॥622॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : हे विश्वरूपाचे सोहळे भोगूनि निवाले जी डोळे


