Sunday, March 15, 2026

banner 468x60

Homeललितआसपासच्या हृदयद्रावक घटना अन् मातेची तगमग

आसपासच्या हृदयद्रावक घटना अन् मातेची तगमग

डॉ. विवेक वैद्य

दुपारी बातम्या बघताना “लोकलच्या दरवाज्यात स्टंट करणाऱ्या तरूणाचा मृत्यू” ही बातमी तिने पाहिली आणि ती अस्वस्थ झाली. आपला मुलगा लोकलने कॉलेजला जातो आणि त्याच्याबरोबर असणारे काही मित्र थोडे आगाऊ आहेत, हे तिला माहिrत होते. त्यांच्या नादाला लागून हाही काही नसते उपद्व्याप तर करत नसेल?

ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली. तब्बल अर्धा तास उशिराने तो आला तोपर्यत हिचा जीवात जीव नव्हता. थोडा वेळ गेल्यावर सहज विचारते असे दाखवत ती म्हणाली,

“का रे, तुझे मित्रबित्र नाही ना काही स्टंट करत लोकलमध्ये?”

“नाही गं. मी तर त्यांना लोकलच्या दरवाज्यातही उभ राहू देत नाही. घरी आई वाट पहात असते ना प्रत्येकाची!”

तिला एकदम भरून आले. त्याचे लक्ष नाही हे पाहून तिने पटकन डोळे पुसले…


ती ऑफिसात असतानाच गावाबाहेरच्या नदीत पोहायला गेलेल्या तरुणांपैकी तीन तरूण वाहून गेल्याची बातमी आली. तिला हळहळ वाटली. थोड्या वेळाने तिच्या लक्षात आले की, आज शनिवार… कॉलेज लवकर सुटते म्हणून आपला मुलगाही दर शनिवारी मित्रांबरोबर नदीत पोहायला जातो. तिला एकदम धस्स झाले.

हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!

थरथरत्या हातांनी तिने त्याच्या मोबाईलवर कॉल केला. फोन उचलेपर्यंत तिच्या छातीत धडधडत होते.

“हॅलो…” त्याचा आवाज ऐकताच तिचा जीव भांड्यात पडला.

“अरे, तू घरी आलायस? आज शनिवार, पोहायला नाही गेलास?”

“आई, केवढा पाऊस आहे. नदी दुथडी भरून वाहात आहे… कशाला रिस्क घ्यायची? आता दोन महिने तरी पोहणे बंद.”

तिला एकदम भरून आले, डोळे पुसत तिने फोन ठेवला…


तिचा नवरा कधीच जग सोडून गेलेला. घरात दोघेच. ती आणि दहावीतला मुलगा. सकाळपासूनच तिची चिडचिड सुरू होती. कामे लवकर उरकत नव्हती. त्यात मुलगा परीक्षा तोंडावर आली तरी, मोबाइल धरून बसलेला… हे पाहून तिचा संताप संताप झाला. रागाच्या भरात ती त्याला खूप वाट्टेल ते बोलली. दहा मिनिटे त्याची खरडपट्टी काढल्यानंतर ती रागारागानेच आॉफिसला आली.

लंच ब्रेकमध्ये डबा खाताना तिची मैत्रीण तिला म्हणाली, “काल आमच्या शेजारच्या बिल्डिंगमधल्या शाळकरी मुलाने आत्महत्या केली. आई कशावरून तरी रागवली म्हणे त्याला!”

हेही वाचा – सासू, सून अन् लेक…

हिला एकदम सकाळचा प्रसंग आठवला आणि काळजात काहीतरी हलले. तिच्या घशाखाली घास उतरेना. कसेबसे दोनचार घास गिळून ती उठली. घाईघाईने तिने बाहेर येऊन त्याला मोबाइल लावला. त्याचा फोन बंद होता. घाबरून तिने पुन्हा पुन्हा फोन लावला, पण मोबाइल बंदच होता त्याचा… तिचा घसा कोरडा पडला. तिने शेजारी राहणाऱ्या काकूंना फोन केला.

“काय गं?” काकूंनी फोन उचलल्यावर तिला हायसे वाटले.

“काकू, जरा घरी बघता का? शशी फोन उचलत नाहीये.”

“अगं, मी मार्केटमध्ये आली आहे. एक-दीड तास तरी लागेल घरी जायला. काही निरोप द्यायचाय का?”

“नाही काकू. मी बघते दुसरे कोणी.”

आता तिचा जीव घाबरा झाला. साहेबांची परवानगी घेऊन तिने ऑफिस सोडले. मिळेल ती रिक्षा पकडून ती थेट घरी यायला निघाली. गल्लीतून ती अक्षरशः धावत धावतच घरी पोहोचली. घराचे दार उघडे होते आणि तिचा मुलगा समोरच अभ्यास करत बसला होता. ती धपकन् सोफ्यावर बसली!

“अरे, फोन का बंद आहे तुझा?” ती जवळजवळ ओरडलीच.

“अगं, तू सकाळी रागावलीस ना? मग ठरवलं की, अभ्यास करताना फोन बंदच करून ठेवायचा. उगाच कोणाचे मेसेज, मित्रांचे फोनबिन येतात… अभ्यासात डिस्टर्ब नकोच. पण तू अशी धावतपळत का आलीस? ऑफिस लवकर सुटले आज?” ती काहीच बोलली नाही. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला घट्ट मिठी मारत रडायला लागली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!