सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जें अतींद्रिय म्हणोनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया विभागा फिटलें । तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखों ॥159॥ परि हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥160॥ साच स्वरूप जरी आम्हीं दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें । परि बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥161॥ काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेळु विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥162॥ मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥163॥ ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोकआद्यें । बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥164॥
संजय उवाच :- एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः । दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥9॥
पैं कौरवकुळचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जे श्रियेहूनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ॥165॥ ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं । ना सेवकपण तरी अंगीं । शेषाचांचि आथि ॥166॥ हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पाहार योगी जैसे । अनुसरलें गरुडाऐसें । कवण आहे ॥167॥ परि तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें । जिये दिउनि जन्मले । पांडव हे ॥168॥ परि पांचांही आंतु अर्जुना । कृष्ण सावियाचि जाहला अधीना । कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥169॥ पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले । कैसें दैव एथ सुरवाडलें । तें जाणों न ये ॥170॥ आजि परब्रह्म हें सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे । कैसे वाचेचे हन लळे । पाळीत असे ॥171॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती
अर्थ
जे (विश्वरूप) इंद्रियांस प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही, म्हणून शास्त्रांद्वारा ठरले आहे आणि जे केवळ ज्ञानदृष्टीलाच विषय होणारे आहे, असे जे विश्वरूप, ते तुम्ही माझ्या चर्मचक्षूंपुढे ठेविले तर मी ते कसे पाहू? ॥159॥ परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये. मीच सहन करावे ते बरे. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तू म्हणतोस ते मला मान्य आहे. ॥160॥ आम्हास जर स्वरूप खरोखरच दाखवायचे होते, तर तुला प्रथम ते पाहाण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते. परंतु प्रेमामुळे बोलता बोलता विसरून गेलो. ॥161॥ हे कसे झाले म्हणशील तर, जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले, तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जातो. (त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहाण्याची दृष्टी न देता तुझ्यापुढे विश्वरूप मांडले तर, ते मांडणे व्यर्थ जाणारच). परंतु आता माझे स्वत:चे स्वरूप पाहाण्यास समर्थ असणारी दृष्टि तुला देतो. ॥162॥ मग अर्जुना, त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्ययोग पाहून त्याला अनुभावामध्ये साठवून ठेव. ॥163॥ वेदांताचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष आणि जो जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो याप्रमाणे बोलला (असे संजय म्हणाला). ॥164॥
संजय म्हणाला, हे राजा (धृतराष्ट्रा), महायोगैश्वर्यसंपन्न हरि याप्रमाणे बोलून, नंतर अर्जुनाला (आपले) ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखविता झाला. ॥9॥
(संजय म्हणाला,) हे कौरव-कुळातील सार्वभौम महाराजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की, लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यामध्ये जास्त दैववान कोणी आहे का? ॥165॥ अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करण्यात वेदांशिवाय जगात दुसरा कोण समर्थ आहे दाखवा बरे? अथवा एकनिष्ठ सेवकपण जर पाहिले तर, ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे. ॥166॥ अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने योगी असे आठही प्रहर शिणत असतात (असे भगवंताकरिता कश्ष्ट सोसणारे कोण आहेत?) आणि गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला (दुसरा) कोण आहे? ॥167॥ परंतु ते (आता) सर्व एका बाजूला राहिले. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले, त्या दिवसापासून, ते श्रीकृष्णापासून भक्ताला होणारे सुख, त्यांच्याच ठिकाणी एकवटले. ॥168॥ परंतु पाचही पांडवांमध्ये श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या आधीन झाले. जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री आपल्या आधीन करते, ॥169॥ शिकवलेला पक्षीही असे बोलत नाही, करमणुकीकरिता पाळालेला पशूही इतका हुकूमात राहात नाही, इतके अर्जुनाच्या आधीन श्रीकृष्ण झाले. या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस आले आहे, ते समजत नाही! ॥170॥ या प्रसंगी संपूर्ण परब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य याच्याच दृष्टीला लाभले आहे, पाहा! श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसे पुरवीत आहे! ॥171॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला


