सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जयातें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोडें । धातयाही परि न सांपडे । ठाव जयांचा ॥146॥ जयांतें देवत्रयी कहीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें । भोगीं आश्चर्याचीं कवतिकें । महाऋद्धी ॥147॥
इहैकस्थं जगत् कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् । मम देहे गुडाकेश यच्चान्यद् दृष्टुमिच्छसि ॥7॥
इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टी । सुरतरूतळवटीं । तृणांकुर जैसे ॥148॥ आणि वाताचेनि प्रकाशें । उडतां परमाणु दिसती जैसे । भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं ॥149॥ एथ एकैकाचिया प्रदेशीं । विश्व देख विस्तारेंशी । आणि विश्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्ते ॥150॥ तरी तियेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं । सुखें आवडे तें माझां देहीं । देखसी तूं ॥151॥ ऐसें विश्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें । तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ॥152॥ एथ कां पां हा उगला । म्हणोनि कृष्णें जंव पाहिला । तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे ॥153॥
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा । दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥8॥
मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परि दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥154॥ हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणिया म्हणितलें । आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परि न देखसीच तूं ॥155॥ यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें । तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥156॥ हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं बैसा । बहिरीयापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥157॥ मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा । वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥158॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें
अर्थ
ज्या स्वरूपांचे वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत, जी स्वरूपे पाहावयास काळाचेही आयुष्य थोडे आहे, आणि ब्रह्मदेव खरा सर्वज्ञ, पण त्यालाही ज्या स्वरूपांचा पत्ता लागत नाही, ॥146॥ ज्या स्वरूपांविषयी तिन्ही देव कधीही ऐकावयास येत नाही, अशी जी ही अनेक रूपे, ती तू प्रत्यक्ष पाहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर्य भोग. ॥147॥
हे अर्जुना, चराचरयुक्त सर्व जग आणि जर (आणखी) दुसरे पाहण्याची तुझी इच्छा असेल, तर येथे माझ्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित आहे, ते आता पाहा. ॥7॥
अर्जुना, ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात, त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्ट्या पाहा. ॥148॥ आणि ज्याप्रमाणे वार्याने उडणारे परमाणू प्रकाशात दिसतात, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यांत अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात. ॥149॥ या विश्वरूपाच्या एक एक भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पाहा आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे पाहावे असे वाटत असेल, ॥150॥ तर त्याविषयीही येथे मुळीच अडचण नाही. तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पाहा. ॥151॥ याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले विश्वरूपधारी श्रीकृष्ण परमात्मा बोलले, तेव्हा मी विश्वरूप पाहात आहे की नाही, असे काही न बोलता अर्जुन उगाच (स्तब्धच) राहिला. ॥152॥ या प्रसंगी हा स्तब्ध का राहिला आहे, म्हणून कृष्णाने ज्यावेळेस याच्याकडे पाहिले, तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला आढळाला. ॥153॥
केवळ या तुझ्या दृष्टीने मला पाहाण्यास तू समर्थ नाहीस, (याकरिता) मी तुला दिव्य दृष्टी देतो. (आता) माझे ईश्वरी सामर्थ्य पाहा. ॥8॥
मग देव म्हणाले, याची विश्वरूप पाहाण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही आणि अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाही, इतकेच नव्हे, परंतु आम्ही विश्वरूप दाखवले ते याला मुळीच आकलन होत नाही. ॥154॥ असे बोलून देव हसले आणि हसून अर्जुनास म्हणाले, तू खूप पाहाणारा आहेस! आम्ही तुला विश्वरूप दाखविले, परंतु पाहातच नाहीस. ॥155॥ या श्रीकृष्णाच्या भाषणावर हुशार अर्जुन म्हणाला, महाराज, तर मग हा कमीपणा कोणाला आहे? तुम्ही बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहाता ना? ॥156॥ अहो महाराज, आपण आरसा घासून तो आंधळ्यास दाखवावयास लागला आहात, किंवा हे श्रीकृष्णा, आपण बहिर्यापुढे गाणे सुरू केले आहे. ॥157॥ पुष्पांतील सुगंधी कणांचा चारा जाणूनबुजून चिखल खाणार्या बेडकांपुढे टाकून श्रीकृष्णा, वाया घालवीत आहात. मग रागावता कोणावर? ॥158॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती


