सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें । एकें सरागें जैसें सेंदुरें । डवरलें नभ ॥132॥ एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं । एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें ॥133॥ एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें । एकें अंजनाचलसकाळें । रक्तवर्णें एकें ॥134॥ एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं । एकें चांपेगौरीं केवळीं । हरितें एकें ॥135॥ एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्वेतचंद्र चोखडीं । ऐसीं नानावर्णें रूपडीं । देख माझीं ॥136॥ हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण । लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसें सुंदरें एकें ॥137॥ एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपुमनोहरें । शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिली जैसीं ॥138॥ एकें पीनावयव मांसाळें । एकें शुष्कें अतिविक्राळें । एकें दीर्घकंठें विताळें । विकटें एकें ॥139॥ एवं नानाविधाकृती । इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती । जयांचां एकेकीं अंगप्रांतीं । देख पां जग ॥140॥
पश्यादित्यान् वसून् रुद्रानश्विनौ मरुतस्तथा । बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥6॥
जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी । पुढती निमीलनीं मिठी । देत आहाती ॥141॥ वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें । जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचे ॥142॥ आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहती एकवट । तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ॥143॥ पैं सौम्यतेचा बोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवां । श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु ॥144॥ यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें । ऐसीं अपारें आणि विशाळें । रूपें इयें पाहीं ॥145॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे
अर्थ
काही तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारखी, त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनंत रूपे आणि काही ज्याप्रमाणे शेंदराने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंदरी, ॥132॥ रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळे ते जसे चमकत असावे, तशा प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविकच सौंदर्याने चमकणारी होती आणि कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती, ॥133॥ काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली, काही इंद्रनील मण्याप्रमाणे चांगली निळी असलेली, काही काजळाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली, काही तांबड्या रंगाची, ॥134॥ काही तेजदार सोन्याप्रमाणे पिवळ्या रंगाची, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्यासावळ्या वर्णाची, काही केवळ चाफ्याप्रमाणे गोरी असलेली आणि काही हिरव्या रंगाची ॥135॥ काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी, काही पांढऱ्या चंद्रासारखी शुद्ध, अशी ही माझी नाना रंगांची स्वरूपे पाहा. ॥136॥ हे ज्याप्रमाणे वेगवेगळे रंग आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या आकृत्याही वेगवेगळ्या आहेत. मदनही लज्जित होऊन शरण येईल, अशी कित्येक सुंदर आहेत. ॥137॥ काही रूपे अतिसुंदर बांध्याची आहेत, काही तुळातुळीत शरीराची मन हरण करणारी आहेत, जणू काय श्रृंगारलक्ष्मीचे भांडारखाने उघडले आहेत, अशी आहेत. ॥138॥ काही पुष्ट अवयवाची आणि खूप मांस असलेली, काही वाळलेली, अतिशय भयंकर, काही उंच मानेची, काही मोठ्या टाळूची आणि काही हिडीस रूपाची ॥139॥ याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृत्या आहेत. अर्जुना, या आकृत्या पाहावयास लागले तर त्यांना अंत नाही आणि त्यांच्या एकएका शरीरभागावर तू जग पाहा. ॥140॥
आदित्य, वसु, रुद्र, अश्विनीकुमार आणि वायू पाहा. हे भरतकुलोत्पन्ना, पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्ये अवलोकन कर. ॥6॥
ज्या ठिकाणी (विश्वरूप भागवंताच्या) दृष्टी उघडतात, त्या ठिकाणी सूर्याच्या सृष्ट्या पसरतात आणि जेथे त्या दृष्ट्या मिटतात, तेथे त्या सूर्यांच्या सृष्ट्या मावळतात. ॥141॥ तोंडाच्या वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते, त्या ठिकाणी अग्नीआदिकरून वसूंचा समुदाय प्राप्त होतो. ॥142॥ आणि भिवयांची (भुवयांची) टोके रागाने एकत्र होऊ पहातात, त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात. पाहा. ॥143॥ विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामध्ये अगणित अश्विनी देव उत्पन्न होतात आणि अर्जुना, विश्वरूपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात. ॥144॥ याप्रमाणे एकएका स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे आणि सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात, अशी अमर्याद आणि प्रचंड रूपे पाहा. ॥145॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें


