Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मे 2026

    May 21, 2026

    मी, मार्था मॅम आणि राधा…

    May 20, 2026

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, May 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मी, मार्था मॅम आणि राधा…
    ललित

    मी, मार्था मॅम आणि राधा…

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यMay 20, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अहंकारी मार्था मॅम, मुलुंडच्या हॉस्पिटलमधील रेसिडेंट डॉक्टर, नर्स राधा, मल्याळी नर्स राधा, डॉक्टर विवेक सर, मार्था विरुद्ध डॉक्टर विवेक, मार्था विरुद्ध नर्स राधा, नर्स राधा डॉक्टर विवेक मैत्री, नर्स राधाची आत्महत्या
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मुंबईच्या मुलुंडमधील एका हॉस्पिटलमध्ये मला रेसिडेन्ट डॉक्टर म्हणून नोकरी मिळाली. पगार पाचशे रूपये. (1985 सालची गोष्ट) हॉस्पिटलच्या समोरच्याच एका बिल्डिंगमधल्या फ्लॅटमध्ये राहायची सोय होती. लहान गावात वाढल्यामुळे मुंबईच्या वातावरणाची सवय नाही. ती धावपळ… ते फाडफाड इंग्रजी बोलणारे लोक पाहून जीव दडपून जायचा. रेसिडेन्ट डॉक्टर हे नाव ऐकायला छान वाटत असले तरी, पडेल ते काम करावे लागायचे. ते अपेक्षित होते. आम्ही शिकायला आलो होतो, पैसे कमवायला नाही.

    मार्था म्हणून मॅट्रन होत्या. त्या एकदम तरबेज. कोणत्या operationला काय काय autoclaveला लावायचे इथपासून ते कोणता सीरियस पेशंट कसा हँडल करायचा, हे सर्व त्यांना माहिती. पण त्यांचा एक मोठा दुर्गुण होता. त्या भयंकर अहंकारी होत्या. त्यामुळे त्या माझ्यासारख्या नवीन डॉक्टरला समजावून देण्यापेक्षा मला हुकूम देऊन काम करायला लावायच्या. ‘तुम्हा नवीन डॉक्टरांपेक्षा मला जास्त कळते,’ असे चारचौघांपुढे बोलायची. खूप अपमानीत वाटायचे. पण नाईलाज होता. त्याचवेळेस राधा म्हणून एक सिस्टर होती, ती पण नवीनच लागलेली… माझ्याआधी दोनचार दिवस! तिलाही अनुभव हवा होता. कुरळ्या केसांची काळीसावळी हसतमुख राधा टिपीकल मल्याळम दिसायची. आवाज तर एकदम गोड. जेव्हा मला ती ‘विवेकसर’ म्हणून हाक मारायची तेव्हा एखाद्या देवघरातली घंटी किणकिणल्यासारखी वाटायची. तिचे माझे लवकरच सूत जुळले. दोघांना मुंबई नवीन. दोघांना अनुभवाची जरूर. दोघांचाही मार्था मॅट्रनकडून अपमान (राधाचा तर जास्तच)…

    हळूहळू मी रमत गेलो शिकत गेलो… सीरियस पेशन्ट हँडल करणे, इमरजन्सी इंजेक्शन, पेशंटला रेफर केव्हा करायचे, एडमिट करताना पेशंटची कंडिशन बघून एडमिट करायचे की नाही ते ठरवणे. शिवाय, मेडिकोलीगल प्रॉब्लेम… राधाही माझ्याबरोबर राहात शिकत गेली. सोबत तिथले सीनिअर डॉक्टर, सिस्टर होत्याच. हॉस्पिटलचे सर्वेसर्वा होते डॉ. जिग्नेश शहा सर. गोरेपान, नाजूक फ्रेमचा चश्मा आणि रुग्णांशी बोलताना तोंडात गुजराती गोडवा.

    एकदा मी त्यांच्याकडे मार्था मॅमबद्दल तक्रार केली, तेव्हा ते माझी समजूत घालत म्हणाले  “विवेक, तू अय्या सिखवा, भणवा आवेलो छे. एनापर ध्यान मुकवानू. मार्थासिस्टर मारी जुनी सिस्टर छे… एनाबगैर ना चालसे मने…”

    हेही वाचा – …अन् अंकूसोबत नव्याने संसार सुरू केला!

    मी काय समजायचे ते समजलो. थोडक्यात, ‘तू गेला तरी चालेल,’ हेच अप्रत्यक्षपणे सुचवले होते त्यांनी. माझा संताप झाला ड्युटीवर असताना माझा संताप राधाच्या लक्षात आला. ड्युटी संपल्यावर ती नेहमीच्या गोड आवाजात म्हणाली “विवेक सर. यहा कॉर्नरपर एक होटल हैं. कॉफी बहुत अच्छा मिलता उदर… पिनेका है?”

    आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे राधाने माझी बरीच समजूत घातली. तिने काय सांगितले ते फारसे आठवत नाही. आठवतो तो तिने बोलताबोलता सहजपणे माझ्या हातावर ठेवलेला हात! त्या सहज स्पर्शाने आमच्यात एक वेगळेच विश्वासाचे सुंदर नाते निर्माण झाले.

    आता मी आणि राधा अगदी मोकळेपणानं काम करायला लागलो. मार्था मॅमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागलो. याचा परिणाम मात्र उलटाच झाला. मार्था सिस्टर जास्तच चिडायला लागल्या. एकदा किरकोळ कारणावरून तिने “तुम दिनभर क्या करते हो डॉक्टर? राधा के साथ तो घुमते रहते हो.” असा टोमणा मारला. राधाचे नाव घेतल्याने माझा संताप संताप झाला…

    मी त्याचक्षणी ड्यूटी सोडली आणि जिग्नेश सरांना भेटायला गेलो. सरांना सांगितले की, “मी आजपासून नोकरी सोडत आहे. (ती काही सरकारी नोकरी तर नव्हतीच!) आता मार्था सिस्टरशी जमवून घेणे अशक्य आहे…”

    सरांनी शांतपणे विचारले, “जाणार कुठे? अजून इकडच्या तिकडच्या हॉस्पिटलला ट्राय करशील. जॉब मिळेल याची गॅरन्टी आहे का?…  मारी वात सामळ. मार्था सिस्टरची ड्युटी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच असते. तुला मी नाइट ड्यूटी देतो, संध्याकाळी सात ते सकाळी सात. ड्युटीअवर्स थोडे जास्त आहे, पण इमर्जन्सी सोडली, तर बाकी खास काम नाही.”

    मी मान्य केले.

    हॉस्पिटलमध्ये आलो तर राधा नव्हती. कदाचित, घरी निघून गेली असावी, म्हणून मी कुणाला विचारले नाही. नाइट करून दुसऱ्या दिवशी पुन्हा तपास केला तेव्हाही ती आलेली नव्हती. दोन-चार दिवस ती आलीच नाही. मी बैचेन झालो. तिच्या घराचा पत्ता ना माझ्याकडे  होता ना हॉस्पिटलकडे! त्यावेळेस मोबाइल नव्हते. इतर सिस्टर, मावश्यांना विचारले, पण कोणीच सांगेना. शेवटी तंगमणी म्हणून एक सिस्टर होती, तिने मला एक्स-रे रूममध्ये बोलावले आणि सांगितले, “त्यादिवशी मी तरातरा निघून गेल्यावर मार्था मॅम राधाला पण नाही नाही त्या बोलल्या. मल्याळममध्ये तिला तू केरळहून इथे पोट भरायला आली आहे का डॉक्टरबरोबर मजा मारायला? असेही बोलली. त्यानंतर राधा एका कोपऱ्यात जाऊन खूप रडली. त्यानंतर ती गेली ती परत आलीच नाही…”

    तंगमणीजवळ पण तिचा पत्ता नव्हता. तिचे पगाराचे पैसे बाकी होते, ते घ्यायला तरी ती येईल, या आशेवर होतो. पण आठ-दहा दिवस गेले तरी, ती आली नाही. तेव्हा, माझी आशा संपली.

    नाईट ड्युटी मिळाल्याने मी सुखी होतो. मार्था मॅमशी संबंधच राहिला नव्हता.

    एकेदिवशी मी ड्युटी संपवून निघत असताना मला रिसेप्शनिस्टचा निरोप मिळाला. राधा सिस्टर दहा वाजता फोन करणार होती हॉस्पिटलच्या लँडलाइनवर. विवेक सरांना निरोप द्यायला सांग म्हणून. माझी झोप उडाली. (नाइट संपल्यावर मी लगेच झोपायला जायचो.) मी अक्षरशः धावत फ्लॅटवर गेलो. दाढी, आंघोळ केली. ड्रेस बदलून साडेनऊ वाजल्यापासूनच रिसेप्शनला बसून राहिलो. एक–दोन फोन आले मी ते झडप घालून उचलले. ते पेशंटचे अपॉइंटमेंटचे होते. अखेर बरोबर 10 वाजता रिसेप्शनिस्टने माझ्याकडे राधा सिस्टर म्हणत फोन दिला…

    “हॅलो…”

    “क्या विवेक सर भुल गये क्या मुझे?” तोच सुंदर गोड आवाज.

    “कैसी बात करती हो राधा. मैं तो रोज पूछता था… तेरा ॲड्रेस भी नहीं मालूम…”

    “जाने दो. मैंने अभी कुर्ला में साई हॉस्पिटल में जॉब ले लिया है…”

    “क्यों? यहां क्यों नहीं?”

    “जाने दो सर, वहां आप का नाम खराब हो जाता…”

    “क्या गलत किया हमने?”

    “जाने दो सर…”

    “ठीक है, जाने दो. ये साई हॉस्पिटल कहां हैं. मै आज ही आता हूँ मिलने को…”

    “कोई जल्दी मत करो सर. फ्रायडे को मेरा ऑफ रहता, तब मिलते हैं. सुबह दस बजे…”

    “ok. पता?”

    तिने पत्ता सांगितला. मी तो व्यवस्थित लिहून घेतला. शुक्रवारची चातकासारखी वाट पाहू लागलो. गुरुवारी रात्री नीट झोप लागलीच नाही. सकाळी लवकर तयार झालो. कुर्ल्याला उतरलो तर साई हॉस्पिटल जवळच असल्याचे कळले. चालत चालत गेलो. पोहचलो तरी साडेनऊच झाले होते. समोरच्या टपरीवर दोनदा चहा घेतला. शेवटी दहाला पाच कमी असताना हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकले. पूर्ण हॉस्पिटलला राऊंड मारला, पण राधा दिसली नाही. शेवटी रिसेप्शन काउंटरला गेलो. तिथल्या रिसेप्शनिस्टला म्हणालो,

    “एक्सक्यूझ मी मॅम. इथे राधा म्हणून सिस्टर आहेत ना?”

    “तुम्ही कोण?”

    “मी… मी डॉक्टर विवेक. मुलुंड हॉस्पिटलमधून आलोय. राधा सिस्टरचे काही पेमेंट द्यायचे बाकी होते ते द्यायला आलोय…” ऐनवेळेस मला थाप सुचली.

    हेही वाचा – कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…

    “सॉरी सर. काल रात्रीच सिस्टर त्यांच्या गावाला निघून गेल्या. त्यांच्या वडिलांची तब्येत बहुदा सीरियस आहे.”

    मी सुन्न झालो. दोन क्षण काही सुचलंच नाही. तरी सावरत म्हणालो,

    “कधी परत येतायत त्या.”

    “कल्पना नाही सर. पाहिजे तर तुम्ही पेमेंट इथे देऊन टाका. सिस्टर आल्यावर त्यांना देऊन टाकू.”

    “तसे चालत नाही. पेमेंट प्रत्यक्ष देऊन त्यांची सही घ्यावी लागेल. सिस्टर मुंबईत कुठे राहातात?”

    “एक मिनिट…” म्हणून तिने रजिस्टर काढले. त्यात राधाचा केरळचा पत्ता होता. निराशा लपवत मी तो एका कागदावर लिहून घेतला. साई हॉस्पिटलचा नंबरही घेतला आणि उदास अंत:करणाने परत आलो.

    त्यानंतर दर आठवड्याला साई हॉस्पिटलला फोन करत होतो, पण ‘राधा सिस्टर आली नाही,’ हेच उत्तर मिळत होते. शेवटी गुपचूप आमच्या हॉस्पिटलच्या लेटरपॅडवरून तिला पत्र लिहिले, त्यात ‘तुमची मागील बाकी घेऊन जावी. पंधरा दिवसांत संपर्क न साधल्यास पैसे मिळणार नाहीत.’ हे लिहिले. पाकीट पत्रपेटीत टाकल्यावर दररोज उत्तराची वाट पाहायचो.

    दरम्यानच्या काळात एकदा पुन्हा साई हॉस्पिटलला जाऊन आलो, पण ते लोक तर एव्हाना तिला विसरून गेले होते. बरेच दिवस झाले. माझे हॉस्पिटलचे ट्रेनिंग पूर्ण झाले. मी जिग्नेश सरांना सांगून गावी जाण्याची परवानगी मागितली. त्यादिवशी शेवटची नाइट होती. संध्याकाळी का कोण जाणे, राधाची खूप आठवण आली… निघालो. कॉर्नर कॅफेला गेलो. सुदैवाने मी आणि राधा ज्या टेबलवर बसलो होतो, ते रिकामे होते. वेटरला दोन कॉफीची ऑर्डर दिली. तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहात निघून गेला. एक कॉफी समोर ठेऊन दुसरी मी शांतपणे प्यायलो. मनात म्हणालो,

    “राधा, तू मला विसरली तरी मी तुला विसरलो नाही.”

    डोळ्यांत अश्रू आले. तेवढयात माझ्या हाताला स्पर्श झाला…तोच आश्वासक! सहजस्पर्श… राधाच… नक्की राधा… दुसऱ्या हाताने डोळ्यातील अश्रू पुसून समोर बघितले… कोणीच नव्हते! भास… मला वेड लागत चालले असावे बहुतेक.

    नाइट केली. हिशोब झाला. फ्लॅटवर येऊन सामानाची आवरासावर करू लागलो. तेवढ्यात इंटरकॉमवरून रिसेप्शनला ताबडतोब बोलावल्याचा निरोप आला. अरे! हिशोबात काही गडबड तर नाही झाली?

    रिसेप्शनला पोहचलो तर मार्था मॅम तिथे चक्क रडत बसालेल्या! मला तर धक्काच बसला. एवढी अहंकारी, मग्रूर बाई चक्क रडते. माझ्याकडे पहात म्हणाली, “अपनी राधाने सुसाइड कर ली…”

    त्या काय बोलतात हे मला सुरुवातीला कळलेच नाही… जेव्हा कळले तेव्हा खोली गरागरा फिरली, मार्था मॅमच्या शेजारीच बसकण मारली. मार्था मॅम जोरजोरात रडत म्हणाल्या, “मैंने मारा उसको. मेरे ही गाव में रहती थी केरला… उस दिन बहुत बोली उसको… साई हॉस्पिटल में तुम से मिलने वाली थी, वह भी मुझे रिसेप्शनिस्ट ने बताया. वहां पर भी फोन किया… उसको बोला बंबई में रहना होगा, तो यह डॉक्टर को नहीं मिलने का… आखिर गांव चली गयी… मेरी वजह से हुवा ये… उपरवाला कभी माफ नहीं करेगा मुझे…”

    हेही वाचा – आसपासच्या हृदयद्रावक घटना अन् मातेची तगमग

    मी उन्मळून पडायला पाहिजे होतो, पण कोणजाणे मला मार्था मॅमबद्दल सहानुभूती वाटली. मी त्यांच्या खांद्यावर हळूवार थोपटत गेलो. त्यांचा उमाळा कमी झाल्यावर त्यांना विचारले, “कब हुवा… कैसे हुवा?”

    “उसके घर के कुवे में जान दे दी उसने. कल शाम पांच-साडेपांच बजे…”

    काल कॅफेमध्ये मी साडेपाच ते सहा बसलो होतो… राधाचा माझ्या हातावरचा स्पर्श आठवला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला…

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026 ललित

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026 ललित

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    By डॉ. अस्मिता हवालदारMay 19, 2026

    लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि…

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मे 2026

    May 21, 2026

    मी, मार्था मॅम आणि राधा…

    May 20, 2026

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 303
    • अवांतर 186
    • आरोग्य 112
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 426
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 211
    • मैत्रीण 19
    • ललित 638
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मे 2026

    May 21, 2026

    मी, मार्था मॅम आणि राधा…

    May 20, 2026

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मे 2026

    May 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.