Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!
    ललित

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारMay 19, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, मी मराठी, अभिजात मराठी, Bookshelf, निशाणी डावा अंगठा, प्रौढ साक्षरता अभियान, निरक्षरांना शिक्षण, सरकारची फोल योजना, शिक्षकांची हतबलता, प्रौढ साक्षरता अभियान शिक्षकांना त्रासदायक, शिक्षकांची धावपळ, गावचा एकोपा, निर्थक सरकारी योजनांवर टीका, सरकारची चुकीची धोरणे, जनजागृतीचा प्रयत्न, लेखक रमेश इंगळे उत्रादकर
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि मी त्यानंतर चार वर्षांनी वाचली. यावरचा सिनेमा सुद्धा पाहिला. प्रौढ साक्षरता अभियान हा या उपहासात्माक कादंबरीचा विषय आहे. शिक्षकांनी प्रौढ अशिक्षित लोकांना शिकवायचे, असा आदेश शासनाकडून आला होता. प्रौढ अशिक्षितांना शोधायचे आणि त्यांचे वर्ग भरवायचे. एकतर वयाने मोठे हे लोक कशासाठी शिकतील? रोजचे कामकाज, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करून उरलेल्या वेळात का शिकतील? त्यामुळे त्यांच्या राहणीमानात फरक पडणार नसल्याने मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्‍या कमकुवत लोक का शिकतील? याचा विचार न करता निरक्षरता निर्मूलन उपक्रम राबवला होता आणि अर्थात, जे सरकारी योजनांचे होते तेच झाले होते. केवळ कागदोपत्री लोक साक्षर झाले. परंतु या उपक्रमाचा जाच शिक्षकांना झाला. हे अभियान यशस्वी होऊच शकत नाही, याचे कारण लेखक देतात. ज्यांच्यासाठी अभियान आहे, त्यांना याची गरज नाही… गरज नाही कारण भूक नाही… भूक नसलेल्या समोर कितीही वाढलं अगदी तोंडापर्यंत नेले तरी वायाच जाते!

    कादंबरीचे नाव अगदी समर्पक आहे. भिलठाणा तालुक्यातल्या सावरगावची ही कथा आहे. लेखक म्हणतात, कुठलाही तालुका घ्या, कुठलेही गाव घ्या… निरक्षर सहीसाठी अंगठा लावतात. त्यांना ‘अंगठे बहाद्दर’ असेही म्हणतात. निरक्षर साक्षर झालेच नाहीत, पण ज्यांनी हे अभियान सुरू केले, ते भारताच्या समाज जीवनाच्या समस्या ओळखण्यात निरक्षर ठरले, अंगठे बहाद्दर ठरले. त्यांना तळागाळातल्या लोकांच्या आयुष्याची तितकीच माहिती आहे, जितकी निरक्षरांना अक्षराची. जसे निरक्षर शिकण्याबाबत निरीच्छ, तसे हे राजकारणी लोककल्याणाबाबत!

    कादंबरीच्या सुरुवातीला भालगावाची माहिती येते. भालगावात गोमासे नावाचे ग्रामसमन्वयक होते. त्यांच्याबरोबर वाघमारे, गायतोंडे, उन्हाळे, म्हस्के, मोरे, घोडमारे, सुसर, हिवाळे, कांबळे, कोरडे, गवळी, खोब्रागडे हे पुरुष शिक्षक तर, खरात, थोरात, सोनुने, कामुने, वालसंगीकर, लाडसावांगीकर या शिक्षिका होत्या.

    ‘पूवेका’ म्हणजे पूर्ण वेळ कार्यकर्ता, मास्तर ट्रेनर, केंद्रप्रमुख, तालुका जिल्हा समन्वयक, पर्यवेक्षक अशी पदांची चढती भाजणी आहे. कादंबरीत अनेक शॉर्ट-फॉर्म्स येतात. त्यांचे अर्थही दिले आहेत. एलआरटी (LRT) – लीव्ह रीझर्व टीचर  – म्हणजे एखादा शिक्षक दीर्घकालीन सुट्टीवर गेला की, त्या जागी दुसरा नेमायचा. शिक्षक गैरहजरच असतात आणि कोणाला सांगायचे हाही प्रश्नच. थोडक्यात त्यांना काहीच काम नाही म्हणजे त्यांनी सगळ्यांची फुटकळ कामे करून द्यायची.

    गटशिक्षण अधिकारी खासबागेसाहेब केप्र साखरे बरोबर त्यांच्या गावात रात्रीची शाळा पाहायला जातात तर, गावकरी रात्रीची सोडाच, दिवसाचीही पोरांची शाळा भरत नाही म्हणून गलका करतात.

    केप्रा पळसपगार बाई पूवेका डुकरेच्या बाईकवर बिनदिक्कत बसून जातात. कोण काय बोलेल याची पर्वा करत नाही. अन्यथा, तरुण मुलाबरोबर म्हातारी बाई किंवा म्हातार्‍या पुरुषाबरोबर सुद्धा कोणी मुलगी बसून गेली तर चर्चेला उधाण येते. पण इथे कोणालाच काही वाटत नाही. शिक्षण विस्तार अधिकारी काझीसाहेबांची दहा मुले आहेत आणि तेच कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवतात. एवढ्या मुलांना खायला घालायचे, मग वाकडे मार्ग अवलंबावे लागणारच! अत्यंत भ्रष्ट असलेले हे साहेब इतर शिक्षकांना पिळून घेतात. पुन्हा एखाद्याला दोन मुले झाली की, ते साळसूदपणे कुटुंब नियोजनाचा सल्ला देतात!

    जिल्हा तालुका समन्वयक, पर्यवेक्षक गावात येणार असतात, त्यावेळी गावातले शिक्षक मयतीला आल्यासारखे उभे असतात आणि कुजबुजत असतात, असे लेखक लिहितो. शिक्षकांवर असलेला प्रचंड ताण त्यांनी दाखवला आहे. निरक्षरांच्या शाळा चालू नसतात, मग ते जो अफलातून मार्ग काढतात, तो प्रसंग त्यांनी खुलवून लिहिला आहे. एक शिक्षक म्हणतात, आम्ही घाण्याचे बैल… घाण्याला आणि तेलाला किंमत असते… बैलाला नाही. बैल मेला तर, दुसरा येतो. त्याचे दुःख नसते. अभियानात बैलासारखे काम करून घेत आहेत, पण किंमत काहीच नाही!

    एकदा असाच एक वर्ग रात्री तपासायला येतात, त्यावेळी गावातले शिक्षक कीर्तनाला आलेल्यांच्या हातापाया पडून त्यांनाच निरक्षरांचा वर्ग आहे, असे सांगून पाटीवर लिहायला लावतो आणि वेळ मारून नेतो. त्यात कीर्तनाला आलेले भक्त वाचनमालेतले अंडी असलेले गणित करायला नकार देतात आणि आम्ही भ्रष्ट झालो, असे म्हणत्तात.

    काझी आणि केप्रा शाळेत निरक्षरता दिवसाचा दिवशी अचानक तपासणी करायला येतात, तेव्हा भाऊ आणि शिक्षक कसे आल्या प्रसंगाला तोंड देतात, हा प्रसंगही खुलवला आहे. शिक्षिका रविवारी यायला लागल्यामुळे वैतागलेल्या असतात आणि प्रत्येक जण संसाराच्या अडचणी सांगतात. भाऊंना रविवारी आराम करण्यापेक्षा इतर काही करायचे संकट वाटते. भाऊ एक तास भाषण करतात. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भेटीचा किस्सा रंगवून सांगतात.

    हेही वाचा – Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    शाळेत साहेब लोकांसाठी साधा चहा आणायचा तर, त्यात किती अडचणी येतात. कधी दूध संपलं तर, कधी स्टोव्हसाठी रॉकेल नाही. शेवटी लेखक लिहितात, निरक्षरांचे थकले भागले शरीर घोरत पडले होते, अक्षरांना त्यांच्या स्वप्नात थोडी सुद्धा जागा नव्हती.

    बुद्धवाड्यात समाज मंदिरात मात्र उत्साहाने बायका शिकू लागतात.त्यातली चौथीपर्यंत शिकलेली शेवंता सर्वाना शिकवू लागते.संधी दिल्याबद्दल भाऊंचे आभार मानते.सर्व गावांत केवळ बुद्धवाड्यात रात्रीची शाळा उत्साहाने सुरु असते.

    भाऊंच्या शाळेतला विठ्ठल एक पत्रिका तयार करतो. त्यात ‘श्री तुळजा भवानी प्रसन्न’ लिहून एक परिच्छेद लिहितो. निरक्षराने शिकून तो पाठ केला म्हणून इतके इतके बक्षीस मिळाले आणि कोणी नाही केला तर, नुकसान झाले, विश्वास न ठेवणार्‍याच्या घरी मृत्यू झाला वगैरे त्यात असते. शिवाय, याच्या पन्नास प्रती काढून वाटाव्या असेही नमूद केलेले असते. हे पत्रक लोकांपर्यंत पोहोचले तर, अभियान यशस्वी होईल, असं सर्वांचं खात्रीपूर्वक मत असतं. पण जर हे पत्र सहीशिक्क्याने पाठवले तर, सर्वजण सस्पेंड होतील, याचीही खात्री असते.

    सरकारला पीठ पडतंय की नाही, याची पत्रासा नाही, पण जात्याचा घरघर आवाज यायला हवा, असे शिक्षक म्हणतात. निरक्षरांचे अंतर्गत मूल्यमापन आणि बहिर्मूल्यमापन करण्याची वेळ येते, तेव्हा शिक्षकांचे धाबे दणाणतात. जिथे वर्गच भरत नाहीत, तिथे परीक्षा कोणाची घेणार? अंतर्गत मूल्यमापनाच्या संकटातून सावरगावचे शिक्षक युक्तीने सुटका करून घेतात. ‘आम्ही साक्षरतेचे गोंधळी’ असे उद्वेगाने म्हणत असताना, अर्थ केवळ आकड्यांना आहे, शरीर सुद्धा आकड्यांनाच आहे, बाकी सगळे निरर्थक! असा निष्कर्ष काढतात. या अभियानाच्या तीन वर्षांत खऱ्या अर्थाने अंतर्बाह्य ‘रंजला गांजला, पिळला गेला’ तो खेड्यापाड्यातला गुरुजी किंवा मास्तर नावाचा गरीब प्राणी! तो ‘मुकी बिचारी कुणी हाका’ असे जनावर झाला होता. मास्तर निरक्षरांना साक्षर करण्यात गुंतल्यामुळे उद्याचे भविष्य असलेली मुले निरक्षर होण्याची वेळ आली. अंतर्गत मूल्यांकनाच्या वेळी शिक्षकांना लक्षात येते रोज शाळेत येणारी मुले आपले नाव सुद्धा व्यवस्थित लिहू शकत नाहीत… तीही निरक्षरच!

    बहिर्मूल्यांकनासाठी 76 गावे निवडली जातात, त्यात सावरगावचे नाव येते. हे समजल्यावर सर्व शिक्षकांत दुःखाची अवकळा पसरते. पुढे लग्नाच्या तयारीसारखी तयारी सुरू होते आणि पूर्ण गाव ‘इज्जत का सवाल’ असल्यामुळे सामील होतो. हा कादंबरीचा शेवटचा टप्पा. सगळेच फसवणूक करत आहेत, हे सर्वांना माहीत आहे. केवळ कागदावर दाखवण्यासाठी सर्कस सुरू आहे, निष्पन्न काही होत नाही. प्रत्येक जण आपापली नोकरी टिकवायचा प्रयत्न करतो. अभियानासाठी केंद्राकडून मिळालेल्या पैशातली एक पैही इथे पोहोचलेली नाही, उलट या कार्यक्रमासाठी शिक्षकांना दरडोई पन्नास रुपये वर्गणी काढावी लागते. एक शिक्षक म्हणतात, ‘हे जे काही चाललं आहे, ते खूप भयंकर आहे. ते नुसतं खोटंच नाही तर, विद्रूप, बीभत्स आणि दारूण नाही तर करूणही आहे.’

    गावातली बाई रुख्मिणा जिला निरक्षर बाईच्या ऐवजी परीक्षा द्यायची असते, तिला त्या बाईच्या नवऱ्याचे नाव सांगायचे असते. शिक्षिकेला ओशाळवाणे वाटते. ती स्वत: असे करू शकली नसती. रुख्मिणा तिला म्हणते, ‘हे जे चाललं आहे, ते खरं व्हावं. एकच आयुष्य मिळतंय, एकाच गड्याबरोबर का घालवावं? नवा नवरा मिळावा.’ शिक्षिका चकित होऊन विचार करते, मला फक्त विठ्ठलाच्या बाजूला कमरेवर हात घेऊन उभी असलेली रुक्मिणीच माहीत होती… शिक्षिका म्हणते की, ‘अज्ञानात सुख असते आणि बंधनात मुक्ती असते. अडाणी बायका आमच्यापेक्षा जास्त मुक्त आहेत. त्यांना बंधन म्हणजे काय तेच कळत नाही आणि आम्हाला बंधन झुगारून देता येत नाही.’

    निरक्षरता निर्मूलन अभियान राबवण्याचा विचारच चुकीचा होता, बिनबुडाचा होता. रोज पोटाची खळगी भरण्यासाठी घामाची नक्षी काढणार्‍याच्या आयुष्यात अक्षरांना स्थान नाही. ज्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागलेल्या नाहीत, उद्याची चिंता आहे, तो शिकायचा विचार का करेल? वेळ कुठून आणेल? शिकून त्याच्या आयुष्यात काय फरक पडेल? या अभियानासारखे निर्णय एसी खोलीत बसून घेतले जातात. ज्यांचा तळागाळातल्या लोकांच्या आयुष्याशी संबंध येत नाही, ते लोक निर्णय घेतात. त्यामुळे केवळ पैशांचा चुराडा होतो.

    यात फायदा कोणाचा झाला? यावर बोलायची बंदी आहे किंवा सर्वश्रुत रहस्य आहे. अभियानावर करोडो रुपये खर्च झाले. ज्यांनी काहीच केले नाही त्यांनी ते गिळंकृत केले. जे राबले त्यांना फक्त मनस्ताप मिळाला. एन रँड (वी द लिव्हिंग), जॉर्ज ओरवेल (एनिमल फार्म) वगैरे लेखकांनी सरकारवर कडाडून टीका करण्यासाठी कादंबरी हेच अस्त्र अत्यंत प्रभावीपणे वापरले. ‘निशाणी डावा अंगठा’च्या लेखकाने सुद्धा फार्स लिहिताना वर्मावर बोट ठेवून टीका केली आहे. सरकारी धोरणांचा फोलपणा दाखवून दिला आहे.

    हेही वाचा – Bookshelf : ‘नाच ग घुमा’… लेखिकेला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही!

    तर निरक्षरता निर्मूलन ‘अभिनया’त सर्वांनी अंगचे सगळे कसब पणाला लावून हे नाटक कसे पार पाडले, याची सुरस कथा या पुस्तकात आहे. खळखळून हसायला लावणारी, ही कादंबरी वाचताना एका डोळ्यात अश्रूही आणते… उदास वाटते. उघड्या डोळ्यांनी आपण हे पाहात असतो, सहन करत असतो; पण हतबल असतो. शासनाच्या अनेक फसलेल्या अभियानांपैकी हे एक अभियान. लेखकाने समाजाचे डोळे उघडायचा प्रयत्न केलाय, अंजन घातलाय, पण आपण झोपेचं सोंग घेऊन पडलो आहोत, त्याचा काय इलाज?

    मलपृष्ठावर लिहिलं आहे, या नाटकात कलेक्टरपासून शाळीग्रामपर्यंत कितीतरी सोंग आहेत. मुखवटयाखाली खरा चेहरा आहे, याची आठवण सोंगाने ठेवायची नाही. मुखवटा हाच चेहरा, सोंग हेच जगणं!

    कादंबरी वाचायला हवी आणि यावरचा सिनेमाही पाहायला हवा.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026 ललित

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026 ललित

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    हा खेळ कागदांचा…

    By दिलीप कजगांवकरMay 19, 2026

    सदानंद आणि सावित्रीबाई पुण्यातील त्यांच्या प्रशस्त बंगल्यात राहत होते. एकेकाळी राज आणि वरदच्या धावपळीने गजबजलेला…

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026

    दिनचर्या… तिची अन् त्याची!

    May 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    Recipe : खमंग सुरळीच्या वड्या अन् स्वादिष्ट गव्हाचे वडे

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 302
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 425
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 211
    • मैत्रीण 19
    • ललित 637
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.