सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जेणें उरीं हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा । अझुनि वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना ॥105॥ ऐसा अपकारियां तुझा उपकारु । तूं अपात्रींही परि उदारु । दान मागोनि दारवंटेकरु । जाहलासी बळीचा ॥106॥ तूंतें आराधी ना आयके । होती पुंसा बोलावित कौतुकें । तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ॥107॥ ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । लागलासी आपणपें देवों वानिवसें । तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी ॥108॥ हां गां दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें । तिये कामधेनूचे पाडे । काय भूकेले ठाती ॥109॥ म्हणोनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं । परि देखावयालागीं देईं । पात्रता मज ॥110॥ तुझें विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे । तरि आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा ॥111॥ ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करूं सरैला सुभद्रापती । तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥112॥ तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥113॥ नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे । तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लसितु जाहला ॥114॥ मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें । पार्था देख देख उमपें । स्वरूपें माझीं ॥115॥ एकचि विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें । कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें ॥116॥ बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु । असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ॥117॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…
अर्थ
हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ हाणली, त्याच्या पावलांची खूण (भूषण) तू आपल्या छातीवर धारण करतोस. (शंखासूर) शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास (शंखास) विसंबत नाहीस. ॥105॥ याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणार्या लोकांवर तू उपकार केले आहेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहेस. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाल झालास. ॥106॥ ज्या गणिकेने तुला कधी पूजिले नाही, अथवा तुझे गुणवर्णन कधी ऐकले नाही आणि जी मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघूस ‘राघोबा राघोबा’ म्हणून हाका मारत होती, त्या गणिकेस तू वैकुंठामध्ये सुख दिलेस. ॥107॥ अशा प्रकारची पोकळ निमिते पाहून अपात्र माणसासही फुकाफुकी निजपद देतोस, असा तो तू मला काही निराळे करशील काय? ॥108॥ जी कामधेनू आपल्या दुभत्याच्या विपुलतेने सगळ्या जनाचे संकट दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली रहातील काय? ॥109॥ म्हणून मी जी काही विनंती केली, त्याप्रमाणे देव आपले विश्वरूप दाखविणार नाहीत, असे खरोखर नाही, परंतु ते पाहाण्याला लागणारी योग्यता मला द्यावी, ॥110॥ तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल, असे माझे डोळे समर्थ आहेत, असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा, विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत. ॥111॥ याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील, तेव्हा ती ऐकून त्या ऐश्वर्यादि सहा गुणांच्या सार्वभौम राजाला धीर धरवला नाही ॥112॥ तो श्रीकृष्ण परमात्मा, कृपारूपी अमृत हेच कोणी जल, त्याने युक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता, अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंतऋतू होता. ॥113॥ अथवा चंद्राचे पूर्ण बिंब पाहून क्षीरसमुद्राला जसे भरते येते, त्याचप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाले. ॥114॥ मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना पाहा, पाहा, ही माझी अनंत स्वरूपे. ॥115॥ एकच विश्वरूप पाहावे, असा मनोरथ अर्जुनाने केला, इतक्यात (देवाने) सर्वच विश्वरूप करून ठेवले. ॥116॥ धन्य श्रीकृष्ण परमात्मा! तो अमर्याद उदार आहे. तो नेहेमी याचकांच्या इच्छेच्या सहस्रपट आपले सर्वस्व देतो. ॥117॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे


